Wednesday, 2 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.05.2018 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 2 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे २०१ दुपारी १.०० वा.

****

पत्रकार ज्योतिर्मय डे हत्या प्रकरणी मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयानं प्रमुख आरोपी छोटा राजनसहित नऊ आरोपींना दोषी ठरवलं आहे. एकूण चौदा आरोपींपैकी, जिग्ना व्होरा आणि पोल्सन जोसेफ या दोन आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. एका आरोपीचं निधन झालं असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पत्रकार जे.डे यांची २०११ च्या जून महिन्यात पवई इथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

****

२०२२ सालापर्यंत देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यास आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज कर्नाटकमधल्या भाजपा शेतकरी आघाडीच्या कार्यकर्त्यांशी नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून, त्यांची प्रगती घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं शेतकऱ्यांसाठी अकरा लाख कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिल्याचं सांगतानाच, हे देशात प्रथमच घडल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारतर्फे आज देशभरात विभागवार किसान कल्याण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल, याबाबतचं मार्गदर्शन घेण्यासाठी शेतकरी आणि कृषी अधिकारी तसंच वैज्ञानिक या कार्यशाळेत संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ सालापर्यंत दुप्पट करण्याच्या उद्दिष्टानं सरकारनं हाती घेतलेल्या उपाययोजनांबद्दलची माहितीही या कार्यशाळेत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ग्राम स्वराज अभियानांतर्गत या कार्यशाळा घेण्यात येत आहेत.

****

नवीन ‘राष्ट्रीय दूरसंचार धोरण २०१८’ चा मसुदा केंद्रसरकारनं जाहीर केला आहे. २०२२ सालापर्यंत चाळीस लाख नवीन रोजगारांची निर्मिती, या क्षेत्रात शंभर अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक मिळवण्याचा प्रयत्न करणं, तसंच, देशातल्या प्रत्येक नागरिकाला पन्नास एमबीपीएस गतीनं ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देणं, ही या धोरणाची उद्दिष्टं आहेत.

****

हरवलेल्या व्यक्ती आणि बेवारस मृतदेह यांची डीएनए नोंदणी करता यावी, यासाठीचे उपाय योजण्याबाबतचं विधेयक संसदेच्या आगामी सत्रात मांडलं जाईल, असं केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. हजारो बेवारस मृतदेहांची डीएनए नोंदणी करण्यासाठीची कोणतीही यंत्रणा राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध नसल्याचं एका स्वयंसेवी संघटनेनं केलेल्या याचिकेत म्हटलं असून, याबाबतच्या सुनावणीदरम्यान सरकारनं ही माहिती दिली. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांची डीएनए नोंद घ्यावी, जेणेकरून संबंधितांच्या कुटुंबीयांना ओळख पटवणं सोपं होईल, असं या याचिकेत म्हटलं आहे.

****

पर्यटनातून होणाऱ्या परदेशी चलनाच्या प्राप्तीमध्ये या मार्च महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षीच्या मार्च महिन्यात सतरा हजार तीनशे कोटी रुपये मूल्याचं परदेशी चलन प्राप्त झालं, तर गेल्या मार्च मध्ये ते चौदा हजार सातशे कोटी रुपये इतकं होतं, असं पर्यटन मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार तर २३ जण जखमी झाले. आज पहाटे सुरगाणा इथं कानाशी बोरगाव रस्त्यावर हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका आठ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

****

भारतीय जनता पक्षातले नेते रमेश कराड यांनी आज उस्मानाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार दिलीप देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यानं, रिक्त होणाऱ्या, विधान परिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

****

वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानातून ४६९ गावांमध्ये ८ हजार ५८ कामं पूर्ण झाली असून, येत्या वर्षभरात उरलेल्या २६५ गावांत हे अभियान राबवलं जाणार आहे, तसंच मागेल त्याला शेततळं, या योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ७९ शेततळ्यांचं काम पूर्ण झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: