Saturday, 5 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.05.2018 06.50AM


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ मे २०१ सकाळी .५० मि.

****



Ø साखरेवर सध्या वस्तू आणि सेवा कराशिवाय इतर कोणताही अतिरिक्त कर न लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Ø औरंगाबाद - जालना हे येत्या पाच वर्षांत राज्याच्या विकासाचं केंद्र बनेल - मुख्यमंत्री

Ø ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचं निधन

Ø राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर

आणि

Ø शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावावं - अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीची मागणी

****



साखरेवर सध्या वस्तू आणि सेवा कराशिवाय इतर कोणताही अतिरिक्त कर न लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. वस्तू सेवा कर समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. जीएसटी नेटवर्क, ही वस्तू आणि सेवा कराची माहिती आणि तंत्रज्ञानाची बाजू सांभाळणारी कंपनी सरकारच्या ताब्यात घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. वस्तू सेवा कराचं विवरणपत्रं भरण्याची सध्याची प्रक्रिया पुढच्या सहा महिन्यांपर्यंत लागू असेल, असंही जेटली यांनी सांगितलं.

****

 औरंगाबाद - जालना हे येत्या पाच वर्षांत राज्याच्या विकासाचं केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल जालना इथं, मुंबईतल्या रसायन तंत्रज्ञान संस्था - आयसीटीच्या मराठवाडा उपकेंद्राचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. सिरसवाडी शिवारात हे उपकेंद्र उभारलं जाणार आहे. या संस्थेमुळे कुशल मनुष्यबळ निर्मितीला आणि परिणामी रोजगाराला चालना मिळेल, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं, ते म्हणाले…



      ही केवळ नोकऱ्या तयार करणारी इन्स्टिट्यूशन नाहीये. ही आंत्रप्रिन्युअर तयार करणारी इन्स्टिट्यूशन आहे, की, ज्यातनं अनेकांना नोकऱ्या मिळू शकतात. अशा प्रकारचे उद्योजक, अशा प्रकारचे संशोधक हे या इन्स्टिट्यूशन मधनं तयार होतात. आणि पाच वर्षांनंतर या महाराष्ट्राच्या प्रगतीचं मॅग्नेट तुम्हाला कुठं दिसेल तर ते औरंगाबाद आणि जालन्यामध्ये तुम्हाला दिसेल. आज ज्या प्रकारे आपण शेंद्रा - बिडकीन ला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय, देशातलं सर्वोत्तम इंडस्ट्रीयल पार्क जर कुठे होतोय तर तो शेंद्रा - बिडकीनला तयार होतोय.



 भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.



 दरम्यान, जालना इथं देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचं उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. राज्याच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****



 एक अधिकारी, एक राज्य आणि एक सरकारी घर या नियमानुसार सरकारी योजनेतून घर देण्यासाठीच्या नियमात बदल करणार असल्याची माहिती, राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात दिली. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर, काल झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, पदाचा गैरवापर करुन एकापेक्षा अधिक सरकारी घरं मिळवणं चुकीचं असल्याचं नमूद केलं. सरकारी अधिकाऱ्याच्या नावावर सरकारी योजनेतून एक घर असताना, दुसरं घर मिळणार नाही, अशी नियमावली लवकरच तयार करणार असल्याचं महाधिवक्त्ता आशुतोष कुंभकोणी यांनी यावेळी सांगितलं.

****



 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या, मराठा समाजाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचं, निम्मं शुल्क राज्य शासन भरणार आहे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत हे शुल्क भरलं जाईल, शिक्षणाबरोबरच मराठा समाजातल्या तरुणानं व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य मिळवावं, याकरता, राज्य शासनानं तीन योजना आखल्या असून, त्यासाठी केंद्राकडून सुमारे साडेचारशे कोटी रुपये निधी मिळवला असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.

