Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
स्थानिक
स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुकांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी
एका वर्षाची मुदत
§
पीक
विमा योजनेअंतर्गत विम्याचे दावे निकाली काढण्यास विलंबप्रकरणी दंडाची तरतूद
§
ज्येष्ठ
शिक्षणतज्ज्ञ वि वि चिपळणूकर यांचं निधन
§
कन्नड-सोयगावचे
आमदार हर्षवर्धन जाधव यांची नवीन पक्षाची घोषणा
आणि
§
आशिया
चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची हाँगकाँगवर मात करत विजयी सलामी
****
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडणूक
लढवण्यास इच्छुक उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मुदत
देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यापूर्वी हा कालावधी सहा महिने इतका
होता. या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द
करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं, राज्यातल्या सुमारे नऊ हजार लोकप्रतिनिधींचं
पद धोक्यात आलं, जात पडताळणी समितीपुढे कामाचा ताण असल्यानं ही मुदतवाढ देण्याचा निर्णय,
काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मात्र, या सदस्यांना उमेदवारी अर्ज भरताना पडताळणी
समितीकडे केलेल्या अर्जांची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा सादर करणं गरजेचं असणार आहे.
आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत वैद्यकीय सेवा गट
‘अ’ संवर्गातल्या अधिकाऱ्यांची पदं, राज्य लोक सेवा आयोगाऐवजी, निवड मंडळामार्फत भरण्याचा
निर्णयही यावेळी घेण्यात आला.
व्यापार सुलभता धोरणानुसार महाराष्ट्र मूल्यवर्धित
कर अधिनियम दोन हजार दोन अंतर्गत ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम
घेण्याची तरतूद रद्द करण्यासही, मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.
****
राज्याच्या
दौऱ्यावर आलेलं पंधराव्या वित्त आयोगाचं पथक
सध्या विविध पक्षांच्या भेटीगाठी घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या
भेटी दरम्यान, आर्थिक सुधारणांमध्ये आयोगानं
पक्षीय राजकारण करु नये असं आवाहन केलं. मराठवाडा आणि विदर्भासाठी विकासनिधी
वाढवून देण्याची मागणी पक्षानं आयोगाकडे केल्याचं, आमदार
जयंत पाटील यांनी सांगितलं. भारतीय
जनता पक्षानं मानव विकास निर्देशांकानुसार दहा मागास जिल्ह्यांसाठी विशेष निधीची
मागणी केली. तर शिवसेनेनं, ब्रिटीश काळातले कायदे बदलण्याच्या गरजेवर भर देत, कृषी
क्षेत्रासाठी विशेष तरतुदीची मागणी केली. फिक्की आणि सीआयआय या उद्योग संघटनांनी, उद्योगांना
उचित दरानं पतपुरवठा व्हावा, तसंच
वेगवेगळ्या मंजुऱ्या वेळेत मिळाव्यात, यादृष्टीनं
तरतूद करण्याची मागणी केली आहे.
****
विमा योजनेचे दावे निकाली काढण्यास विलंब करणारी
राज्यं आणि विमा कंपन्यांना दंड करण्याची तरतूद पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये केंद्र
सरकारनं केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार निर्धारित दोन महिन्याचा कालावधी समाप्त
झाल्यानंतर शेतकऱ्यांचा विम्याचा दावा निकाली काढतांना विमा कंपन्यांना विमा रक्कमेवर
१२ टक्के व्याज, दंड म्हणून देण्याची तरतूद नियमात करण्यात आली आहे. राज्य सरकारला
देखील निर्धारित तीन महिने कालावधीनंतर, मिळणाऱ्या अनुदानावर, १२ टक्के व्याज द्यावं
लागेल. एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रबीच्या हंगामापासून हे मार्गदर्शक तत्त्व लागू
होणार आहे.
****
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विद्याधर विष्णू उर्फ वि वि
चिपळूणकर यांचं काल सकाळी औरंगाबाद इथं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. राष्ट्रीय
शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणून अनेक वर्ष काम केलेल्या चिपळूणकर यांनी,
राज्याचे शिक्षण संचालक तसंच बालभारतीचे संचालक म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली.
शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी विविध अभिनव उपक्रम राबवणारे चिपळूणकर यांनी,
चिपळणूकर समितीच्या माध्यमातून मोलाचं योगदान दिलं. भगवद्गगीता तसंच संस्कृत भाषेचे
मोफत वर्गही त्यांनी चालवले. शिक्षण क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातून चिपळूणकर
यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी औरंगाबाद
इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा
औरंगाबाद शहराचे माजी महापौर सरदार
मनमोहनसिंग ओबेरॉय यांचं काल औरंगाबाद
इथं, हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. ओबेरॉय
यांनी, महापालिकेत विरोधी पक्षनेता,
सभागृहनेता, उपमहापौर तसंच महापौर म्हणून सक्षमपणे काम पाहिलं. औरंगाबाद इथल्या, गुरु तेग बहादूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. आज सकाळी अकरा
वाजता औरंगाबाद इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
ओबेरॉय यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी
हानी झाली, या शब्दात पदवीधर
मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी ओबेरॉय यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
सामाजिक विषमता दूर करण्यासाठी नव्या राजकीय पक्षाची
स्थापना करत असल्याची घोषणा औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड-सोयगावचे आमदार हर्षवर्धन
जाधव यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं मराठा समाजासह १८ पगड जातीच्या चिंतन बैठकीत
बोलत होते. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी स्वंतत्र
राजकीय पक्ष काढत असून, पक्षाचं नाव लवकरच जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यापुढे आपला शिवसेनेशी कुठलाही संबंध राहणार नसल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केलं.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा
२६ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारतानं प्रथम फलंदाजी करतांना ५० षटकांत ७
बाद २८५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हाँगकाँग संघाला ५० षटकात ८ बाद २४९ धावा करता
आल्या. शतकी खेळी करणारा भारताचा सलामीवीर शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानशी लढत होणार आहे.
****
लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या तीन शाळांना 'स्वच्छ
विद्यालय' या राष्ट्रीय पुरस्कारानं केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर
यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं गौरवण्यात आलं.
यावेळी देशभरातल्या ५२ शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र
आणि ५० हजार रूपये, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. लातूर जिल्ह्यातल्या दोन शाळांना
हा पुरस्कार मिळाल्यानं, या जिल्ह्याला विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
केंद्र सरकारच्या 'मिशन इंद्रधनुष्य' या योजनेअंतर्गत
उस्मानाबाद जिल्ह्यात बालकांना लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या
घाटंग्री प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य
सेविका कल्पना कुदळे यांनी याबाबत माहिती दिली.
माझं नाव कल्पना
मानिकराव कुदळे. आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र पोहणेर, उपकेंद्र घाटंग्री.
येथे 'मिशन इंद्रधनुष्य' हा कार्यक्रम आहे. तर याच्यामध्ये माझ्या उपकेंद्रामध्ये पेंन्टाचे नऊ बुशटर आणि एक गोवर एक, असे एकूण बारा
लाभार्थी राहिलेले होते. तर हे लाभार्थी बाहेरगावी असल्यामुळे, काही आजारी असल्यामुळे,
हे लाभार्थी राहिलेले होते. या सर्व लाभार्थींना 'मिशन इंद्रधनुष्य' या कार्यक्रमात बोलावून बारा लाभार्थींना डोस देण्यात
आले.
या योजनेच्या लाभार्थी बालकाच्या पालक सुप्रिया लाड
यांनी आपला अनुभव व्यक्त केला.
माझं नाव सुप्रिया
पांडुरंग लाड. राहणार घाटंग्री, जिल्हा उस्मानाबाद. मागच्या पाच तारखेला डोस होता पण मी येऊ शकले नाही.
आणि हा 'मिशन इंद्रधनुष्य' याच्या फायद्यामुळे
गेलेला डोस परत मिळाला. आणि म्हणून मी आभारी आहे.
****
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ
हिंगोली इथं काल काव्यांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अटलजी यांच्या जीवनावर प्रकाश
टाकणाऱ्या अनेक कविता सादर करण्यात आल्या.
****
उस्मानाबाद इथं काल राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त
पोषण मेळावा घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या हस्ते या मेळाव्याचं
उद्घाटन झालं. जिल्ह्यातल्या आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन पोषण आहाराबद्दल
मार्गदर्शन करावं, असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं. जिल्ह्यातल्या अंगणवाड्यांमध्ये
स्वच्छतागृह, पाणी, वीज, तसंच स्वयंपाकाच्या गॅसची व्यवस्था १४व्या वित्त आयोगाच्या
निधीतून करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
****
प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत अर्जदारांच्या
तक्रारीचं निवारण करण्यासाठी औरंगाबाद इथं समुपदेशन केंद्र उभारण्यात येणार असल्याची
माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. मुद्रा योजना समन्वय समितीची जिल्हास्तरीय
बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल झाली. त्यावेळी ते बोलत होते. हे समुपदेशन
केंद्र सुरू करणारा औरंगाबाद जिल्हा हा पहिलाच जिल्हा ठरणार आहे.
****
चीनमधल्या
चँगझू इथं सुरु असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला
एकेरीत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत
प्रवेश केला आहे. तर
सायना नेहवालचं या स्पर्धेतलं
आव्हान मात्र पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं. पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि सुमित
रेड्डी यांच्या जोडीनंही
दुसऱ्या
फेरीत प्रवेश केला.
****
जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय
जनता पक्षाच्या सीमा भोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सीमा भोळे यांनीच फक्त उमेदवारी
अर्ज दाखल केला होता. तर उपमहापौरपदी भाजपचेच अश्विन सोनवणे यांची निवड झाली.
*****
***
No comments:
Post a Comment