Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 2 August 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.००
****
राष्ट्रीय
मागासवर्गीय आयोगाला वैधानिक दर्जा देण्याची तरतूद असलेल्या १२३व्या घटना दुरूस्ती
विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू झाली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लोकसभेनं हे विधेयक
पारित केलं होतं, मात्र ऑगस्ट महिन्यात राज्यसभेनं काही सुधारणांसह हे विधेयक पारित
केल्यानंतर, ते परत मंजुरीसाठी लोकसभेकडे पाठवण्यात आलं. तृणमूल काँग्रेसचे कल्याण
बॅनर्जी यांनी या विधेयकाचं स्वागत करत, सरकारनं आयोगाचं गठण करताना त्यामध्ये अध्यक्ष
आणि सदस्य इतर मागसवर्गीय संवर्गातले राहतील याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.
बीजु जनता दल आणि तेलंगणा राष्ट्र समितीनंही या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. देशातल्या
इतर मागसवर्गीयांच्या लोकसंख्येची माहिती देण्यासाठी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक
करण्याची मागणी, तेलगु देसम पक्षाचे सदस्य राम मोहन नायडू यांनी केली.
****
भारताला
निर्मिती केंद्र बनवण्यासाठी पादत्राण उद्योगाचा विस्तार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय
वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारत आंतरराष्ट्रीय
पादत्राण प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. जागतिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी
सध्याच्या पादत्राण उद्योगाचं आधुनिकीकरण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
मराठा
समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया
लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा
आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुंबईत आज विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची बैठक
घेण्यात आली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक
असून, कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आंदोलनामध्ये
हिंसाचार न करण्याचं, तसंच कोणत्याही व्यक्तीनं आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल न उचलण्याचं
आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
दरम्यान,
मराठा आरक्षणासंदर्भात सरकार लेखी स्वरुपात ठोस निर्णय देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे
घेतलं जाणार नाही, असं मराठा क्रांती मोर्चानं स्पष्ट केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या
परळी इथं मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हानिहाय समन्वयकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. आरक्षणाबाबत येत्या सात ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा नऊ ऑगस्टपासून राज्यभर
ठिय्या आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठा आरक्षणासाठी
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली मंत्रिमंडळाची
उपसमिती रद्द करुन, सर्व निर्णय स्वत: मुख्यमंत्र्यांनी घ्यावे, अशी मागणीही यावेळी
करण्यात आली. या आंदोलनादरम्यान सरकारी तसंच खासगी मालमत्तेला नुकसान न पोहोचवण्याचं,
तसंच हिंसाचार न करण्याचं आवाहनही मराठा क्रांती मोर्चानं केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज नांदेड जिल्ह्यातल्या मालेगाव इथं नांदेड औरंगाबाद
मार्गावर रस्ता रोको आंदोलन, तर नायगाव इथं आमदार वसंतराव चव्हाण यांच्या घरासमोर घंटानाद
आंदोलन करण्यात आलं.
धुळे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सलग तेराव्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरु आहे.
****
राज्य
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी
घोषित करण्यात आलेल्या विशेष पॅकेजची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुंबई इथं यासंबंधीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
२२ हजार १२२ कोटी रुपयांचं हे पॅकेज असून, यासाठी हिवाळी अधिवेशनात निधी उपलब्ध करुन
देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबादच्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तात्काळ
सोडवण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं आज विद्यापीठात निदर्शनं करण्यात
आली. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांना देण्यात आलं.
****
मराठा,
मुस्लिम, धनगर, कोळी समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या
वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण करण्यात आलं. यावेळी आमदार अब्दुल
सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार कल्याण काळे, सेवा दलाचे विलास औताडे यांच्यासह
पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
चीनमधल्या
नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या
अश्विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज
झालेल्या उप उपान्त्यपूर्व फेरीत या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा २० - २२, २१ - १४, २१
- सहा असा पराभव केला. पी व्ही सिंधू, बी साई प्रणित आणि के श्रीकांत यांचेही आज उपउपान्त्यपूर्व
फेरीतले सामने होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment