Tuesday, 20 February 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.02.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 20 February 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

पंतप्रधान आवास योजनेत शहरी भागासाठी अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेअंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं शहरी भागातल्या गरीबांसाठी एक कोटी २० लाख घरं बांधण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे.
चिट फंड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चिट फंड विधेयक २०१८ ला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
लहान गुंतवणुकदारांच्या बचतीचं रक्षण करण्यासाठी संसदेत दोन नवीन विधेयक सादर करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. बेकायदेशीरपणे पैसा जमा करण्याला आळा घालणं हा या विधेयकाचा उद्देश आहे.

****

देशात सर्वाधिक ५० टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात असून, नवीन धोरणामुळे ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र ह्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत परकीय गुंतवणूकदारांच्या गोलमेज चर्चेदरम्यान ते आज बोलत होते. राज्यात उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नोडल अधिकारी नेमला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
या परिषदेत आज सकाळी ईज ऑफ डुईंग बिजनेस या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं. रोजगार संधीच्या वृद्धीसाठी उद्योग सुगमता महत्वाची असून, त्यादृष्टीनं मागील तीन वर्षांच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या परिषदेचा आज समारोप होत आहे.

****

भारतीय डाकघर सेवेनं कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी ऑनलाईन सर्वेक्षण सुरु केलं आहे. इंडिया पोस्टच्या संकेतस्थळावर हे सर्वेक्षण १५ मे पर्यंत चालणार आहे. याअंतर्गत ग्राहक आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना सांगू शकतील, असं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

शेतकरी आत्महत्या आणि शेतमाल हमीभावावार सरकार असंवेदनशील झालं असून, याच मुद्यावर सरकारला जाग आणण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज नंदुरबार इथं, शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या आढावा बैठकीनंतर, संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली. येत्या २३ मार्च या हुतात्मा दिनापासून राज्यभर शेतकरी जागर यात्रा काढली जाणार असून ३० एप्रिलला राज्यभरात २५ लाखाहून अधिक शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत. या नंतरही सरकारला जाग आली नाही तर, न भूतो ना भविष्यति, असा शेतकरी संप एक जून पासून पुन्हा पुकारला जाणार असल्याचा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. उद्या २१ फेब्रुवारी रोजी जळगाव इथं सुकाणू समितीच्या सदस्यांची आढावा बैठकही होणार आहे.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं आज अहमदनगर इथं स्वच्छ भारत अभियानांतर्गत - स्वच्छ सर्वेक्षण कार्यशाळा घेण्यात आली. अहमदनगरच्या महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या आणि दुर्गंधी पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत कदम यांनी व्यक्त केलं. क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी राज्यातल्या १३ क्षेत्रीय प्रचार कार्यालयांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

****

औरंगाबाद परिमंडळाअंतर्गत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात विद्युत देयकांची ३७८ कोटी रूपये थकबाकी असून जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि मंठा तालुक्यातल्या १५ गावांची वीज जोडणी खंडीत केल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अजिंठा तसंच वेरुळ लेण्यांची नोव्हेंबर महिन्यापासून विद्युत देयकाची ९६ लाख रुपये थकबाकी असल्यानं, वीज पुरवठा खंडीत केल्याचं त्यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकीसाठी मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान होणाऱ्या क्षेत्रात २७ फेब्रुवारीला रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

****

धुळे शहरात ऐंशी फुटी रोडवरील नटराज टॉकीज जवळ आज पहाटे लागलेल्या आगीत एक घर आणि भंगार गोदाम जळून खाक झालं. दोन्ही घरांचं मिळून सुमारे दोन लाखांचं नुकसान झालं. या घटनेत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघादरम्यान चौथा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामना उद्या खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे चार वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघ दोन - एकनं आघाडीवर आहे.
भारत दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान दुसरा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामना उद्या सेंच्यूरियन इथं होणार आहे. रात्री साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments: