Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ मे २०१८ दुपारी १.०० वा.
*****
कर्नाटक विधानसभेत
आपण बहुमत सिद्ध करुन सरकारची पाच वर्षे पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री बी. एस.
येडियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते आज वार्ताहरांशी
बोलत होते. काँग्रेस आणि जनता दल हे पक्ष अनैतिक युतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन
करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री
म्हणून येडियुरप्पा यांना शपथ घेण्यापासून थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिल्यानंतर
त्यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना १५ दिवसांची
मुदत देण्यात आली आहे.
****
दरम्यान, भाजपला
सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याच्या कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयाविरोधात
वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी
घेतलेला हा निर्णय म्हणजे घटनात्मक अधिकाराचा दुरुपयोग असल्याचं त्यांनी या याचिकेत
म्हटलं आहे. जेठमलानी यांनी ही याचिका उद्या संबधित खंडपीठाकडे दाखल करावी, असं सरन्यायाधीश
दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं सांगितलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह
बॅंकेच्या मुद्रा धोरण समितीची बैठक एक दिवस अगोदर, म्हणजे चार जून रोजी सुरु होणार
आहे. बँकेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. काही प्रशासकीय कारणांमुळे
२०१८-१९ या वर्षाची मुद्रा धोरणाची दुसरी द्वैवार्षिक बैठक पाच ते सहा जून ऐवजी आता
चार ते सहा जून दरम्यान होणार असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. या बैठकीत बँकेच्या गव्हर्नरच्या
अध्यक्ष ते खालील सहा सदस्यीय सामिती व्याजदर निश्चित करण्याची शक्यता आहे.
****
कामगारवर्गाला कामाचं चांगलं वातावरण, तसंच
सामाजिक सुरक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी गेली चार वर्ष प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय श्रम
आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी म्हटलं आहे. ते
नवी दिल्लीत फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीनं आयोजित केलेल्या
एका कार्यक्रमात बोलत होते. उद्योगात कमीत कमी अडचणी याव्यात, यासाठी
अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तसंच
३८ कामगारविषयक कायद्यांमध्ये सुधारणा
करुन ते चार कलमांमध्ये विभागले असल्याचं
गंगवार यांनी यावेळी सांगितलं.
****
पाकिस्तानातून राज्यात फक्त दोन हजार टन साखर आयात
करण्यात आली आहे, असा खुलासा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. २० लाख टन
साखर पाकिस्तानातून आयात करण्यात आली असल्याची विरोधी पक्षांनी दिलेली माहिती खोटी
असून, राज्यातले साखरेचे दर कोसळावेत यासाठी केलेला कट आहे, असं ते म्हणाले.
****
राज्यातल्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना राज्य परिवहन
महामंडळाच्या, ‘शिवशाही’, ‘शिवनेरी’ तसंच इतर आरामदायी गाड्यांमध्ये मोफत प्रवासाची
सवलत मिळणार आहे. परिवहन मंत्री, तथा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांच्या
प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत, ही मागणी मंजूर करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या
मान्यतेनंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात येईल, असं रावते यांनी सांगितलं.
****
राज्य सरकार बुद्धिस्ट गोल्डन टुरिस्ट सर्किट विकसित
करत आहे. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांनी ही माहिती दिली. ग्लोबल
एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस या जागतिक प्रदर्शनात ते मुंबईत यासंदर्भातल्या एका परिसंवादात
बोलत होते. राज्यात सुमारे ९०० बौद्ध स्तूप आणि लेण्या आहेत. केंद्र शासन, बिहार आणि
उत्तरप्रदेश यांच्या सहकार्यातून ही स्थळं विकसित केली जाणार आहेत. या स्थळांमध्ये
अजिंठा-वेरुळ, तसंच पितळखोरा लेण्यांचा समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावानं नुकसान
झालेल्या भोकरदन तालुक्यातल्या बाभुळगाव आणि सिपोरा बाजार, तसंच जाफ्राबाद तालुक्यातल्या
बोरगाव या गावातल्या शेतकऱ्यांशी काल केंद्रीय पथकानं प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला.
भोकरदन, जाफ्राबाद भागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते, परंतु बोंडअळीच्या
प्रादुर्भावानं कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती तिन्ही गावातल्या
शेतकऱ्यांनी यावेळी दिली.
****
जालना महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत आहे. राज्यशासन
आणि महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या वतीनं आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन
उद्या संध्याकाळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. २२ मे
पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
दक्षिण कोरियाच्या दोंघाई इथं सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद
करंडक स्पर्धेच्या महिला हॉकी सामन्यांमध्ये भारतानं चीनचा तीन - एक असा पराभव केला. वंदनानं दोन गोल केले, तर
गुरजित ही दुसरी गोलपटू ठरली. भारताचा या स्पर्धेतला हा सलग दुसरा विजय असून, यामुळे पाच देशांच्या तालिकेत भारतीयय संघ अव्वल स्थानावर
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment