Saturday, 19 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ मे २०१ दुपारी १.०० वा.

****



 देशात स्वातंत्र्यानंतर ज्या चार कोटी घरांना वीज पुरवठा झाला नाही, अशा गावांना येत्या दीड वर्षात वीज पुरवठा करण्यात येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान आज जम्मू आणि काश्मीरमधल्या लडाखच्या एकदिवसीय दौऱ्यावर असून, त्यांनी जोजिला पास इथं १४ पूर्णांक दोन किलोमीटर बोगद्याचं भूमिपूजन केलं, त्यानंतर ते बोलत होते. या मार्गाच्या माध्यमातून श्रीनगर, कारगील आणि लेह दरम्यान सर्व मोसमांमध्ये संपर्क राखणं शक्य होणार आहे. आजच्या एक दिवसाच्या कार्यक्रमात २५ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन अथवा प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

****



 कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपच्या के जी बोपय्या यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या काँग्रेस आणि जनता दलानं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आज बहुमत सिद्ध करायचं असून, त्यासाठी कर्नाटक विधानसभेचं विशेष सत्र बोलावण्यात आलं आहे. यासाठी राज्यपालांनी बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. हे पद सर्वात ज्येष्ठ आमदाराला देण्याची प्रथा असल्याचं सांगून काँग्रेस आणि जेडीएसनं बोपय्या यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र न्यायालयानं बोपय्या हेच हंगामी अध्यक्ष राहतील, असा निर्णय दिल्यामुळे आज संध्याकाळी चार वाजता त्यांच्या अध्यक्षतेखालीच विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.

 दरम्यान, ही बहुमत चाचणी पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी या चाचणीचं थेट प्रक्षेपण करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.

****



 केंद्र सरकारनं एप्रिल महिन्याचा जीएसटीआर- तीन बी हा अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवली आहे. करदात्यांना हा अर्ज दाखल करताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांनी ही मुदत येत्या २२ मे पर्यंत वाढवली आहे.

****



 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना त्वरित वेतन देण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांशी चर्चा करून एक कालबद्ध कार्यक्रम आखावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे. या योजनेतल्या परिशिष्ट दोननुसार योजनेत काम करणाऱ्या मजुरांना पंधरा दिवसांमध्ये वेतन देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पंधरा दिवसांमध्ये वेतन न दिल्यास अशा मजुरांना नुकसानभरपाई देणं बंधनकारक असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. एका अशासकीय संस्थेनं याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयानं हे निर्देश दिले.

*****



 केंद्र शासनाकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या निधीच्या वाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला नसल्याचं पंधराव्या वित्त आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. तसंच याबाबत उत्तर-दक्षिण असा जो काही वाद निर्माण करण्यात येत आहे तो निराधार असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. नवी दिल्लीमध्ये काल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत आयोगाच्या झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी नायडू यांनी काही राज्यांनी आयोगाचे काही संदर्भ आणि उत्तर-दक्षिण अशा भेदाबाबत उपस्थित केलेल्या शंका आयोगाच्या नजरेस आणून दिल्या.

****



 संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय ला पुरवल्याप्रकरणी माजी राजनैतिक अधिकारी माधुरी गुप्ता यांना नवी दिल्लीच्या न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिध्दार्थ शर्मा यांनी गुप्ता यांना, अधिकृत गुप्तता कायदा आणि गुन्हेगारी षडयंत्र रचण्याकरता भारतीय दंड विधान अंतर्गत दोषी ठरवलं असून, शिक्षेवर आज युक्तिवाद होणार आहे. पूर्वी इस्लामाबाद इथं भारतीय दुतावासात दुय्यम सचिव असलेल्या गुप्ता यांना पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली २७ एप्रिल २०१० ला अटक करण्यात आली होती.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ मे रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४४वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 औरंगाबाद शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे आज मोर्चा आयोजित केला आहे. पैठण गेट इथून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातल्या वडगाव लांडगा इथं शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भाऊसाहेब मोरे असं मृत शेतकऱ्यांचं नाव असून, पाय घसरुन ते शेततळ्यात पडल्यानं ही दुर्घटना घडली. संगमनेर तालुका पोलिसांनी ही माहिती दिली.

******

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...