Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 04 May 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०४ मे २०१८ सकाळी ६.५० मि.
****
· मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या
मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम वितरित करण्यास
राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
· भाजप- शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस - राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचीही विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडी;
परभणी- हिंगोलीची
जागा काँग्रेस तर लातूर- उस्मानाबाद- बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार
·
अनुसूचित जाती
जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात आपल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च
न्यायालयाचा नकार
आणि
·
जालना इथं रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या नियोजित उपकेंद्राचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमीपूजन
****
राज्यातल्या विविध महाविद्यालयं-शैक्षणिक
संस्थांमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या
मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम वितरित करण्यास
राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला.
जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र
विद्यापीठाचा, ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ असा नामविस्तार
करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी
केलेल्या घोषणेनुसार याबाबतचा अध्यादेश काढण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.
****
सरकारी शाळांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यासाठी येत्या शैक्षणिक
वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं ‘ओजस आंतरराष्ट्रीय शाळांची’ सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री
विनोद तावडे यांनी काल केली. राज्यात येत्या जून महिन्यापासून तेरा तर पुढच्या शैक्षणिक
वर्षापासून शंभर ओजस शाळा सुरु करण्यात येणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं. तोरणमाळ
इथं या प्रकारची पहिली शाळा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली असल्याचं तावडे यांनी
सांगितलं.
****
सेवानिवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक यांनी काल राज्य मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ घेतली.
लोकायुक्त म. अ. टहलियानी यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
****
भारतीय जनता पक्ष- शिवसेनेपाठोपाठ
काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आघाडी
करत प्रत्येकी तीन - तीन जागा लढवण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता परभणी- हिंगोलीची
जागा काँग्रेस तर लातूर- उस्मानाबाद- बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार
आहे. पोटनिवडणुकीमध्ये भंडारा- गोंदिया लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार
आहे तर पालघर लोकसभा आणि पलूस- कडेगाव विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवणार आहे.
दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ
नेत्यांच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार परभणी- हिंगोली
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं सुरेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
लातूर- उस्मानाबाद- बीड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश कराड निवडणूक लढवणार आहेत. भारतीय
जनता पक्षाच्यावतीनं काल या मतदार संघातून बीडचे माजी मंत्री सुरेश धस यांनी उमेदवारी
अर्ज दाखल केला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,
खासदार डॉक्टर
प्रितम मुंडे, सुनिल गायकवाड यांच्यासह अन्य नेते यावेळी
उपस्थित होते.
वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर
मतदारसंघातून काँग्रेसनं इंदरकुमार सराफ यांना तर अमरावतीमधून अनिल माधोगडिया
यांना उमेदवारी दिली आहे. वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली
मतदारसंघात भारतीय जनता पक्षानं प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर यांना उमेदवारी
दिली आहे. राष्ट्रवादी
काँग्रेसनं रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे तर नाशिकमधून शिवाजी
सहाने यांना उमेदवारी दिली आहे.
****
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रासिटी कायद्यासंदर्भात
आपल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे, मात्र, या प्रकरणांमध्ये
गुन्हा नोंदवण्यापूर्वी प्रत्येक तक्रारीची शहानिशा करण्याची आवश्यकता नाही, असं न्यायालयानं
स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर काल सुनावणी झाली.
त्यावेळी न्यायालयानं हे स्पष्ट केलं. ॲट्रासिटी अंतर्गत दाखल तक्रार जर तथ्यहीन वाटत
असेल, तरच शहानिशा करायला हवी, असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं.
****
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं काल वितरण करण्यात आलं. यामध्ये कच्चा लिंबू,
धप्पा, चांदोरीनामा, म्होरक्या या मराठी चित्रपटांचा तर मयत आणि पावसाचा निबंध या लघुपटांचा
पुरस्कार प्राप्त चित्रपटांमध्ये समावेश आहे. विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब
फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वेळेअभावी फक्त ११ पुरस्कारांचं वितरण
केलं. त्यामुळे उर्वरित पुरस्कार सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते
प्रदान करण्यात आले. यामुळे पुरस्कार वितरणावर काही कलाकारांनी नाराजी व्यक्त केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
मुंबईतल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना इथं नियोजित
मराठवाडा उपकेंद्राचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी
साडे अकरा वाजता होत आहे. त्यानंतर गोकुळ लॉन्स इथं आयोजित मुख्य समारंभात ते मार्गदर्शन
करतील. देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते होणार आहे.
****
गेल्यावर्षी
शेतकरी संपावेळी दूध दराबाबत दिलेलं आश्वासन शासनाकडून पाळलं जात नसल्याच्या निषेधार्थ
काल राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोफत दूध वाटपाचं आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबाद
जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या लाखगंगा इथं शेतकरी नेते अजित नवले यांच्या नेतृत्वात
हे आंदोलन करण्यात आलं. सरकारनं दुधाला २७ रुपये प्रति लिटर दर निश्चित केला असला,
तरी डेअरीकडून फक्त १७ रुपये दर दिला जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. परभणी शहरातही मोफत दूध वाटप आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष वगळून इतर राजकीय
पक्ष आणि प्रादेशिक पक्षांना एकत्रित करून समाजवादी पक्ष आगामी निवडणुकांसाठी आघाडी
करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष अबु आजमी यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना
सांगितलं. समाजवादी पक्ष काँग्रेस सोबत युती
करण्यास तयार आहे, मात्र काँग्रेस युती करत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या देशात
सुरू असलेलं धार्मिक राजकारण थांबवणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमांत राज्यातल्या पंधरा जिल्ह्यांचा नव्यानं समावेश
करण्यात आला आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. यापूर्वी
२०१५ मध्ये १६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. यामुळे आता राज्यातल्या ३१ जिल्ह्यात
ही योजना कार्यान्वित झाली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा राज्यमंत्री अर्जुन
खोतकर यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातल्या काही रस्त्यांच्या
सुधारणेच्या कामांचा समावेश आहे. याशिवाय दरेगाव इथल्या पाण्याच्या टाकीच्या तसंच दरेगाव
पिंपळगाव रस्त्यावरच्या पुलाच्या बांधकामाचाही समावेश आहे.
****
औरंगाबाद
शहरात कचरा विलगीकरणावर प्रामुख्यानं भर देत, कचरा व्यवस्थापनासाठी कालबध्द कृती कार्यक्रम
राबवण्याचे निर्देश, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी दिले आहेत. औरंगाबाद
इथं कचरा व्यवस्थापनाबाबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. ओला कचरा हा महानगरपालिकेकडून
दररोज गोळा करण्यात येईल, मात्र सुका कचरा आठवड्यातल्या ठराविक दिवशी गोळा करण्यात
येईल, याबाबत नागरीकांना सूचित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पावसाळ्याच्या
आधीच सर्व नाल्यांजवळ साठलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर
दंडात्मक कारवाई करा, असेही त्यांनी यावेळी संबधित अधिकाऱ्यांना सांगितलं.
****
हिंगोली तालुक्यातल्या
कौठा, कडोळीसह कळमनुरी
तालुक्यात बाळापूर, वारंगा, आणि नांदापूर
परिसरात काल वादळी वाऱ्यामुळे आंब्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं. या
वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे
उडून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
//***********//
No comments:
Post a Comment