Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 28 February
2018
Time 17.25 to
17.30
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी
२०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
भीमा-कोरेगाव मुद्द्यावरुन विरोधकांनी
केलेल्या गदारोळामुळे, विधान परिषदेचं
कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित झालं. पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं झालेली दंगल ही राज्यसरकार
पुरस्कृत होती, असा गंभीर आरोप आज विरोधकांनी विधानपरिषदेत केला. याप्रकरणी कथित जबाबदार असलेले संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना
तत्काळ अटक करण्याची मागणी करत विरोधकांनी
केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज सुरवातीला २० मिनिटांसाठी तहकूब झालं होतं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांनी यावेळी बोलताना, सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं सांगत, या घटनेनंतर ५४ हजार व्यक्तींविरोधात दाखल केलेले
गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणी केली.
जातपंचायतीच्या नियमांनुसार कौमार्य
चाचणी करण्याबाबत जाहीर वाच्यता करणाऱ्या व्यक्तीवरही यापुढे गुन्हा नोंदवण्यात येणार,
अशी घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली. शिवसेनेच्या नीलम
गोऱ्हे यांनी कौमार्य चाचणी आणि अशा वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत, जातपंचायतींवर
कठोर कारवाईची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली होती.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या
विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ देण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क
योजना शासनानं जाहीर केली असून, या योजनेच्या लाभापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभासाठी सुरु केलेल्या
योजनेच्या जाचक अटी असल्यामुळे लाभ घेण्यापासून विद्यार्थी वंचित रहात असल्याबाबतची
लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य अमरसिंह पंडित यांनी मांडली होती.
दुसरीकडे विधानसभेत आज विरोधकांनी बोंडअळी
नुकसानग्रस्तांना मदतीच्या मुद्द्यांवरुन गदारोळ केला. स्थगन प्रस्तावाद्वारे या मुद्द्यावर
चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र मागणी मान्य न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज सकाळच्या
सत्रात तीनवेळा तहकूब झालं.
****
भारतीय स्टेट बँकेनं आपल्या ठेवींवरच्या व्याजदरात बदल
केले आहेत. एका वर्ष ते दोन वर्षांपर्यंत मुदत ठेवींवरचे व्याजदर पंधरा शतांश टक्क्यांनी
वाढवून सहा पूर्णांक चाळीस शतांश टक्के तर दोन वर्षांपासून तीन वर्षांपर्यंतच्या मुदत
ठेवींचे व्याजदर पाऊण टक्क्यांनी वाढवून पावणे सात टक्के करण्यात आले आहेत. तर दोन
वर्ष ते दहा वर्षापर्यंतच्या मुदत ठेवींचा व्याजदर अर्धा टक्क्यांनी वाढवून साडे सहा
टक्के करण्यात आला आहे. एक कोटी ते दहा कोटी रुपयांपर्यंत मुदतठेवींसाठी आता पावणे
सात टक्के व्याज दिलं जाईल. हे नवे व्याजदर तत्काळ प्रभावानं लागू होणार असल्याचं पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत
विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. चित्रपट
सृष्टीतल्या ज्येष्ठ तसंच नवोदित अभिनेते अभिनेत्रींसह हजारो चाहत्यांनी आपल्या लाडक्या
अभिनेत्रीला अखेरचा निरोप दिला.
****
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध
मागण्यांसदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त
कार्यालयावर रूमणं मोर्चा काढण्यात आला. हिवाळी अधिवेशनात राज्यसरकारनं बोंडअळीग्रस्त
शेतकऱ्यांना जाहीर केलेली आर्थिक मदत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात १० दिवसात जमा करावी,
या मागणीसह विविध
मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं यावेळी प्रशासनाला देण्यात आलं.
****
औरंगाबादच्या कचरा प्रश्नी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी
आणि पोलिस आयुक्तांनी तिसगाव, करोडी, आडगाव आणि मिटमिटा या चार ठिकाणांची पाहणी करून,
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पाहणी अहवाल सादर केला. या ठिकाणी त्वरित
कचरा डेपो उभारता येणार नाही, त्यामुळे नारेगाव इथं कचरा टाकण्यासाठी तीन महिने मुदतवाढ
देण्याची मागणी प्रशासनानं आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडे केली.
****
वीजदेयकाचा रीतसर नियमितपणे भरणा करणाऱ्या वीजग्राहकांना
अखंडित वीज पुरवठा करण्याचे निर्देश औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी वीज महावितरण
कंपनीला दिले आहेत. औरंगाबाद इथं जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते.
ग्रामीण भागात महावितरणने गटानुसार वीजजोडणी दिली आहे, मात्र गटातले काही ग्राहक देयकाचा
भरणा करत नसल्यानं, इतर ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे थकीत देयकं वसूल
करून, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश खासदार खैरे यांनी दिले.
****
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या
दहावीच्या परीक्षेला उद्या एक मार्चपासून सुरुवात होत आहे. २४ मार्चपर्यंत ही परीक्षा
चालणार आहे.
****
No comments:
Post a Comment