Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी
वाजपेयी यांना आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. वाजपेयींचं
संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. भाजपचे
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गृहमंत्री
राजनाथ सिंग, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी आतापर्यंत वाजपेयी यांना श्रद्धांजली
अर्पण केली. सध्या ही श्रद्धांजली सभा सुरू असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,
नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, बहुजन समाज पक्षाचे सतिशचंद्र मिश्रा, भारतीय कम्युनिस्ट
पक्षाचे डी राजा, पिपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या मेहबुबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे तारीक अनवर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, सर्वपक्षीय नेत्यांनी
वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी
यांची जयंती आज देशभरात सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राजभवनात, तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला
पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली आणि कर्मचाऱ्यांना
सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
यानिमित्त आज नांदेड इथं जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं होतं. नांदेडच्या के टी मेवावाला महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या
वतीनं सद्भावना दिवस साजरा करण्यात आला.
****
केंद्र सरकारनं आयकर नियमांमधल्या प्रस्तावित बदलांसंदर्भात
सामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. येत्या चार सप्टेंबर पर्यंत आयकर विभागाच्या
डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट इनकम टॅक्स इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेत स्थळावर
नागरिक आपल्या सूचना पाठवू शकतात, असं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं
आहे.
****
दिल्ली
इथल्या केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांना येत्या बुधवारी २२ तारखेला बकरी ईद निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या अगोदर ही सुट्टी
गुरूवारी जाहीर करण्यात आली होती. देशात विविध शहरांमध्ये चंद्र दिसल्यामुळे दिल्लीच्या
जामा मस्जिदचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांच्या नेतृत्वाखालील समितीनं ईद बुधवारी
साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
केरळच्या
पूरग्रस्तांसाठी आज मुंबईहून वैद्यकीय मदतीसाठी आरोग्यमंत्री गिरिश महाजन यांच्यासह
९५ जणांचा समूह केरळला वायूदलाच्या विमानानं रवाना झाला. या समूहामध्ये डॉक्टर आणि
परिचारिकांचा समावेश आहे. औषधी आणि अन्य गरजेच्या वस्तू या समूहासोबत पाठवण्यात आल्या
आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी केरळमधल्या पूरसग्रस्तांना
मदत म्हणून एका महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम केरळच्या मुख्यमंत्री
निधीत जमा करण्यात येणार असल्याचं युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या समांतर जलवाहिनीबाबत राज्य शासन लवकरचं निर्णय घेणार असल्याचं
पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत
ते आज बोलत होते. यावेळी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या सालेगाव शिवारात
तहसिल कार्यालयाच्या गौण खनिज पथकानं कारवाई करत पूर्णा नदीतून भिंगी रेतीची चोरी करणारे
सहा ट्रक पकडले. या सहा वाहनांविरोधात आज कारवाई करण्यात आली असून, एकोणिस लाख रुपयांचा
दंड आकारण्यात आला.
****
इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रिडा
स्पर्धेत आज भारतानं दोन रौप्य पदकांची कमाई केली. नेमबाजीत ट्रॅप प्रकारात लक्ष्य
शोराणनं, तर १० मीटर एयर रायफल प्रकारात दीपक कुमारनं रौप्य पदक जिंकलं. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी दोन्ही नेमबाजांचं अभिनंदन केलं आहे.
महिलांच्या कुस्तीमध्ये विनेश फोगाटनं ५० किलो वजनी गटात
अंतिम फेरीत प्रवेश करुन भारताला आणखी एक पदक निश्चित केलं आहे. उपान्त्य फेरीत विनेशनं
उजबेकिस्तानच्या कुस्तीपटूचा पराभव केला. सुवर्ण पदकासाठी तिचा सामना जपानच्या युकी
इरी विरुद्ध होणार आहे. साक्षी मलिक आणि पुजा धानदाचा उपान्त्य फेरीत पराभव झाला. कांस्य
पदकासाठी साक्षीचा सामना कोरियाच्या रिम जोंग सिम विरुद्ध होणार आहे
****
मराठवाड्यात काल रात्रीपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला
आहे. नांदेड, लातूर, परभणी,उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात आज पावसानं हजेरी लावली.
परभणी जिल्ह्यात आज सकाळपासूनच दमदार पाऊस सुरु आहे. या
पावसामुळे परभणी शहरात सखल भागात पाणी शिरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर
शहरात आज सकाळी ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
औरंगाबाद शहर आणि परिसरातही आज समाधानकारक पाऊस झाला.
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी सध्या ३२ टक्क्यांपर्यंत गेली आहे.
नांदूर मधमेश्वर धरणातून १२ हजार ५३ घनफूट प्रतिसेकंद तर ओझर बंधाऱ्यातून पाच हजार
सहाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी जायकवाडी धरणामध्ये येत असल्याची माहिती पाटबंधारे
विभागानं दिली आहे.
//************//
No comments:
Post a Comment