Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 19 May 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
१९ मे २०१८
सकाळी ६.५०
मि.
*****
Ø कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना बहुमत
सिद्ध करण्यासाठी आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत मुदत
Ø जलयुक्त शिवार अभियानाद्वारे यावर्षी ६ हजार गावं दुष्काळमुक्त
करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
Ø यंदा मोसमी पाऊस तीन दिवस लवकर सक्रीय होण्याचा अंदाज
आणि
Ø औरंगाबाद
इथली दंगल पूर्वनियोजित असल्याचा पोलिस
प्रशासनाचा अहवाल
*****
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा
यांना आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च
न्यायालयानं दिले आहेत. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, बहुमत सिद्ध करण्यासाठी
सोमवारपर्यंत मुदत देण्याची भाजपची मागणी फेटाळून लावली.
या निर्णयानंतर कर्नाटक विधानसभेचं आज विशेष अधिवेशन
बोलावण्यात आलं आहे. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप आमदार के जी बोपय्या यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभेत आपण बहुमत सिद्ध करु असा विश्वास, मुख्यमंत्री
येडियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे.
****
काँग्रेस पक्षातर्फे काल देशभरात लोकशाही वाचवा दिवस
पाळण्यात आला. कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीकडे पुरेसं संख्याबळ
असताना कमी संख्याबळ असलेल्या भाजपला, राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बोलावलं, या
निर्णयाविरोधात काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आलं.
मुंबई इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण
यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावण्याचा
घेतलेला निर्णय हा केंद्र सरकारच्या दबावामुळे घेतल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी
केला.
नांदेड इथंही राज्यपालांच्या निर्णयाच्या निषेधार्थ
काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री
डी पी सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
****
जलयुक्त शिवार अभियानाद्वारे यावर्षी ६ हजार गावं
दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
सांगली जिल्ह्यातल्या भटकिमळा डोंगर परिसरात पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात
येत असलेल्या जलसंधारण कामांची काल मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत
होते. या अभियानातून आतापर्यंत ११ हजार गावं दुष्काळमुक्त झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.
पाणी फाऊंडेशननं दुष्क़ाळ निवारणासाठी हाती घेतलेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा
केली त्याचबरोबर अभिनेता आमीर खान यांच्या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात
परिवर्तन होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
****
बोंडअळीमुळे कापसाचं, तुडतुड्यामुळे धानाचं आणि ओखी
वादळामुळे मच्छिमार बोटींचं झालेलं आर्थिक नुकसान मोठं असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पाहणी पथकासोबत काल
मुंबईत सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री
बोलत होते. या सर्व नुकसानग्रस्तांना केंद्र सरकारनं जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी,
असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
कृषी
विकासाशी संबंधित विविध ११ विभागातली रिक्त पदं १०० टक्के भरण्याचा निर्णय राज्य शासनानं
घेतला आहे. ही पदभरती कंत्राटी स्वरुपाची नसून कायमस्वरुपी राहणार असल्याचं वित्त विभागानं
स्पष्ट केलं आहे.
****
राज्यभरात १९७ खरेदी केंद्रावर १५ मे पर्यंत सहा
लाख ५५ हजार ८०१ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. सहकार आणि पणन मंत्री सुभाष
देशमुख यांनी काल ही माहिती दिली. यावर्षी हरभरा खरेदीचे उद्दीष्ट ३० लाख क्विंटल निर्धारित
करण्यात आलं आहे. राज्यभरात ४७ हजार ७६२ शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी
केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
पुणे सोलापूर
राष्ट्रीय महामार्गावर काल सायंकाळी रस्ता अपघातात पाच जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले.
डाळज गावानजीक काल सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
****
यंदा नैऋृत्य मोसमी पाऊस येत्या २९ मे रोजी केरळमध्ये
दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मोसमी पाऊस दरवर्षी साधारणत: एक
जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, यावर्षी मात्र तीन दिवस आधीच मोसमी पाऊस दाखल होणार
असून, पुढच्या चार दिवसांत तो महाराष्ट्रात सक्रीय होण्याचा अंदाज आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य
मतदार संघ निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी शिवसेना भाजपचे अधिकृत उमेदवार
विप्लव बाजोरिया यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नागरे यांनी काल यासंदर्भात एक प्रसिद्धी
पत्रक जाहीर केलं. येत्या सोमवारी होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे
उमेदवार सुरेश देशमुख आणि सेना भाजप युतीचे बाजोरिया यांच्यात थेट लढत होणार आहे.
****
औरंगाबाद
शहरात गेल्या आठवड्यात उसळलेली
दंगल पूर्वनियोजित असल्याचा अहवाल औरंगाबाद पोलिस प्रशासनानं पोलिस महासंचालकांकडे
सादर केला आहे. शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाला शोधमोहिमेत पेट्रोल बॉम्ब सापडले
असून, मोठ्या प्रमाणावर दगड गोळा करून ठेवल्याचं निदर्शनास आलं, असं या अहवालात नमूद
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
या दंगल प्रकरणी आतापर्यंत ५० हून अधिक जणांना अटक
करण्यात आली आहे. याच प्रकरणी शिवसेनेचे
नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोन जून पर्यंत न्यायालयीन
कोठडी सुनावली आहे. जंजाळ यांनी जामीनासाठी अर्ज केला असून आज या जामीन अर्जावर सुनावणी होणं अपेक्षित आहे.
दरम्यान, या दंगलग्रस्तांना भारतीय
जनता पक्षाच्या वतीनं आर्थिक मदत करण्यात येत आहे. ३५ दंगलग्रस्तांना मदतनिधीचं वाटप करण्यात येत असल्याची माहिती
भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली.
****
शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यासाठी
राष्ट्रीय पातळीवर धोरण निश्चित केलं जात असल्याचं, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उप
महासंचालक डॉ नरेंद्र सिंह राठोड यांनी म्हटलं आहे. काल परभणी इथं, वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त, आयोजित खरीप शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन,
राठोड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरु डॉ बी व्यंकटेश्वरल्लू कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी होते. यावेळी शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं. परिसरात आयोजित
कृषी प्रदर्शनालाही शेतकऱ्यांनी भेट दिली.
****
महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेल ट्रस्ट आणि जालना जिल्हा
प्रशासनाच्यावतीनं आयोजित जालना महोत्सव २०१८ ला काल सकाळी शोभायात्रेनं सुरुवात झाली.
शोभायात्रेतल्या विविध देखाव्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. पालकमंत्री बबनराव
लोणीकर यांनीही शोभायात्रेत सहभाग घेतला. २२ मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात मंगल
गाणी दंगल गाणी, महामूर्ख संमेलन, ग्राहक प्रदर्शन, खाद्य महोत्सव आदी कार्यक्रमांचं
तसंच मिस जालना -मिस्टर जालना-श्रीमती जालना तसंच जालना आयडॉल आदी स्पर्धांच आयोजन
करण्यात आलं आहे.
****
तूर तसंच हरबरा पिकांचं विक्रमी उत्पादन होऊनही हमीभावानं
खरेदीत दिरंगाई होत असल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं, आंदोलनाचा इशारा
दिला आहे. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषद घेऊन,
शेतमाल खरेदी केंद्र प्रक्रियेतल्या अडचणी दूर करण्याची मागणी केली. खरेदीतल्या दिरंगाईमुळे
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचं किमान अकराशे कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं पाटील
यांनी सांगितलं.
****
वाढत्या धावपळीमुळे कुटुंबातील संवाद कमी होत असल्यानं,
कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचंही मोठं नुकसान होत असल्याचं मत, राष्ट्रसेविका समितीच्या
अखिल भारतीय सह कार्यवाह चित्रा जोशी यांनी केलं आहे. लातूर इथं, केशवराज प्राथमिक
विद्यालयात आयोजित राष्ट्रसेविका समितीच्या
देवगिरी प्रांत प्रवेश शिक्षा वर्गाच्या समारोप
प्रसंगी त्या काल बोलत होत्या.
****
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शि.म.परांजपे पुरस्कार
ज्येष्ठ साहित्यिक वासूदेव मुलाटे यांच्या ‘मनातलं आभाळ ‘या ग्रंथाला जाहीर झाला आहे.
येत्या २६ मे रोजी परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला
जाईल.
*****
***
No comments:
Post a Comment