Monday, 20 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.08.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.

**** 

vदाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अणदुरेला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी; जालन्यातला माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यालाही अटक 

vजातीय राजकारणातून भाजप, जनतेची फसवणूक करत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

vअंबाजोगाई इथं आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्राची स्थापना

vआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाला सुवर्णपदक

आणि

vनॉटिंगघम कसोटी सामन्यात भारताकडे २९२ धावांची आघाडी

****



 अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अणदुरे याला २६ ऑगस्टपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. अणदुरेला गेल्या चौदा तारखेला दहशतवाद विरोधी पथकानं औरंगाबाद मधून ताब्यात घेतलं होतं, सखोल चौकशीअंती शनिवारी रात्री त्याला अटक करण्यात आली होती, काल रविवारी त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. अणदुरे यानं महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून नेमबाजीचं प्रशिक्षण घेतलं असून, वीरेंद्र तावडे हाच दाभोलकर हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं, सीबीआयनं न्यायालयाला सांगितलं.



 दरम्यान, दहशतवाद विरोधी पथकानं या प्रकरणी जालन्यातून ताब्यात घेतलेला माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यालाही काल अटक करण्यात आली. दाभोलकर यांच्या हत्येवेळी पांगारकर सोबत असल्याची माहिती, सचिन अणदुरेनं दिल्यानं, ही कारवाई केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.



 डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लातूर शहरातल्या गांधी चौकात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संस्था-संघटनांच्या वतीनं काल ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथंही डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मशाल मोर्चा काढण्यात आला.

****



 केरळच्या पूरग्रस्तांसाठी काल मुंबईहून तीस टनांहून अधिक उपयोगी साहित्य पाठवण्यात आलं. वायूदलाच्या विमानातून हे साहित्य केरळकडे रवाना झालं. परवा समुद्र मार्गे साडे सहा टन मदत साहित्य पाठवण्यात आलं होतं, आज सकाळी आणखी पाच टन, साहित्य केरळला पाठवलं जाणार आहे. याशिवाय, राज्यभरातल्या विविध सामाजिक संघटनांनी गोळा केलेली ४० टन सामग्रीही केरळला पाठवण्यात आली आहे. केरळ सरकारने मागवलेल्या निकडीच्या बाबींचा यात समावेश असून, अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट, बेडशीट्स, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्य प्राधान्यानं पाठवलं जात आहे.

****



 जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या तंगधार क्षेत्रात सीमारेषेवर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव काल उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलाच्या जवानांनी काही दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं. परंतु, दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलानं ही कारवाई केली.

****



 माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं काल हरिद्वारला गंगा नदीत विसर्जन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. वाजपेयी यांच्या अस्थींचं विसर्जन देशातल्या शंभर नद्यांमध्ये करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 वाजपेयी यांना काल मराठवाड्यात अनेक ठिकाणी सर्वपक्षीय शोकसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. औरंगाबाद इथं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह विविध राजकीय पक्ष तसंच संघटनांच्या प्रतिनिधींनी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला.



 जालना इथं फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित या श्रद्धांजली सभेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.



 उस्मानाबाद इथं आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत आमदार मधुकर चव्हाण, आमदार सुजितसिंह ठाकूर, यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अटलजींच्या स्मृतींना उजाळा दिला. मराठवाडा साहित्य परिषदेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच ग्राहक पंचायत, जिल्हा व्यापारी संघातर्फेही वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

****



 भारतीय जनता पक्ष जातीय राजकारण करत असून, जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. गोंदिया इथं काल पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होणार असून, सत्ताही याच पक्षांची असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप मात्र नागरिकांना खोटी आश्वासनं देऊन परत सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ ऑगस्टला रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा सत्तेचाळीसावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार ‘एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य’ या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. या केंद्राच्या संचालकपदी मराठीचे प्राध्यापक, विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉक्टर मुंजा धोंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे सुरु करण्यात आलेल्या या केंद्रात विविध कार्यक्रम आणि अनेक विषयांवरच्या परिषदांसह संशोधनकार्य होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 कोयना आणि कृष्णा नदीचं पाणी टप्प्याटप्प्यानं मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात स्थापन अभ्यास गटावरत आमदार सुजितसिंह ठाकूर यांची समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. या योजनेमुळे मराठवाड्यात दोन हजार तीनशे पन्नास दशलक्ष घनमीटर  पाणी उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यातल्या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



****



इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियानं सुवर्णपदक पटकावलं. बजरंगनं ६५ किलो वजनीगटात जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ अशा फरकानं हरवलं. भारताचं या स्पर्धेतलं यंदाचं हे पहिलंच सुवर्णपदक आहे. नेमबाज अपूर्वी चंदेला आणि रविकुमार यांनी दहा मीटर रायफल मिश्र सांघिक प्रकारात काल कांस्य पदक पटकावलं. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्यांचं अभिनंदन केलं.



 जलतरण स्पर्धेत सजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली. सजननं पुरूषांच्या दोनशे मीटर बटरफ्लाय प्रकारात, तर नटराजनं शंभर मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे. रोईंग स्पर्धेत ओम प्रकाश-सवर्ण सिंग या जोडीसह मलकीत सिंग - गुरींदर सिंग जोडीनंही अंतिम फेरीत प्रवेश केला.



 कबड्डीमध्ये भारतीय महिला संघानं जपानचा ४१ - १२ असा, तर पुरुष संघानं बांग्लादेशचा पराभव केला.



 ऑलिंपिक रौप्य पदक विजेत्या सुशील कुमारला मात्र पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.

****



 भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये नॉटिंगघम इथं सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या क्रिकेट कसोटी मालिकेत, तिसऱ्या सामन्यात काल दुसऱ्या दिवस अखेर भारतानं २९२ धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं दुसऱ्या डावात दोन बाद १२४ धावा केल्या. त्याआधी काल इंग्लंडचा पहिला डाव सर्वबाद १६१ धावात संपुष्टात आला. यात हार्दिक पंड्यानं घेतलेल्या पाच बळीचं योगदान महत्वाचं ठरलं. चेतेश्वर पुजारा ३३ आणि विराट कोहली आठ धावांवर खेळत आहेत.

****



 महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुणे इथं संघटनेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड झाली. संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष आहेत.

****



 श्रावण महिन्यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ आणि खुलताबाद इथं येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेत, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. औरंगाबादहून खुलताबाद, वेरुळकडे जाणारी सर्व जड वाहनं दौलताबाद टी पॉईंट पासून कसाबखेडा मार्गे कन्नडकडे जातील आणि कन्नडहून औरंगाबादकडे येणारी सर्व जड वाहनं कसाबखेडा, दौलताबाद टी पॉईंट मार्गे औरंगाबादकडे जातील. श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत दौलताबाद टी पॉईंट पासून वेरूळ पर्यंत तसंच फुलंब्रीकडून खुलताबादकडे जाणारी सर्व जड वाहनं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह यांनी दिले आहेत. वाहतूक व्यवस्थेतला बदल हा येत्या नऊ सप्टेंबरपर्यंत लागू राहील.

****



 औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे घेण्यात येणारा हेरिटेज वॉक काल औरंगाबादच्या ऐतिहासिक पाणचक्की इथं पार पडला. इतिहास तज्ज्ञ डॉक्टर दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी इतिहासप्रेमींना या स्थळाची माहिती आणि स्थापत्यशैलीचं महत्त्व सांगितलं. यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****



 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काल औरंगाबाद इथं त्यांच्या समग्र साहित्याचं दर्शन घडवणारा स्वच्छंद हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होत.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...