Thursday, 2 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 2 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****



 लैगिंक अत्याचार प्रकरणात पीडित मुलींची ओळख समोर येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. बिहार मधल्या मुजफ्फरपूर इथल्या बालिका गृहातल्या अत्याचार प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं, पीडित मुलींची दृष्यफीत किंवा छायाचित्र प्रसिद्ध केलं जावू नये, असं निक्षून सांगितलं आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं बिहार सरकार आणि केंद्र सरकारला नोटीसही बजावली आहे.

****



 मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणारं विधेयक आज लोकसभेत सादर होणार असून, हे विधेयक पारित करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार यांनी केलं आहे. संसद परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रहित आणि सामाजिक न्यायासाठी विरोधकांनी या महत्त्वाच्या विधेयकाला सहकार्य करावं, असं ते म्हणाले. 

****



राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच, संसदरत्न पुरस्कातप्राप्त खासदारांचं अभिनंदन करण्यात आलं. सभापती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांचं प्रशासकीय कौशल्य आणि वक्तृत्व गुणांचं कौतुक केलं. हा पुरस्कार मिळवणाऱ्या लोकसभेतल्या सदस्यांचंही नायडू यांनी अभिनंदन केलं.

****



 धार्मिक आणि धर्मादाय संस्थांकडून वाटप करण्यात येणारं अन्न, प्रसाद, लंगर किंवा भंडारा यावरच्या केंद्रीय जीएसटी आणि एकात्मिक जीएसटीची भरपाई करण्यासाठी सरकारनं एक योजना सुरू केली आहे. सेवा भोज योजना असं या योजनेचं नाव असून, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी त्यावर ३२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कोणताही भेदभाव न करता समाजातल्या सर्वांना मोफत अन्न देणाऱ्या धार्मिक आणि धर्मादाय संस्थांवरचा आर्थिक बोजा कमी करण्याच्या उद्देशानं ही योजना तयार केली आहे.

****



 खोट्या बातम्या अथवा फेकन्यूज संदर्भात लोकांमध्ये जास्तीत जास्त जागृती करणं आवश्यक असून, बातम्यांची सत्यता तपासून त्या लोकांसमोर आणण्याचं काम पत्रकारांनी करावं, असं आवाहन महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत यांनी केलं आहे. मुंबईत काल फेकन्यूज संदर्भात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. गेल्या आठ ते दहा वर्षात समाज माध्यमांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, मात्र, त्याचा योग्य वापर करण्याचं तंत्र अद्याप विकसित झालं नसल्याचं त्यांनी नमूद केलं. यासंदर्भात काल औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, वाशिम इथंही कार्यशाळा घेण्यात आल्या.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ११ लाख एक हजार ७५० शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन विमा हप्ता भरून खरीप हंगामातील पिके संरक्षित केली आहेत. ऑफलाइन अर्जाची संख्या अजून निश्चित झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 राज्य शासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात उद्दिष्टाच्या दुप्पट म्हणजे ५८ लाख ३४ हजार ६३२ वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात लोकसहभाग वाढवण्यासाठी हरित सेनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या नोंदणी मोहिमेतही जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

****



 बुलडाणा जिल्हयातल्या तीन वेगवेगळया अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. देऊळगाव राजा तालुक्यातल्या अंचरवाडी फाट्यानजीक बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत सिंदखेडराजा जालना रस्त्यावर खासगी बस आणि दुचाकीमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तिसरा अपघात मेहकर नजीक परतापूर इथं झाला. कारनं दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला. 

****



 बीड जिल्ह्याचं विभाजन करून, अंबाजोगाई जिल्हा निमार्ण करण्यासंदर्भात अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीनं आपला अहवाल शासनाकडे सादर केला आहे. या अहवालाची तपासणी करून, जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. यासंदर्भात जारी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

****



 चीनमधल्या नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी पी.व्ही.सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांच्यासह सहा भारतीय खेळाडू आज खेळणार आहेत. माहिला एकेरीत सिंधू दक्षिण कोरियाच्या सुंग-जी-हून हिच्या विरुद्ध खेळेल, तर सायना नेहवाल थाई रचनोक इंटानोन हिच्या विरुद्ध खेळेल. पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना मलेशियाच्या ल्यू डॅरेन याच्याशी, तर साई प्रणितचा सामना डेन्मार्कच्या हंस-क्रिस्तिअनशी होणार आहे. मिश्र दुहेरीत आश्विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज मेलेशियाच्या शेवॉन लाई आणि गोह सून हुआन यांच्या विरुद्ध खेळणार आहेत.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...