Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
पालिका
आणि ग्रामपंचायतींमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांचा कालावधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. यापूर्वी हा कालावधी सहा महिने इतका होता. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना
पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जांची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा सादर करणं गरजेचं असणार
आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द करण्याचे
आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं राज्यातल्या सुमारे नऊ हजार सदस्यांचं पद धोक्यात
आलं आहे. जात पडताळणी समितीपुढे कामाचा ताण असल्यानं मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आरोग्य
सेवा संचालनालयांतर्गत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ या संवर्गातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची
पदे एमपीएससी मधून वगळून निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. व्यापार
करण्यास सुलभता धोरणानुसार महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम दोन हजार दोन अंतर्गत
ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द करण्यासही
यावेळी मान्यता देण्यात आली. महानेट या भारतनेटच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या २६
जिल्ह्यांमध्ये ई-शासन सेवा वितरित करण्यास, केंद्र शासनाची राष्ट्रीय जल पर्यावरण
संरक्षण योजना-एन पी सी ए राज्यात राबवण्यास, तसंच पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या
सिंचन क्षेत्रासाठी उपयुक्त असलेल्या, कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी तीन हजार नऊशे
अठ्ठ्याहत्तर कोटी रूपयांचा निधी देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
****
राज्याच्या
दौऱ्यावर आलेलं पंधराव्या वित्त आयोगाचं पथक सध्या विविध पक्षांच्या भेटीगाठी घेत आहे.
आर्थिक सुधारणांमध्ये आयोगानं पक्षीय राजकारण करु नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसनं
केलं आहे. मराठवाडा आणि विदर्भासाठी विकासनिधी वाढवून देण्याची मागणी पक्षानं आयोगाकडे
केल्याचं, आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं. मानव विकास निर्देशांकानुसार दहा मागास
जिल्ह्यांसाठी विशेष निधीची मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. तर शिवसेनेनं, ब्रिटीश
काळातले कायदे बदलण्याच्या गरजेवर भर दिला असून, कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्याची
मागणी केली आहे. उद्योगांना उचित दरानं पतपुरवठा मिळावा, तसंच वेगवेगळया मंजुऱ्या वेळेत
मिळाव्या त्यादृष्टीनं तरतूद करण्याची मागणी फिक्की आणि सीआयआय या उद्योग संघटनांनी
केली आहे.
****
औरंगाबाद
शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय
यांचं आज सकाळी खाजगी रूग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ७० वर्षांचे
होते. ओबेरॉय हे गुरु तेग बहादुर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. उद्या सकाळी त्यांच्या
पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
दरम्यान,
ओबेरॉय यांच्या निधनामुळे औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी
झाली असल्याचं सांगून, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांना
श्रद्धांजली अर्पण केली.
****
उस्मानाबाद
इथं आज राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त पोषण मेळावा घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष
अर्चना पाटील यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. जिल्ह्यातल्या आशा आणि अंगणवाडी
कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन पोषण आहाराबद्दल मार्गदर्शन करावं, असं आवाहन पाटील यांनी
यावेळी केलं. जिल्ह्यातल्या अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह, पाणी, वीज, तसंच स्वयंपाकाच्या
गॅसची व्यवस्था १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी पोषणासंबंधी उपस्थित महिलांना
मार्गदर्शन केलं.
****
जळगाव
महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या सीमा भोळे यांची बिनविरोध निवड झाली
आहे. सीमा भोळे यांनीच फक्त उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर उपमहापौरपदी भाजपचेच
अश्विन सोनवणे यांची निवड झाली. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं
७५ पैकी ५७ जागा जिंकल्या आहेत.
****
माजी
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हिंगोली इथं आज काव्यांजली कार्यक्रम
घेण्यात आला. यावेळी अटलजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कविता सादर करण्यात
आल्या. नगरपरिषद अध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तानाजी मुटकुळे यावेळी उपस्थित होते.
****
चीनमधल्या
चँगझू इथं आजपासून सुरु झालेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारतीय
बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या पहिल्या फेरीत
सिंधूनं जपानच्या सीना कावाकामी हीचा २१ - १५, २१ - १३ असा पराभव केला. भारताची दुसरी
बॅडमिंटनपटू सायना नेहवालचं या स्पर्धेतलं आव्हान मात्र पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं
आहे.
****
No comments:
Post a Comment