Friday, 4 May 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 04.05.2018 11.00


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



४ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

वस्तु आणि सेवा कर परिषदेची २७ वी बैठक आज होणार आहे. या बैठकीत कर विवरणपत्र अर्जाचं सुलभीकरण, डिजिटल पेमेंटवर सवलत आणि जीएसटी जाळ्याला सरकारी कंपनीचं स्वरूप देण्यासंदर्भातल्या प्रस्तावांवर प्रामुख्यानं चर्चा अपेक्षित आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत राज्यांच्या वित्तमंत्र्यांसोबत दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा होईल.

****

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये येत्या ३६ तासात पुन्हा वादळ येण्याची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे. उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागात, विशेषत: राजस्थानमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे धुळीचे लोट आणि जोरदार वारे वाहू शकतील. दोन्ही राज्यांना बुधवारीच वादळाचा तडाखा बसला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या वादळामुळे १०० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला.   

****

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नागपूर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काल त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.

****

कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी गेल्या तीन वर्षात राज्य शासनानं मोठी गुंतवणूक केल्यामुळे कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि उत्पादन वाढलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं सार्वजनिक खासगी सहभागी तत्वावरील एकात्मिक कृषी विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्हॅल्यू चेन्सच्या माध्यमातून राज्यातले दहा लाख शेतकरी जोडले गेले असल्याचं सांगत, सार्वजनिक आणि खासगी सहभागी तत्वावरच्या एकात्मिक कृषी विकास प्रकल्पांमध्ये राज्यातल्या अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करुन घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महावेध या स्वयंचलित हवामान केंद्राच्या ॲपचं उद्घाटन करण्यात आलं. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढच्या पंधरा दिवसांचा हवामानाचा अंदाज तसंच वीज पडण्याबाबतचा अंदाज देखील मिळणार आहे.

//***********//


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...