Saturday, 4 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.08.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ ऑगस्ट २०१ सकाळी .५० मि.

****

v जळगाव आणि सांगली-मिरज- कुपवाड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

v मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकांची येत्या मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

v स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणारं रॅकेट उघड

 आणि

v बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन कृषी अधीक्षकावर शिस्तभंगाची कारवाई

****



 जळगाव आणि सांगली -मिरज - कुपवाड या दोन्ही महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. ७५ जागा असलेल्या जळगाव महानगरपालिकेत भाजपनं ५७ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेला अवघ्या १५ जागांवर समाधान मानावं लागलं. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या एमआयएमनं या निवडणुकीत तीन जागांवर विजय मिळवला आहे. या विजयामुळे जळगाव महानगरपालिकेवरचं आमदार सुरेश जैन यांचं गेल्या तीस वर्षांपासूनचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. 



 सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांपैकी ४१ जागांवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला, तर ३५ जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.



 दरम्यान, भाजपला मिळालेलं हे यश म्हणजे जनतेनं विकासाला दिलेला कौल असून, या विजयाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. तर जनतेचा भाजपवर विश्वास असल्याचं या निकालातून स्पष्ट होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****



 केंद्र सरकार कोणत्याही वृत्तवाहिनीच्या कामात दखल देत नसल्याचं, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी नमूद केलं आहे. काल लोकसभेत, शून्यप्रहरात, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर ते बोलत होते. खासगी वृत्तवाहिनीच्या अंतर्गत निर्णयांसाठी सरकारला जबाबदार धरणं योग्य नसल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.



 राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक २०१८ लोकसभेत काल पारित करण्यात आलं. देशातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ मणिपूर इथं उभारण्याचं या विधेयकात प्रस्तावित असल्याची माहिती क्रीडा राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी दिली.

****



 प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै अखेरपर्यंत एकूण ३२ कोटी १७ लाख खाती उघडण्यात आली असून यामध्ये ८० हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिवप्रकाश शुक्ला यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली.

****



 प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत राज्यात जुलै २०१८ अखेरपर्यंत ५७ हजार ४४३ कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक कर्ज प्रकरणं मंजूर करण्यात आली असून, तरुणांना सर्वाधिक १६ हजार २५९ कोटी रुपयांचं कर्ज वितरित करून देशात, महाराष्ट्र अव्वल राज्य ठरलं आहे.

****



 क्रीमीलेअर संदर्भात सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गाच्या निर्धारीत प्रतिनिधीत्वाबाबत माहिती का उपलब्ध नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भातल्या याचिकांवर काल घटनापीठापुढे झालेल्या सुनावणीत न्यायालयानं ही विचारणा केली. सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीत अनुसूचित जाती - जमातीच्या कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्यापूर्वी, राज्यांनी ते मागासवर्गीय असल्याचं तसंच यासंदर्भात २००६ मध्ये दिलेला निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध करावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****



 मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांची येत्या मंगळवारी सात तारखेला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी ही सुनावणी १४ ऑगस्टला होणार होती. राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या सुरू असलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं या याचिकांची सुनावणी जलद गतीनं घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती, दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून आतापर्यंत राज्यात सात जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

****

 मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी येत्या ८ ऑगस्टला राज्यातल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामा देणार असल्याचं गेल्या आठवड्यात जाहीर केलं आहे, मात्र या बैठकीनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

****



 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.



****



 भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाचा १ ९ ४ ७ हाच टोल फ्री क्रमांक असल्याचं  प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून हाच क्रमांक कार्यरत असल्याचं प्राधिकरणातर्फे सांगण्यात आलं आहे.

*****



 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणारं रॅकेट उघडकीस आलं आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची चौकशी करून संबधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी युवासेनेचे सहसचिव आणि अधिसभेचे सदस्य सुरज दामरे यांनी केली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या संदर्भात कुलगुरूंनी दखल घेतली नसल्यानं राज्यपालांकडे तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलं. तपासलेल्या उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लाऊन पुन्हा त्या उत्तरपत्रिका दुसऱ्याच मॉडरेटरकडून तपासून घेणे आणि गुण वाढवून घेणे असे धक्कादायक प्रकार विद्यापीठात होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या सात कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन कृषी अधीक्षक रमेश भताने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश कृषी विभागाने कृषी आयुक्तांना दिले आहेत. याच आदेशात उपविभागीय कृषी अधिकारी बी.एच.फड यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचं म्हटलं आहे.



 दरम्यान, परळी, अंबाजोगाई इथल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आल्यानं या पूर्वीच कृषी विभागातील २४ अधिकारी-तसंच कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 इंग्लंडविरूद्धचा पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला ८४ धावांची गरज आहे. काल इशांत शर्मानं पाच, रविचंद्रन आश्विननं तीन तर उमेश यादवनं दोन गडी बाद करत इंग्लंडचा दुसरा डाव १८० धावांवर संपुष्टात आणला. पहिल्या डावात इंग्लंडला १३ धावांची आघाडी मिळाली होती. अंधुक प्रकाशामुळे काल निर्धारीत वेळेपूर्वीच खेळ थांबवण्यात आला, तेव्हा भारतीय संघाच्या पाच बाद ११० धावा झाल्या होत्या, विराट कोहली ४३ तर दिनेश कार्तिक १८ धावांवर खेळत आहे.  

****



 टेनिसपटू पी.व्ही सिंधूने चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात सिंधूने जपानच्या नोजोमी ओकुहरावर सरळ दोन सेट्स मध्ये २१-१७, २१-१५ असा विजय मिळवला. सायना नेहवाल, बी साई प्रणित यांच्यासह मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यांचं आव्हानही काल संपुष्टात आलं.

****



 गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल क्रीडा विभागाला दिले. यामध्ये ललिता बाबर, कुस्तीपटू राहुल आवारे यांच्यासह ३३ खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागात गट अ ते गट ड प्रवर्गात सामावून घेण्यात येणार आहे.

****





 ‘प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजने’च्या माध्यमातून जालना जिल्ह्यात मागील दोन वर्षात २२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन करण्यात आलं आहे. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनानं पन्नास टक्के अनुदान म्हणून ८१ कोटी २९ लाख रुपये जमा केले आहेत. कृषी सुक्ष्म सिंचन योजनेचा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना फायदा झाला असून, हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं आहे. जालना जिल्ह्यातल्या माळशेंद्रा इथले शेतकरी आनंद म्हस्के यांनी या योजनेविषयी त्यांचा अनुभव या शब्दात व्यक्त केला –

माझ्याकडे चार एकर शेती आहे. पूर्वी मी पिकांना मोकळं पाणी सोडायचो. त्यामुळे कपाशी आणि अन्य पिकंना योग्य  प्रमाणात पाणी मिळत नव्हतं. पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात होतं. मागील वर्षी मी प्रधानमंत्री कृषी सुक्ष्म सिंचन योजनेतून संपूर्ण चार एकरला ठिबक केलं. आता पिकांना नेमके मुळापाशी पाणी जाते. पाण्याचा अपव्यय कमी होतो. कापूस उत्पादनात एकरी ३ ते ४ क्विंटलमध्ये वाढ झाली आहे.  ठिबक सिंचनासाठी मला एक लाख चाळीस हजार रूपये खर्च आला. त्यामधून ७३ हजार रूपये शासनाकडून अनुदान मिळाले. एकंदरीतच या योजनेमुळे माझी शेती सिंचन खाली आली असून उत्पादनात वाढ झाली आहे. शासनांच्या या योजनेचा मला खूप फायदा झाला आहे.

****



जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी, अंबड आणि परतूर या तालुक्यांसाठी कालपासून पैठणच्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलं. सध्या पावसानं खंड दिल्यानं सिंचनासाठी पाणी सोडण्याचे निर्दश पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले होते.

****

 औरंगाबाद इथं महाराष्ट्र मुस्लीम समाज समितीच्यावतीनं मुस्लीम समाजाला स्थायी स्वरूपी आरक्षण आणि प्रस्तावित मेगा नोकरी भरतीत पाच टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 10 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...