****



 ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचं काल पुण्यात निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. 'कवडी चुंबक', 'राजाचा खेळ', 'बिघडले स्वर्गाचे दार' आणि 'मोरूची मावशी', ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं, विशेष गाजली. 'पार्टी' तसंच 'शेजारी शेजारी' या चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. प्रसिद्ध रंगकर्मी विजया मेहता दिग्दर्शित 'जास्वंद' नाटकामध्ये त्यांनी भूमिका साकरली होती. कोल्हटकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. एक प्रतिभासंपन्न दिग्दर्शक आणि अभिनेता आपण गमावला, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकामात आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी, १४ मार्च २०१६ पासून भुजबळ तुरुंगात होते. न्यायालयानं यापूर्वीचे त्यांचे जामीन अर्ज फेटाळले होते, मात्र गेल्या दोन एप्रिल रोजी भुजबळ यांनी, पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज केला, या जामीन अर्जावर परवा सुनावणी पूर्ण होऊन, काल जामीन मंजूर करण्यात आला.

****



 भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी काल सर्वत्र आनंद व्यक्त केला. औरंगाबाद इथं, क्रांती चौकात समता परिषद, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, जल्लोष करण्यात आला.



 लातूर इथं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं फटाके फोडून तसंच मिठाई वाटून आनंद साजरा केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीनं केली आहे. काल औरंगाबाद इथं समितीचे सदस्य खासदार राजू शेट्टी, व्ही.एम. सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली, येत्या दहा मे रोजी, या मागणीचं निवेदन सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात देणार असून, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, या दोन मागण्या या अधिवेशनात मांडणार असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

****

 बीड जिल्हा परिषदेतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा सदस्य अपात्र ठरले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिले. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला मतदान केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी या सदस्यांना अपात्र ठरवलं होतं, मात्र ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती, न्यायालयाच्या या आदेशामुळे या सहा सदस्यांना, विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत मतदान करता येणार नाही.

****



 परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. शिवशंकर यांची नाशिकला बदली करण्यात आली होती, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून शिवशंकर यांची ओळख असून, त्यांची बदली रद्द करण्याची मागणी सर्वसामान्यांसह काही सामाजिक संघटनांकडून करण्यात आली होती.

****



  हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या नागझरी गावाचा सरपंच संभाजी वंजारी याला दहा हजार रुपये लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. सिंचन विहीरीचा कार्यादेश काढून देण्यासाठी त्यानं लाच मागितली होती.

****



 बुलडाणा जिल्हयातल्या खामगाव इथे भूमी अभिलेख कार्यालयातला उपअधीक्षक जाधव याला वीस हजार रुपये लाच घेतांना, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल रंगेहाथअटक केली. तक्रारदाराच्या ले आऊट मध्ये गुंठेवाढ करून देण्यासाठी जाधवनं ही लाच मागितली होती.

****



 अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी गोविंद गायकवाड याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आणखी एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. जामखेड इथं गेल्या महिन्यात योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

****



 मराठा आरक्षण संदर्भात सुनावणीसाठी सोलापूर इथं आलेले इतर मागासवर्गीय समाजाचे नेते शंकर लिंगे आणि विधीज्ञ राजन दीक्षित यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काल काळं फासलं. शासकीय विश्रामगृहावर हा प्रकार घडला. मराठा आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण जाता कामा नये, अशा आशयाचं निवेदन, लिंगे आणि दीक्षित मागासवर्गीय आयोगाला निवेदन देत होते, त्यावेळी त्यांना धक्काबुक्की करून, काळं फासण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं सांगितलं.



****



नव्यानं सुरू झालेल्या बिदर कोल्हापूर साप्ताहिक रेल्वेचे वेळापत्रक जाहीर  झालं आहे. त्यानुसार ही गाडी दर बुधवारी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी कोल्हापूरहून निघून गुरुवारी सकाळी सव्वादहाला बीदरला पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात बीदरहून दर गुरुवारी सकाळी पावणेबाराला निघून रात्री साडेबाराला कोल्हापूरला पोहोचेल.

****



 दक्षिण मध्य रेल्वेनं उन्हाळी सुट्टीनिमित्त नांदेड ते हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे गाडीच्या २४ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर गुरुवारी नांदेडहून निघते, तर परतीच्या प्रवासात दिल्लीहून दर शनिवारी निघते. मे, जून आणि जुलै महिन्यात या फेऱ्या वाढवण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...