Saturday, 24 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.02.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 February 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४  फेब्रुवारी  २०१ सकाळी .५० मि.

****



Ø  गेल्या खरीप हंगामातल्या पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे सरकारचे निर्देश

Ø  राज्यसभेच्या ५८ जागांसाठी येत्या २३ मार्चला निवडणूक; महाराष्ट्रातल्या सहा जागांचा समावेश

Ø  दत्तक विधान प्रक्रियेच्या नियमात शिथिल करण्याची माहिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांची केंद्र सरकारकडे मागणी

Ø  औरंगाबाद इथला कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काही महिन्यांची मुदत द्यावी - पालकमंत्री दीपक सावंत यांचं ग्रामस्थांना आवाहन

आणि

Ø  औरंगाबाद जिल्ह्यातल्या लिंबे जळगाव इथं आजपासून तीन दिवसीय इज्तेमाचं आयोजन

*****



 पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गेल्या खरीप हंगामातल्या पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी यासंदर्भात काल विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन हे निर्देश दिले. बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यांबाबत ताळमेळ घालून रक्कम वितरीत केली जात असल्याची माहिती विमा कंपन्याच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली. खरीप २०१७ विमा योजनेत सुमारे ८१ लाख शेतकरी सहभागी आहेत.

****

 बांधकाम कामगारांच्या विशेष ई नोंदणी अभियानाला काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत २५ लाख कामगारांची नोंदणी करण्याचं लक्ष्य कामगार विभागानं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेली अटल विश्वकर्मा सन्मान योजना राज्यातल्या २५ लाख कामगारांपर्यंत पोहोचवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. यात जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.

****

 राज्यसभेच्या ५८ जागांसाठी येत्या २३ मार्चला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं १६ राज्यातल्या ५८ जागांसाठीच्या द्विवार्षिक निवडणूकांची काल नवी दिल्ली इथं घोषणा केली. यात महाराष्ट्रातल्या सहा जागांचा समावेश आहे. पाच मार्चपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार असून मतमोजणी २३ मार्चलाच होणार आहे.

****

 वाहन चालक परवाना देण्याची प्रक्रिया जलद करण्याचे संकेत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. आगामी काळात प्रादेशिक परिवहन कार्यालयांना, वाहन चालक परवान्याची चाचणी उत्तीर्ण झाल्यावर निर्धारित कालमर्यादेत परवाना जारी करावा लागेल, असं ते म्हणाले. देशभरात दोन हजार परवाना केंद्र सुरू केली जाणार असून, तिथं संगणकाद्वारे वाहन चालकांची चाचणी घेतली जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. रस्ता अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाय केले जात असून, लोकसभेनं मंजूर केलेल्या मोटार वाहन कायद्यातल्या सुधारणांना राज्यसभेतही लवकरच मंजूरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

 भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये परतलेले माजी खासदार नाना पटोले यांची काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. भाई नागराळे यांची प्रदेश महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेले पटोले, गेल्या महिन्यात भाजपातून काँग्रेसमध्ये परत गेले आहेत.

****

 दत्तक विधान प्रक्रियेच्या नियमात शिथिलता आणावी, अशी मागणी माहिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांच्याकडं काल केली. राज्यात दत्तक घेणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र, नियम अधिक कडक असल्यामुळे दत्तक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो, इच्छुक पालकांना त्यामुळे बराच काळ वाट पाहावी लागते, याकडे मुंडे यांनी लक्ष वेधलं.

****

 पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसूली संचालनालयानं हिरे व्यापारी नीरव मोदी समूहाची सुमारे ३० कोटी रुपयांची बँक खाती तसंच तेरा कोटी शहाऐंशी लाख रुपये मूल्याचे विविध कंपन्यांचे शेअर्स गोठवले आहेत. याशिवाय परदेशी बनावटीच्या घड्याळांचा संग्रह, १७६ लोखंडी कपाटं, १५८ खोकी तर ६० डबेही जप्त केले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली. आयकर विभागानं गीतांजली उद्योग समूहाची हैदराबाद इथली बाराशे कोटी रुपये मूल्याची मालमत्ता जप्त केली आहे.

 दरम्यान, सक्त वसुली संचालनालयानं नीरव मोदीविरोधात नव्यानं समन जारी करत, येत्या सव्वीस तारखेला मुंबईत तपास यंत्रणांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा एक्केचाळीसावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

 स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईत वर्षा निवासस्थानी गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद सह मराठवाड्यात सर्वत्र शासकीय कार्यलयांमध्ये तसंच संस्था संघटनांच्या वतीनं गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आलं.

****

 औरंगाबाद इथला कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नारेगाववासीयांनी प्रशासनाला काही महिन्यांची मुदत द्यावी, असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे. नारेगाव इथं कचरा टाकण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची काल भेट घेऊन समस्या जाणून घेतल्यानंतर ते बोलत होते. पर्यायी जागेचा शोध घेतला जाईल, गावकऱ्यांनीदेखील सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं सावंत म्हणाले. यासंदर्भात डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकही घेण्यात आली.

****

 आरक्षण जातीच्या आधारावर नको तर आर्थिक निकषावरंच द्यावं, जातीआधारित आरक्षणाने अडचणी वाढतील, असं माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी म्हटलं आहे. काल लातूर इथं नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणं हा विचार योग्य असून, त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही स्वतंत्रपणे एकत्रित घेण्याची गरज चाकूरकर यांनी व्यक्त केली.



****

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षणा बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. ते काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पवार यांनी आर्थिक निकषांवर आरक्षणाची भूमिका मांडली, मात्र त्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला जातीवर आधारित आरक्षणाची मागणी केली असल्याचं, मेटे म्हणाले. राज्य शासनाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, बीड तालुक्यातल्या ३९ गावांमध्ये राबवण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या लिंबे जळगाव इथं आजपासून तीन दिवसीय इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या इज्तेमासाठी औरंगाबादकडे येणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन आणि लोकप्रतिनिधींच्या विनंतीवरून नांदेड रेल्वे विभागानं औरंगाबाद रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक चार वर तात्पुरत्या स्वरूपात ५ तिकीट खिडक्या, १ चौकशी खिडकी, तसंच दोन पोलिस कक्ष स्थापन केले आहेत. इज्तेमासाठी येणाऱ्या भाविकांनी सर्व रेल्वे स्थानकावर तसंच रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता ठेवण्याचं आणि योग्य तिकीट घेवूनच प्रवास करण्याचं आवाहन, नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालाज्ञ राभा यांनी केलं आहे.

****

 शेगाव - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील मंठा, वाटूर फाटा आणि तळणी फाटा इथले नियोजित उड्डाणपूल रद्द करावेत, अशी मागणी या तिन्ही परिसरातील व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेनं जालना जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली आहे. १३ किलोमीटर अंतरातल्या या प्रस्तावित उड्डाणपूलांमुळे बाजारपेठेचं नुकसान होण्याची शक्यता, याबाबत दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

****

 मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण करावं असं, मत परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी वेंकटेश्वरलू यांनी व्यक्त केलं आहे. विद्यापीठाच्या रोजगार मार्गदर्शन आणि समुपदेशन कक्षाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.

****

 हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात येलकी, इथल्या भारती मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत एक कोटी रुपयांहून जास्त रकमेचा अपहार झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी या संस्थेचा अध्यक्ष आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 लातूर इथं मंजूर झालेलं पारपत्र कार्यालय चालू आर्थिक वर्षात मार्च महिन्यात सुरू होणार आहे. खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी ही माहिती दिली.

****

 नांदेड -हिंगोली  महामार्गावर कळमनुरी तालुक्यातल्या माळेगाव ते झरा या मार्गावर काल एक एस.टी.बस उलटून झालेल्या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. अहमदनगर हून उमरखेडला जाणारी ही बस चालकाएऐवजी वाहक चालवत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

*****

***

No comments: