Sunday, 20 May 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 20.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मे २०१ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असून, आज मोहाली इथं भारतीय विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्थेचा सातवा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राष्ट्रपतींनी १५३ पदवी, पदविका, पीएचडी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या.

****

भारत आठ हजार २३० अरब डॉलरच्या संपत्तीसोबत जगातला सहावा सर्वात श्रीमंत देश आहे. आफ्रिका आशिया बँक जागतिक मालमत्ता पुनरावलोकनच्या अहवालानुसार अमेरिका पहिल्या, चीन दुसऱ्या, तर जपान तिसऱ्या स्थानावर आहे. देशातल्या एकूण संपत्तीचं मूल्यांकन देशातल्या सर्वात जास्त श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीच्या आधारावर केलं जातं. भारतात उद्योजकांची संख्या वाढवणं, उत्तम शिक्षण व्यवस्था, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढ, आरोग्य आणि सामाजिक माध्यम क्षेत्राला सशक्त बनवलं, तर पुढच्या दहा वर्षात भारताच्या एकूण संपत्तीत आणखी वाढ होईल, असं या अहवालात म्हटलं आहे. सर्वात वेगानं विकसित होणाऱ्या आर्थिक बाजारात भारत, श्रीलंका, विएतनाम, चीन आणि मॉरिशस या देशांचा समावेश आहे.

****

वस्तु आणि सेवा कर विभागानं, बनावट जीएसटी कागदपत्र बनवून १२७ कोटी रुपयांचा कर बुडवल्याच्या आरोपावरुन मुंबईतल्या दोन व्यक्तींना अटक केली आहे. स्थानिक न्यायालयानं या दोघांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबईतला व्यावसायिक उपाध्याय यानं एप्रिल २०१६ ते जून २०१७ या कालावधीत ४७ कोटी रुपयांचा सेवा कर जमवला होता, मात्र तो त्यानं सेवा कर विभागाला जमा केला नाही. तसंच कर चुकवण्यासाठी ७८ कोटी ३८ लाख रुपयांची बनावट कागदपत्र तयार केली होती, याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.

****

केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन विकास राज्यमंत्री के जे अल्फोन्स यांनी दिली आहे. अल्फोन्स यांनी काल रायगड किल्ल्याला भेट देऊन, गडावर रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते. रायगड किल्ल्याचा इतिहास जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असून, किल्ल्यावर फरसबांधणी, उत्खनन, पथमार्ग आणि पायऱ्यांचं बांधकाम सुरू असल्याची माहितीही संभाजीराजे यांनी यावेळी दिली.

****

वीज ग्राहकांना पावसाळयात अखंडित वीज पुरवठयासाठी मान्सूनपूर्व कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर आणि नांदेड परिमंडळातल्या ११ जिल्हयात ही कामं दर शुक्रवारी सकाळी सुरूवात करून दुपारी एक वाजे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती बकोरिया यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

****

कोकणातलं पहिलं शहीद जवान स्मारक रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरूख इथं उभारण्यात आलं असून, येत्या ३० मे रोजी त्याचं उद्घाटन होणार आहे. शहीद जवानांचा इतिहास विद्यार्थ्यांना माहीत व्हावा आणि त्यांच्यामध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशानं देवरूख शिक्षण प्रसारक मंडळानं हे स्मारक उभारलं आहे. या स्मारकात ठेवण्याकरता संरक्षण मंत्रालयानं टी-५५ हा बजरंग रणगाडा आणि एक तोफ संस्थेला दिली असून, परमवीरचक्र मिळवलेल्या जवानांचा इतिहास स्मारकात मांडण्यात आला आहे.

****

लातूर शहरातल्या नळांना गेल्या काही दिवसांपासून पिवळसर रंगाचं पाणी येत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलं आहे. हे पाणी पिण्यास योग्य असून त्यावर आवश्यक ती शुद्धीकरणाची आणि निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जाते आणि त्याची दैनंदिन तपासणीही करण्यात येते, असंही पाणीपुरवठा विभागानं स्पष्ट केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड आणि धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक गणाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. बाजार समितीच्या १५ गणांपैकी पाच गणाचे आरक्षण लॉटरी पद्धतीनं निश्चित करण्यात आलं. महिलांसाठी दोन गण, इतर मागासवर्गीय एक, विमुक्त जाती, भटक्या जमाती एक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती एक गण, यानुसार पंधरा गणांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं.

****

दक्षिण कोरियामधल्या दोंघाई इथं सुरु असलेल्या आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स चषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण कोरियादरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारतानं तीन सामन्यात विजय मिळवला, तर एक सामना अनिर्णित राहीला.

//**********//

No comments: