Wednesday, 19 September 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.09.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

महाराष्ट्राच्या गरजा आणि राज्याची विकास क्षेत्रे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंधराव्या वित्त आयोगासमोर तर्काधारित सादरीकरण केलं. राज्याला नियमित स्वरूपात प्राप्त होणाऱ्या तरतुदींव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी ५० हजार कोटी तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समतोल सामाजिक-आर्थिक विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या विशेष सहाय्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी आयोगाकडे केली आहे. याशिवाय न्यायपालिकांचं व्यवस्थापन जलगतीनं होण्यासाठी आणि त्याठिकाणी अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक हजार सातशे कोटी, वन-वन्यजीव संरक्षण आणि राज्यातल्या हरित क्षेत्राचा विकास करण्यासाठी एक हजार १७७ कोटी, राज्यातील जैवविविधतेचं संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी, सागरी किनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठी एक हजार ४०० कोटी, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या, संरक्षित स्मारकांच्या, गड-किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी आणि सार्वजनिक नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी ८२५ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांनी आयोगासमोर मांडला आहे.

****

मराठवाडा आणि विदर्भात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही, पावसाची अशीच स्थिती कायम राहिली तर या भागातल्या १७ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा लागण्याची शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात यावर्षी सरासरीच्या खूप कमी पाऊस झाला असून, विभागात सध्या फक्त २८ पूर्णांक ८१ टक्के इतकाच पाणीसाठा असल्याचं जलसंपदा विभागाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात ४५ पूर्णांक ८८ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणात गेल्या वर्षी पुरेसा साठा झाला होता, मात्र ऊस लागवडीसाठी जास्तीचं पाणी वापरलं गेल्यानं यंदा मांजरा धरण कोरडं पडलं असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या चार वर्षात राज्यात जल संसाधन प्रक्रियेसाठी ६४ हजार कोटी रुपये खर्च केले, मात्र राज्याच्या सिंचन क्षमतेत काहीही वाढ झाली नसल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. या निधीच्या खर्चामध्ये काही अनियमितता असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्यातली फक्त १८ टक्के जमीन सिंचनाखाली असल्याचं पंधराव्या वित्त आरोगाच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे यासाठी तरतूद केलेल्या निधीचा वापर कुठे केला, याची चौकशी करावी, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

****

पुणे जिल्ह्यातल्या भिमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच मानवतावादी कार्यकर्त्यांच्या नजरकैदेत सर्वोच्च न्यायालयानं उद्यापर्यंत वाढ केली आहे. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र ती पुढे ढकलल्यानं नजरकैदेतही वाढ करण्यात आली.

****

महिलांनी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करावा आणि स्वावलंबी व्हावं, असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी इथं आज बचट गटातल्या महिलांशी त्या संवाद साधत होत्या. महिलांना व्यवसाय किंवा उद्योग उभारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं शेतीच्या कामात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी येत्या २४ आणि २५ सप्टेंबर रोजी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. शेतीसाठी ड़्रोनच्या वापराचं तंत्रज्ञान विकसित करणारे भारतीय विज्ञान संस्थेतले चार वैज्ञानिक दोन दिवस लोदगा इथं मुक्काम करुन ड्रोनचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन दाखवणार आहेत.

****

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ आज हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला असून, यावेळी सरकारवर टीका करण्यात आली.

****

हिंगोली जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं ग्रंथालय संदर्भातल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. ग्रंथालयांचं अनुदान दुप्पट करणं, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणं, नवीन ग्रंथालयांना मान्यता देणं, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

****

चीनमधल्या चॅंगझू इथं सुरु असलेल्या चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या पहिल्या पेरीत श्रीकांतनं डेन्मार्कच्या रासमूस गेमके याचा २१-नऊ, २१-१९ असा पराभव केला.

मिश्र दुहेरीतही सात्विक साईराज आणि अश्विनी पोनप्पा यांच्या जोडीनं पहिल्या फेरीत इंग्लंडच्या जोडीचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

****

No comments: