Thursday, 2 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 लोकसभेत आज मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणारं विधेयक सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं सर्व खासदारांना व्हीप जारी करुन सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. 

****



 २०१३ ते २०१७ या काळासाठी सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कारांचं वितरण काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालं. २०१३ साठी नजमा हेपतुल्ला, २०१४ साठी हुकुमदेव नारायण यादव, २०१५ साठी गुलाम नबी आझाद, २०१६ साठी दिनेश त्रिवेदी, तर २०१७ साठी भर्तृहरी मेहताब यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जनता आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधींकडे आशेनं पाहत असतात, याकडे राष्ट्रपतींनी यावेळी लक्ष वेधलं. सरकारकडून अधिक प्रतिसाद मिळावा यासाठी विरोधी पक्षांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, अशी अपेक्षा राज्यसभेचे सभापती, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.

****



 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठीचे ऑनलाईन अर्ज येत्या सत्तावीस तारखेपर्यंत करता येणार आहेत. परीक्षा शुल्क येत्या तीस तारखेपर्यंत भरता येईल. या परीक्षेसाठीचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनं, सी टी ई टी डॉट एन आय सी डॉट इन, या संकेतस्थळावरून भरायचे आहेत.

****





गावखेड्यांना दर्जेदार रस्त्यांनी जोडण्याच्या उद्देशानं राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांची वेळेत पूर्तता करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. या योजनेसंदर्भात काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. प्रशासकीय कामे पूर्ण करुन त्यानंतर रस्त्यांची प्रत्यक्ष बांधकामं अधिक गतीनं पूर्ण करावीत, असं त्यांनी सांगितलं.

****



 हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातला कनिष्ठ सहाय्यक राजाराम मुंडे यांना चार हजार रूपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. रजा मंजुरीच्या आदेशाची संचिका आणि सेवा पुस्तिका, गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...