Tuesday, 18 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 वाराणसी मध्ये वाहतूक व्यवस्थेत झालेल्या सकारात्मक बदलामुळे पर्यटकांची संख्या वाढली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं आज ५०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. जुन्या काशी मध्ये एकात्मिक वीज प्रकल्प आणि बनारस हिंदू विद्यापीठात उभारलेल्या अटल उद्योग संगोपन केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी आज केलं. वाराणसीत एलईडी बल्बचा वापर वाढला असून, वीज देयकात्यामुळे मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. वाराणसीच्या विकासाला नवीन दिशा देण्यात, पलं सरकार यशस्वी ठरलं असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं.

****



 वायूदलाच्या राफेल विमान खरेदी कराराला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे. या याचिकेवरची सुनावणी आता दहा ऑक्टोबरला होणार आहे. याचिकाकर्त्याला यासंदर्भात काही अतिरिक्त कागदपत्रं न्यायालयाकडे सादर करायची असल्यानं, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती नवीन सिन्हा, आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या पीठानं हे निर्देश दिले.

****



 भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पाच कार्यकर्त्यांच्या अटकेचं समर्थन करणारी काही कागदपत्रं आहेत का याची चाचपणी आपण दोन दिवस करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं. या पाच कार्यकर्त्यांना त्यांच्या घरातच नजर कैदेत ठेवलं आहे. त्यात आणखी दोन दिवसांची वाढ केल्याचं सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या पीठानं सांगितलं. या कार्यकर्त्यांच्या अटकेचा स्वतंत्रपणे तपास व्हावा आणि त्यांची त्वरित सुटका व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. जर तपासात काही चुका असतील तर विशेष तपास पथकामार्फत चौकशीचा विचार करू, असं न्यायालयानं सांगितलं.

****



 दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्यावर हल्ल्याप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया आणि आम आदमी पक्षाच्या ११ आमदारांना समन्स बजावलं आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रकाश यांच्यावर हल्ला केल्याचा या सर्वांवर आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात १३ ऑगस्टला आरोपपत्र दाखल केलं होतं.  

****



 शिक्षणक्षेत्रात केलेली गुंतवणूक ही देशाच्या भविष्यासाठी असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या हिस्लॉप महाविद्यालयाच्या स्थापनेला दोनशे वर्षं झाल्याच्या निमित्तानं कार्यक्रमात ते काल बोलत होते. विद्यापीठ अनुदान आयोगानं हिस्लॉप महाविदयालयाला वारसाचा दर्जा दिला आहे. या कार्यक्रमात स्मरोणोत्सवार्थ हिस्लॉप महाविदयालयाच्या विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि गडकरी यांच्या हस्ते झालं.

****



 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्तिमत्व विकासातून भेदभावरहित आणि समानतेवर आधारित सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी कार्यरत असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या भविष्यातला भारत-संघाच्या नजरेतूनया विषयावरच्या तीन-दिवसीय व्याख्यानमालेत ते बोलत होते. संघाची स्थापना हिंदूंना एकत्र आणण्यासाठी झालेली असली, तरी त्याचा अर्थ इतर धर्मियांना विरोध करणं, असा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. संघाचं कार्य आणि कार्यपद्धती अतुलनीय असल्याचं सांगून, भागवत यांनी, संघाविषयीच्या गैरसमजुतींबाबत खुलासा करणारे मुद्दे यावेळी मांडले.

****



 सातारा जिल्ह्यातील औंध पोलीस स्टेशनमधील उप निरीक्षक श्रीकांत देव याला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. चोरीस गेलेली म्हैस शोधून दिल्याबद्दल त्यानं ही लाच मागितली होती.

****



 जळगाव जिल्ह्यात पाचोरा नजिक काल हुबळी - वाराणसी या साप्ताहिक रेल्वेची काही चाकं रुळावरून उतरल्यानं, या मार्गावरची वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत झाली. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही, मात्र मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांना सुमारे दोन तास उशीर झाला. 

****



 आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत काल अफगाणिस्तान संघानं पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या श्रीलंकेचा ९१ धवांनी पराभव केला.

****



 चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला चांगझू इथं आजपासून सुरुवात होत आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी.वी सिंधू आणि सायना नेहवाल एकेरीमध्ये आज आरंभ फेरीत खेळतील.

*****

***

No comments: