Sunday, 20 May 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 20.05.2018 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 20 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

पाकिस्ताननं काश्मीर सीमेपलिकडून केलेल्या हल्ल्याला सीमा सुरक्षा दलानं चोख प्रत्त्युत्तर देत पाकिस्तानचे लष्करी तळ जवळपास उध्वस्त केले आहेत. या हल्ल्यात एक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं समजतं. या कारवाईची १९ सेकंदांची चित्रफीतही सीमा सुरक्षा दलानं जारी केली आहे.

****

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले, तर एक जवान जखमी झाला. आज दुपारी झालेल्या या हल्ल्यात, नक्षलवाद्यांनी, जवानांना घेऊन जाणारं वाहन भू-सुरुंगाचा स्फोट करून उडवून दिलं. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांचा शस्त्रसाठाही लुटला. हुतात्मा जवानांमध्ये सशस्त्र दल आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवानांचा समावेश आहे.     

****

जागतिक दहशतवाद विरोधी आणि हिंसाचार विरोधी दिन उद्या देशभरात पाळण्यात येणार आहे. यानिमित्त सर्व शासकीय आस्थापनांनी दहशतवाद विरोधी आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्याचे निर्देश शासनानं एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.   

****

२०१९च्या लोकसभा निवणुकीत युती करण्यासंदर्भात शिवसेनेनं पुढाकार घेतल्याशिवाय बोलणी करणार नसल्याचं भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. शिवसेनेसोबत युती करुन सर्व निवडणुका एकत्रितपणे लढवण्याची भाजपची नेहमीच इच्छा असून, भाजपनं युती करण्यासंदर्भात अनेकदा विचारणा केली, मात्र शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असं त्यांनी सांगितलं.   

****

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राज्य विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. उस्मानाबाद- लातूर- बीड, परभणी-हिंगोली, रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजे २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद मतदार संघासाठी लातूरमधून - ३५३, उस्मानाबाद - २९१, आणि बीडमधून - ३६१ असे एकूण एक हजार पाच मतदार तर परभणी - हिंगोली मतदार संघातून एकूण पाचशे तीन मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार असून, या निवडणुकीतलं मतदान हे पसंती क्रमांकानुसार असून, निवडणूक आयोगामार्फत पुरवण्यात आलेल्या जांभळया रंगाच्या‍ मार्कर पेननेच मतदान नोंदवणं आवश्यक आहे.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना आता स्वयंचलित हवामान केंद्रांच्या माध्यमातून हवामानाच्या स्थितीबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे. यामुळे पीक व्यवस्थापन आणि नुकसान प्रतिबंधाला मदत मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यात अशी दोन हजार साठ हवामान केंद्रं बसवण्यात येणार आहेत. गावपातळीपर्यंत अचूक हवामानाचा अंदाज पोहोचवण्यासाठी ही केंद्रं उभारली जात आहेत.

****

आर्थिक क्षेत्रात सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या घटनामंध्ये वाढ झाल्यामुळे राज्य शासनानं राज्य पातळीवर आर्थिक गुन्हेगारी विंग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. या विंग च्या अध्यक्षपदासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक हे नवीन पद निर्माण केलं जाणार असल्याचंही यात सांगितलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात मच्छिंद्रनाथ चिंचोली इथं लघूसिंचन तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर तीन मुलींना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली.

****

जालना शहरात छत्रपती संभाजी उद्यानासमोर भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन विद्यार्थी ठार झाले. आज दुपारी हा अपघात झाला. महावेद वैद्य आणि गौरव वैद्य, अशी या दोघांची नाव असून, दोघेही अंबड तालुक्यातल्या शिरनेर इथले रहिवासी आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ मे रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४४वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

दक्षिण कोरियात दोंघाई इथं झालेल्या आशियाई महिला हॉकी अजिंक्यपद चषक स्पर्धेत भारतीय संघ उपविजेता ठरला आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात यजमान दक्षिण कोरियानं भारताला ०-१ नं पराभूत केलं.

****

भारतीय नाविक दलाचं जहाज आयएनएस तारिणी हे पृथ्वी प्रदक्षिणेवर गेलेल्या सहा महिला नाविक दलाचं जहाज उद्या गोव्यात पोहोचणार आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये गोव्यातूनच या मोहिमेला प्रारंभ झाला होता.

//*********//


No comments: