Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 25 February
2018
Time 17.25 to
17.30
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी
२०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला खादी उद्योगाशी
जोडण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं, उपराष्ट्रपती
व्यंकया नायडू यांनी म्हटलं आहे. कुष्ठरुग्ण सेवेसाठी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय गांधी
सन्मान डॉ.मोहन गुप्ते अणि डॉ.अतुल शाह यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज प्रदान करण्यात
आला. मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. वर्धा इथं
सेवाग्राम आश्रमातल्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयात हा पुरस्कार समारंभपूर्वक
प्रदान केल्यानंतर उपराष्ट्रपती बोलत होते. कुष्ठरोगाबद्दलच्या गैरसमजुती दूर करून
समाजात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, या सोहळ्यापूर्वी नायडू यांनी आश्रमातल्या बापू
कुटीला भेट दिली. महाविद्यालयातल्या शस्त्रक्रिया कक्षाचं उद्घाटनही उपराष्ट्रपतींच्या
हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू
होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार
टाकला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, वाढती महागाई, बेरोजगारी, बँकांचे समोर आलेले घोटाळे,
या पार्श्वभूमीवर चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखेपाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. विधान परिषदेतले विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्यासह रिपब्लीकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे, आमदार कपिल पाटील यांच्याही
या पत्रावर सह्या आहेत.
****
राज्यात सर्व बाजार समित्यांमध्ये ई-नाम योजना राबवण्याचा
निर्णय शासनानं घेतला आहे. या योजनेंतर्गत बाजार समितीच्या आवारात शेतमालाचा ई-लिलाव
करण्यात येईल. पहिल्या टप्यात ३० आणि दुसऱ्या टप्यात ३० बाजार समित्यांमध्ये ही योजना
राबवण्यात येईल. पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सर्व बाजार समित्यांमध्ये याची तातडीनं
अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. चांगल्या कामासाठी प्रोत्साहनपर बक्षीसं, तर समाधानकारक
काम नसलेल्या बाजार समित्यांवर कारवाईचा इशाराही देशमुख यांनी दिला.
****
साखरेचा घाऊक बाजारातला दर घसरल्यानं आणि विक्रीत घट झाल्यानं
राज्यभरातल्या ऊस उत्पादकांचे सुमारे अडीच हजार कोटी रुपये साखर कारखान्यांकडे अडकून
पडल्याची माहिती राज्य सहकार खात्याच्या सूत्रांनी दिली आहे. साखर कारखान्यांकडून उत्पादकांना
रास्त आणि किफायतशीर दर मिळणं शक्य होत नसल्याचं या सूत्रांनी सांगितलं. राज्यभरातल्या
एकशे त्र्याऐंशी साखर कारखान्यांनी गेल्या नोव्हेंबरपासून गाळप सुरू केलं असून, जानेवारीपर्यंत
गाळप झालेल्या चारशे ऐंशी लाख टन उसासाठी एकूण दहा हजार पाचशे कोटी रुपये उत्पादकांना
द्यायचे असताना, कारखान्यांनी आठ हजार एकशे पन्नास कोटी इतकीच रक्कम चुकती केली असल्याचं
पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
धुळ्याच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये बोगस विशेष शिक्षकांना
सामावून घेतलं असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यासंदर्भात स्थापन चौकशी समितीच्या तपासातून
ही बोगस शिक्षक भरती उघडकीला आली असून, बनावट आदेशपत्रावर शासनाचे अपर सचिव भरत पाटील
यांची सही करणारी अज्ञात व्यक्ती आणि संबंधित सहा शिक्षकांवर धुळ्याच्या पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल झाला आहे.
****
लातूरच्या सिद्धेश्वर यात्रा महोत्सवामध्ये उद्या जिल्हास्तरीय
सामूहिक महिला भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन सकाळी दहा
वाजता होणार आहे. या स्पर्धेमध्ये महिला भजन मंडळांनी सहभागी व्हावं, असं आवाहन महोत्सव
समितीनं केलं आहे.
****
भारतीय जिम्नॅस्ट अरुणा बुद्दा रेड्डीनं, ऑस्ट्रेलियात
मेलबर्न इथे सुरू असलेल्या जिम्नॅस्टिक विश्वचषक स्पर्धेत वाल्ट या क्रीडाप्रकारात
कांस्य पदक जिंकलं आहे. अरुणाचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय पदक असून, जिम्नॅस्टिक विश्वचषक
स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे.
****
भारताच्या पी.कश्यपनं ऑस्ट्रियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या
पुरुष एकेरीचं अजिंक्यपद मिळवलं आहे.त्यानं मलेशियाच्या जून वे चीम चा सरळ पराभव करत
हा मान मिळवला. त्याचा हा गेल्या तीन वर्षातला पहिला आंतरराष्ट्रीय किताब आहे.
****
No comments:
Post a Comment