Tuesday, 27 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.02.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 February 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७  फेब्रुवारी  २०१ सकाळी .५० मि.

****



Ø  राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून प्रारंभ; पहिल्याच दिवशी ३ हजार ८७१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

Ø  औरंगाबाद शहरातल्या कचऱ्याच्या प्रश्र्नात राज्य शासनानं त्वरीत हस्तक्षेप करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Ø  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन

Ø  मराठा आरक्षणविषयक राज्य मागासवर्ग आयोगाच्या लातूर इथल्या जनसुनावणीच्यावेळी निवेदनांचा पाऊस

आणि

Ø  औरंगाबाद नजिक मुस्लिम धर्मियांच्या राज्यस्तरीय तब्लिगी इज्तेमाचा विशेष दुआनंतर समारोप

*****

 राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशुपालन आणि दुग्धोत्पादन अशा, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचं, राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आपल्या अभिभाषणात सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, तसंच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनांसह राज्य सरकारनं गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा राज्यपालांनी आपल्या भाषणातून घेतला.

 दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणाची मराठी अनुवादाची प्रत मिळाली नाही, तसंच अभिभाषणाचा मराठी अनुवादही ऐकू येत नसल्याचं सांगत, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सभात्याग केला. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर हा मराठी भाषेचा अपमान असल्याचं, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

 मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना, मराठी अनुवादक उपस्थित नसल्यानं, हा प्रकार घडला असून, या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं.

 विधानसभेचं कामकाज सुरू होताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाल्या प्रकाराबद्दल सदनाची माफी मागितली. शिक्षण मंत्री तावडे यांना अनुवादाचं वाचन करावं लागल्यामुळे संबंधितावर कडक कारवाई केली जाईल, तसंच यापुढे अशा घटना घडू नये म्हणून दक्षता घेतली जाईल, असं ते म्हणाले. याबाबत पूर्ण चौकशीअंती कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.

 विधानपरिषदेतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणाची चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले असल्याचं, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं. तत्पूर्वी, दिवंगत माजी विधान परिषद  सभापती,  प्राध्यापक ना. स. फरांदे, माजी उपसभापती वसंत डावखरे, सदस्य माजी राज्यमंत्री मधुकरराव किंमतकर, चंद्रकांत जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

****

 अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल विधानसभेत सरकारनं, ३ हजार ८७१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. याशिवाय थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना अडीच वर्षांची मुदत संपण्यापूर्वी पदावरून काढता येणार नाही अशी तरतूद असलेला, महाराष्ट्र नगर पालिका, नगर पंचायत आणि औद्योगिक शहर कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश, आणि, ग्रामपंचायत सदस्यांना सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर  न केल्यास, त्याची निवडणूक रद्द ठरवणारा अध्यादेशही सभागृहात मांडण्यात आला.

****

 अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचे पती बोनी कपूर यांचा जवाब काल दुबई पोलिसांनी नोंदवला. श्रीदेवी यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या  झटक्याने नव्हे तर स्नानगृहातल्या टबमध्ये बुडून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. श्रीदेवी यांच्या शरीरात मद्याचा अंश आढळून आल्याचंही दुबईतल्या स्थानिक वृत्तपत्रानं म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे. दुबईतली कायदेशिर प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे श्रीदेवी यांचं पार्थिव  नातेवाईकांना सुपुर्द करण्यात आलं नाही. नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी दुबईत गेलेल्या श्रीदेवी यांचं शनिवारी मध्यरात्री निधन झालं.

****

 औरंगाबाद शहरातला कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यात महानगरपालिका प्रशासनास अपयश आल्यास नागरिकांचे हित आणि आरोग्य लक्षात घेऊन राज्य शासनानं त्वरीत हस्तक्षेप करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या संदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एस एम गव्हाणे यांनी, कचरा व्यवस्थापन प्रकरणी नाराजी व्यक्त करत, या प्रकरणी तात्काळ तोडगा काढण्यास सांगितलं आहे. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असून याप्रकरणी दैनंदिन सुनावणी घ्यावी लागली तरी चालेल, आणि वेळप्रसंगी महापालिकेवर प्रशासकही नेमला जाईल  असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. या प्रकरणाची आजही सुनावणी होणार असून, महापालिका आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

****

 आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रज उर्फ ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त, राज्यात सर्वत्र ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या  मराठी अभिमान गीताचं सामुहिक गायन  केलं जाणार आहे. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात या दिना निमित्त, विविध क्षेत्रातल्या नामवंतांचा गौरव केला जाणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष काव्य पुरस्कार आज औरंगाबाद इथं प्रदान करण्यात येणार आहेत. कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर यांना, तर कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार दासू वैद्य यांना प्रदान करण्यात येणार आहे.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

 मराठा आरक्षणा संदर्भात लातूर इथं काल राज्य मागासवर्ग आयोगानं जनसुनावणी घेतली. यावेळी अनेक संघटना, मराठा बांधवांनी आयोगासमोर निवेदनांचा पाऊस पाडला. मराठेत्तर संघटनांनीही आरक्षणाच्या समर्थनार्थ निवेदनं दिली. मराठवाड्यातल्या ७६ पैकी ६८ तालुक्यातल्या १३६ गावांत सर्वेक्षण आरक्षणाशी संबंधित सर्वेक्षण करण्यात आलं असल्याचं आयोगाचे सदस्य डॉ राजेश करपे यांनी यावेळी सांगितलं. आयोगाच्या सदस्यात डॉ रोहिदास जाधव, सर्वेक्षण तज्ञ डॉ. बाळासाहेब सराटे  यांचा समावेश आहे. अशाच प्रकारची सुनावणी आज उस्मानाबाद इथं होणार आहे.

****

 मानव कल्याण आणि विश्वशांतीचा संदेश देत औरंगाबाद नजिक लिंबेजळगाव इथं आयोजित मुस्लिम धर्मियांच्या राज्यस्तरीय तब्लिगी इज्तेमाचा काल विशेष दुआनंतर समारोप झाला. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….

 तीन दिवसांच्या या सोहळ्यात विविध मुस्लिम धर्मगुरुंनी धर्माच्या आचरणाबाबत मार्गदर्शन केलं. देश विदेशातून आलेल्या लाखो भाविकांनी यात सहभागी होत सामुदायिक विशेष नमाजमध्ये सहभाग नोंदवला. तसंच साडेचार हजारांहून अधिक मुस्लिम जोडप्यांचा इज्तेमाच्या दुसऱ्या दिवशी झालेला सामुदायिक विवाह हे साधेपणासह अनावश्यक खर्चाला चाप लावत मोठा सामाजिक संदेश देणारं ठरलं. इज्तेमात सहभागी स्वयंसेवकांनी या परीसरात ठेवलेला चोख बंदोबस्त आणि नियोजन यामुळे हा सोहळा यशस्वी झाला, रवीकुमार कांबळे, आकाशवाणी औरंगाबाद.



****

 बीड जिल्ह्यात २०१३-१४ या आर्थिक वर्षात ८६ चारा छावणी चालवणाऱ्या चालकांवर, अनियमितता केल्या प्रकरणी, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश, बीडचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी काल दिले. यामध्ये बीड इथल्या-११, आष्टी-४५,  शिरूर- १०, पाटोदा-१२, गेवराई- ८ अशा   चारा छावण्यांचा समावेश आहे.

****

 जालना नगरपालिकेच्या वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास काल आयोजित सभेत मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पात शहरातल्या मूलभूत सोयी-सुविधांसह प्रशासकीय आणि आस्थापना खर्चासाठी एकूण २७२ कोटी ३९ लाख ४७ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

****

 लातूर इथं नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित  व्याख्यानमालेत काल डॉक्टर शुभा साठे यांचं  ‘त्या तिघी - सावरकर घराण्यातील स्त्रीया’ या विषयावर व्याख्यान झालं. स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या सावरकर घराण्यातील तिघा बंधुंच्या पत्नींच्या कार्यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.

****

 लातूर जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्य पदांसाठी आज सार्वत्रिक तसंच पोट निवडणुकीचं मतदान होत आहे. सात तालुक्यातल्या गावांचा यात समावेश आहे. यापार्श्वभूमीवर, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान असलेल्या गावांमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्थानिक सुटृी जाहीर केली आहे.

****

 नाशिकच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखेतर्फे  देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार काल अध्यक्ष रवींद्र कदम यांनी जाहीर केले. ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार, आमदार हेमंत टकले यांना बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार तर, वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कारासाठी प्रशांत  दळवी यांची निवड करण्यात आली, असल्याचं त्यांनी सांगितलं.

*****

***

No comments: