आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई
वाला यांनी जनता दल सेक्युरलचे नेते एच डी कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी
निमंत्रण दिलं आहे. येत्या बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं कुमारस्वामी
यांनी बंगळूरु इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यपालांनी जनता दल सेक्युलर आणि
काँग्रेस आघाडीला बहुमत सिध्द करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.
दरम्यान, कर्नाटकात काँग्रेस-जनता दल सेक्युलर यांचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचं
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे. काल भाजप नेते बी एस येडीयुरप्पा
यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमदारांच्या
खरेदीबाबतच्या आरोपांचं खंडनही त्यांनी यावेळी केलं.
****
बोंडअळीमुळे कापूस, तुडतुड्यामुळे धान आणि ओखी वादळामुळे
मच्छिमार बोटींचं झालेलं आर्थिक नुकसान मोठं असून, केंद्र सरकारनं जास्तीत जास्त नुकसानभरपाई
द्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्याच्या दौऱ्यावर
आलेल्या केंद्राच्या पाहणी पथकाची काल मुख्यमंत्र्यासमवेत आढावा बैठक झाली. यावेळी
मुख्यमंत्र्यांनी कापसावरील बोंडअळीचा फटका राज्यातल्या २८ जिल्ह्यांना बसला असल्याचं
सांगितलं.
दरम्यान, राज्य सरकारनं यापूर्वीच तीन हजार ३७३ कोटी रूपयांचा
प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
****
लातूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पाणीदार बनवून
दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुढाकार आणि अक्का फाउंडेशनच्या विशेष
सहाय्यानं जिल्ह्यात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवलं जाणार आहे. यासाठी आजपासून जलयोद्धा
नोंदणी सुरू होणार आहे. या अभियानात सहभागी होऊन दुष्काळग्रस्त जिल्हा ही लातूर ची
ओळख पुसून सकारात्मक ओळख निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात अंबड इथल्या आरोग्य अधिकाऱ्याला पंधरा
हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. डॉ अनिल वाघमारे असं या अधिकाऱ्याचं
नाव असून, आरोग्य सेविकेची अंतर्गत बदली करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
//**********//
No comments:
Post a Comment