Thursday, 3 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 3 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यातल्या विविध महाविद्यालयं-शैक्षणिक संस्थांमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या रकमेतील निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर, तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थेला ऑफलाईन पद्धतीनं वितरित केली जाणार आहे.

जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्या‍पीठाचा, ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार याबाबतचा अध्यादेश काढण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालय आणि या न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि पणजी इथल्या खंडपीठातल्या कक्ष अधिकाऱ्यांना, मंत्रालयातल्या कक्ष अधिकाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ही वेतनश्रेणी एक जानेवारी २००६ पासून मंजूर करण्यात आली असून, तिचे प्रत्यक्ष लाभ एक फेब्रुवारी २०१३ पासून देण्यात येणार आहेत.

****

सुमित मल्लिक यांनी आज राज्य मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ घेतली. लोकायुक्त म. अ. टहलियानी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. त्यानंतर मल्लिक यांनी प्रभारी मुख्य माहिती आयुक्त ए.के.जैन यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.

****

गेल्यावर्षी शेतकरी संपावेळी दूध दराबाबत दिलेलं आश्वासन शासनाकडून पाळलं जात नसल्याच्या निषेधार्थ आज राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोफत दूध वाटपाचं आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या लाखगंगा इथं शेतकरी नेते अजित नवले यांच्या नेतृत्वात आज हे आंदोलन करण्यात आलं. सरकारनं दुधाला २७ रुपये प्रति लिटर दर निश्चित केला असला, तरी डेअरीकडून फक्त १७ रुपये दर दिला जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.  

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. तहसीलदार नितीन गवळी यांना संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.

****

औरंगाबाद शहरात कचरा विलगीकरणावर प्रामुख्यानं भर देत कचरा व्यवस्थापनासाठी कालबध्द कृती कार्यक्रम राबवण्याचे निर्देश नगर विकास विभागाचे प्रधान साचिव नितीन करीर यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं आज कचरा व्यवस्थापनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ओला कचरा हा महानगरपालिकेकडून दररोज गोळा करण्यात येईल, मात्र सुका कचरा आठवड्यातल्या ठराविक दिवशी गोळा करण्यात येईल, याबाबत नागरीकांना सूचित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पावसाळ्याच्या आधीच सर्व नाल्यांजवळ साठलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असेही त्यांनी यावेळी संबधित अधिकाऱ्यांना सांगितलं.

****

उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे आज सुरेश धस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, सुनील गायकवाड उपस्थित होते. धस यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्याकडे अर्ज दाखल केला.

****

देशातील वाढत्या बेरोजगारी विरोधात आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. प्रशिक्षित बेरोजगारांना दरमहा एक हजार रुपये भत्ता देण्यात यावा, मुद्रा लोन त्वरित मंजूर करावं, कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर सामावून घ्यावं, आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या मोर्चात धुळे शहरासह जिल्हाभरातील शेकडो बेरोजगार तरूण-तरूणी सहभागी झाले होते.

****

यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा शहरवस्तीलगत असलेल्या कृष्णा टेकडीवर आज भीषण आग लागली. आखाडा वॉर्ड मध्ये वन विभागानं कृष्णा टेकडीवर सौंदर्यीकरण केलं असून, हे निसर्ग वन पर्यटन केंद्र साकारण्यात आलं आहे. विविध वनस्पती, फळा फुलांची झाडे आणि गवत असलेल्या या टेकडीवर आग लागून ही वनसंपदा खाक झाली आहे. आगीची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

****

राज्यात सर्वात जास्त ४५ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर आणि परभणी इथं नोंदवलं गेलं. नांदेड ४४ पूर्णांक पाच, तर औरंगाबाद इथं ४१ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...