Saturday, 3 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 भारत आणि गिनी या राष्ट्रांमधे परस्पर संबंध आणि सहकार्य वृद्धींगत करण्यासाठीच्या अद्वितीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गिनीनं ’नॅशनल अ‍ॅवॉर्ड ऑफ मेरिट’ हा त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे. भारत आणि गिनी या दोन्ही राष्ट्रांमधल्या मैत्रीला हा पुरस्कार समर्पित करत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तत्पूर्वी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गिनीचे राष्ट्रपती अल्फा कोंडे यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावर व्यापक द्विपक्षीय चर्चाही झाली.
****

 अमरनाथ यात्रेकरूंसाठी जारी करण्यात आलेली मार्गदर्शिका ही केवळ सुरक्षेचा उपाय असल्याचं जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. त्यांनी राज्यातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज्यपालांनी काल रात्री सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेबाबत आणि इतर घटनांबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. जम्मू मधल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अमरनाथ यात्रा चार ऑगस्टपर्यंत स्थगित केली आहे.
****

 काश्मीर प्रश्नी कोणतीही चर्चा करायची झाली तर ती फक्त पाकिस्तानशी आणि  द्वीपक्षीय चर्चाच होईल, असं भारतानं काल अमेरिकेला ठणकावलं. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांच्याशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली. जयशंकर सध्या आशियायी-भारत मंत्री बैठकीसह विविध बैठकांसाठी थायलंडची राजधानी बँकॉक इथं उपस्थित आहेत. या बैठकांव्यतिरिक्त त्यांनी काल माईक यांच्याशीही चर्चा केली.
****

 जनतेचा पुन्हा जनादेश घेणं हेच महाजनादेश यात्रेचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं सांगितलं. महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या दिवशी भंडारा कडे वाटचाल करण्याआधी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागांत मोठ्या प्रमाणात कामं झाली असली तरी इतर भागांवर अन्याय झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर राज्य राहिलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

  आम्ही नागरिकांशी, मतदारांशी संवाद साधत आहोत, तर विरोधक ई व्ही एमशी संवाद साधत आहेत. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात इतका हताश, निराश आणि मुद्यांपासून भरकटलेला विरोधी पक्ष पहिला नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****

 नाशिक मध्ये संततधार सुरुच असून गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. काल रात्री ८ वाजता गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात ८ हजार दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु झाल्यानं धरणातून आज पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला. गेल्या २४ तासात एकूण १३ हजार दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेनं झाला आहे.
****

 जालना जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासात सरासरी नऊ पूर्णांक ९० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी सहाशे अठ्ठ्याएंशी पूर्णांक २१ मिलिमीटर असून आतापर्यंत सरासरी २४७ पूर्णांक ९४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
****

 रायगड जिल्हयात गेले २४ तास कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जिल्हयात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री-गांधारी –काळ नदीचं पाणी महाड शहरात घुसलं आहे. आंबा नदीचं पाणी नागोठण्यात शिरल्यानं शहरात तीन-ते साडेतीन फूट पाणी जमा झालं आहे. रोहयात कुंडलिकेनं धोक्याची पातळी ओंलांडली असून जुना पूल पाण्याखाली गेला आहे. अष्टमी गावात पाणी शिरल्यानं रोहा अलिबाग रस्ता बंद झाला आहे, पालीचा पूलही पाण्याखाली गेल्याने वाकणा-पाली-खोपोली हा रस्ता बंद करण्यात आला आहे. महाड-किल्ले रायगड रस्ताही पाण्याखाली आहे.
****

 सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना पुन्हा पूर आला आहे. दोन्ही नदी काठांवर आणि सांगली शहरातल्या सखल भागात पाणी घुसलं आहे. जिल्ह्यातल्या दैनंदिन वाहतुकीचे  सहा प्रमुख महामार्ग पाण्यामुळे बंद झाले आहेत.

 वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे बहे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कराड – इस्लामपूर मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पर्यायी मार्गानं ही वाहतूक काही प्रमाणात सुरू आहे.
*****
***

No comments: