Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 21 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१
ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.
****
v नद्या जोड प्रकल्पांवर संबंधित राज्यांच्या सहमतीची आवश्यकता केंद्रीय जलसंपदा
मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त
v केंद्र आणि राज्य सरकारविरोधात येत्या ३१ ऑगस्टपासून काँग्रेस
पक्षाची जनसंघर्ष यात्रा
v मराठवाड्यात पाऊस पुन्हा सक्रीय; नांदेड सह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत
आणि
v आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताची दोन सुवर्ण आणि दोन रौप्य
पदकांची कमाई
****
नद्या जोड प्रकल्पांवर संबंधित राज्यं सहमत होणं
आवश्यक असल्याचं मत केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. याबाबत
एकमत झालं तर, समुद्राला जाऊन मिळणाऱ्या पाण्याचा वापर पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या
भागात करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत संबंधित राज्यांच्या प्रतिनिधींशी
संवाद साधतांना गडकरी बोलत होते. नद्या जोडणी प्रकल्प प्राधान्यानं राबवण्यात यावेत
यासाठी सर्व राज्यांनी सक्रीय विचार विनिमय करावा असं त्यांनी सूचवलं. राष्ट्रीय जलविकास
संस्थेकडे आतापर्यंत नऊ राज्यांनी, ४७ नदी जोड प्रस्ताव दाखल केले असल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास ग्रामीण कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती
बरोबरचं निर्यात वाढ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
****
केरळच्या
पूरग्रस्तांसाठी काल मुंबईहून वैद्यकीय मदतीसाठी आरोग्यमंत्री गिरिश महाजन यांच्यासह
९५ जणांचं पथक केरळला वायूदलाच्या विमानानं रवाना झालं या पथकामध्ये डॉक्टर आणि परिचारिकांचा
समावेश आहे. औषधी आणि अन्य गरजेच्या वस्तू या पथकासोबत पाठवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी
केरळमधल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून एका महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.
****
तंबाखुची सर्व उत्पादनं आणि सर्व सिगारेटच्या पाकिटांवर
आरोग्यास हानिकारक असल्याचा इशारा ठळकपणे देण्याबाबतचे नवीन नियम केंद्र सरकारच्या
आयुष मंत्रालयानं जारी केले आहेत. नवीन नियम १ सप्टेंबर पासून लागू होतील.
****
केंद्र सरकारनं आयकर नियमांमधल्या प्रस्तावित बदलांसंदर्भात
सामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. येत्या चार सप्टेंबर पर्यंत आयकर विभागाच्या
डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट इनकम टॅक्स इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेत स्थळावर
नागरिक आपल्या सूचना पाठवू शकतात, असं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं
आहे.
****
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी
वाजपेयी यांना काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाजपेयींचं
संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. भाजपचे
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, काँग्रेस
नेते गुलाम नबी आझाद, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख
अब्दुल्ला, बहुजन समाज पक्षाचे सतिशचंद्र मिश्रा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा,
पिपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या मेहबुबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तारीक
अनवर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, सर्वपक्षीय नेत्यांनी वाजपेयी यांना
श्रद्धांजली अर्पण केली.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची
जयंती काल देशभरात सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राजभवनात, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राजीव गांधी यांच्या
प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली आणि कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
मराठवाड्यात
औरंगाबाद, नांदेडसह सर्वच ठिकाणी राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. नांदेड
जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात येत्या ३१ ऑगस्टपासून
राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक
चव्हाण यांनी काल पुण्यात वार्ताहरांशी बोलतांना दिली. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं,
सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करण्यात भाजपला अपयश आलं, याच्या निषेधार्थ ही यात्रा असून,
कोल्हापूर इथून या यात्रेला प्रारंभ होऊन सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच
जिल्ह्यातून यात्रा मार्गक्रमण करेल, असं ते म्हणाले.
****
सनातन
संस्थेसंदर्भात राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. विचारवंतांच्या
हत्या प्रकरणात या संस्थेशी संबंधित लोकांना झालेली अटक लक्षात घेता राज्य सरकारनं
या संस्थेवर बंदी घालायला हवी, असं ते म्हणाले.
दरम्यान, डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या तसंच नालासोपारा अवैध स्फोटकं प्रकरणी जालन्यातून अटक केलेला
सनातन संस्थेचा कार्यकर्ता श्रीकांत पांगारकर याला, मुंबई सत्र न्यायालयानं २८ ऑगस्टपर्यंत
पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
ईद उल जुहा अर्थात बकरी ईद उद्या भक्तीभावानं
साजरी करण्यात येणार आहे. दिल्लीच्या जामा मशीदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या
नेतृत्वाखालील समितीनं ईद बुधवारी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनंही
बकरी ईदची सुटी उद्याचं जाहीर केली आहे.
****
मराठवाड्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. नांदेड
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आले आहेत. जिल्ह्यात दोन जण काल पुरात वाहून गेले, यापैकी
एक घटना हिमायतनगर तालुक्यात तर दुसरी हदगाव तालुक्यात घडल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. मुदखेड तालुक्यातल्या मेंढका गावचा महापुरामुळे संपर्क तुटला आहे या पावसामुळे
परभणी शहरात सखल भागात पाणी शिरलं तर हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं विविध राज्यातून आलेल्या
दीड लाखावर भाविकांनी नागनाथाच्या दर्शनासाठी भर पावसात रांगा लावल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. नादापूर ते औंढा मार्गावरची वाहतुक सुमारे तीन तास ठप्प होती. उस्मानाबाद
जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. लातूर जिल्ह्यातही अनेक भागात रिमझिम
पाऊस झाला. औरंगाबाद आणि जालना परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे.
****
इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा
स्पर्धेत काल भारतानं दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली. बजरंग पुनीयानं
पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटात तर महिलांच्या कुस्तीमध्ये विनेश फोगाटनं ५० किलो वजनी
गटात सुवर्ण पदक जिंकलं. नेमबाजीत ट्रॅप प्रकारात लक्ष्य शोराणनं, तर १० मीटर एयर रायफल
प्रकारात दीपक कुमारनं रौप्य पदक जिंकलं.
****
लातूर जिल्हा बॅडमिंटन संघटना आणि दयानंद कला महाविद्यालयाच्या
वतीनं घेण्यात येत असलेल्या, वरिष्ठ आंतर जिल्हा,
आणि राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन, काल आमदार अमित देशमुख यांच्या
हस्ते करण्यात आलं. राज्यातल्या २४ जिल्ह्यांतले एकूण ३६७ बॅडमिंटन पटू या स्पर्धेत
सहभागी झाले आहेत.
****
औरंगाबाद
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या समांतर जलवाहिनीबाबत राज्य शासन लवकरचं निर्णय घेणार असल्याचं
पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत
ते काल बोलत होते. यावेळी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
****
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजने
मधून जालना, मंठा, परतूर तालुक्यातल्या ९२ गावांसाठी एकत्रित ग्रीड पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.
जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली.
****
औरंगाबाद महानगरपालिकेतले एम आय एम पक्षाचे नगरसेवक
सय्यद मतीन यांना मारहाण प्रकरणी उपमहापौरांसह भारतीय जनता पक्षाच्या पाच नगरसेवकांना
काल पोलिसांनी अटक केली, त्यानंतर या सर्वांना जामिनावर सोडण्यात आलं. यामध्ये उपमहापौर
विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, रामेश्वर भादवे आणि माधुरी अदवंत
यांचा समावेश आहे.
****
राज्य मागासवर्गीय आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भातला
अहवाल लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी नांदेडचे आमदार डी.पी.सावंत यांनी केली आहे. सावंत
यांनी काल राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, निवृत्त न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांची
मुंबईत भेट घेऊन ही मागणी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिराच्या,
११२ कोटी ४१ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंबधीचा
शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. आराखड्यातल्या कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी
औरंगाबादचे जिल्हाधिकारी संनियंत्रण अधिकारी असतील.
****
माणुसकी हीच जात, मानवता हा धर्म, आणि राज्यघटना
ग्रंथ प्रमाण मानून, मुस्लिम, मागासवर्गियांना संघटीत करा, असं आवाहन, बहुजन समाज पक्षाचे
महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैन्ना यांनी केलं आहे. जालना जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या
वतीनं काल जालना इथं राजर्षी शाहु महाराज, आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या
अनुषंगानं आयोजित संविधान बचाव मेळाव्यात ते काल बोलत होते.
****
कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचं सरकार नसल्यानंच,
डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे सापडले. महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार
असल्यानेच ते शक्य झाले नाही, अशी टीका, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला विद्यार्थी
नेते कन्हैया कुमार यानं काल नाशिकमध्ये केली. नाशिक इथं, दाभोलकर स्मृती व्याख्यानमालेत
व्याख्यान देण्यापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment