Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 03 August
2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
छत्तीसगडमध्ये
राजनांदगाव इथं सकाळी सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत सात नक्षलवाद्यांना
ठार करण्यात आलं आहे. जिल्हा राखीव सुरक्षा दलाचे जवान सकाळी नक्षलविरोधी कारवाई दरम्यान
सितागोटा गावाजवळ जंगलात गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी
म्हटलं आहे.
****
जम्मू
आणि काश्मीरमध्ये शोपिअन आणि बारामुल्ला या जिल्ह्यांमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत दोन
दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोरमध्ये आज सकाळी
सुरक्षा जवानांनी एका भागाची नाकाबंदी केल्यानंतर चकमकीत एक दहशतवाद्याला ठार करण्यात
आलं. तर शोपिअन जिल्ह्यातल्या पंडुशान भागात झालेल्या दुसऱ्या चकमकीत झिनत उल इस्लाम
नावाच्या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. यावेळी दारुगोळा आणि शस्रास्रांचा मोठा साठाही
जप्त करण्यात आला.
****
भाजपाच्या
सर्व खासदारांसाठी नवी दिल्लीत आयोजित ‘अभ्यास वर्ग’ या दोन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. या कार्यशाळेत, विविध विषयांवर चर्चा
होणार असून नव्यानं निवडून आलेल्या खासदारांना, संसदेत आणि संसदेबाहेरच्या वर्तणुकीसंदर्भात
मार्गदर्शन केलं जाणार आहे.
****
विद्यापीठ
अनुदान आयोगानं इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स अर्थात प्रख्यात संस्थांचा दर्जा प्रदान करण्यासाठी
वीस संस्थांची एक यादी जारी केली आहे. या वीस संस्थांमध्ये १० संस्था या खासगी तर १०
संस्था सरकारी आहेत. सरकारी संस्थामध्ये दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ,
हैदराबाद विद्यापीठ, आय आय टी मद्रास आणि आय आय टी खरगपूरचा समावेश आहे.
****
पर्यटकांचं
आकर्षण असलेल्या अलिबाग मधल्या पांडवकडा धबधब्यावर चार तरूणी वाहून गेल्याची दुर्घटना
आज घडली. यातल्या तीन तरूणींचे मृतदेह सापडले असून या तरूणी मुंबईतल्या चेंबुरच्या
रहिवासी आहेत.
****
नाशिक
शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बहुतांशी धरणांमधून
पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस
सुरू असल्यानं गंगापूर धरणातून १४ हजार दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला
आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. रामकुंड परिसरातील राम सेतू आणि नदीकाठी
असलेली जवळपास सर्व मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. परिसरातल्या बाजारपेठेत पाणी शिरल्यानं
नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जायकवाडी
धरणात सध्या ३२ हजार दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक होत असून पाणीसाठा ११ टक्क्यांपर्यंत
गेल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
अहमदनगर
जिल्ह्यातलं भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचं अहमदनगर जलसंपदा विभागाचे कार्यकारी
अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे. धरणातून सध्या वीजनिर्मितीसह एकूण चार हजार ४२५
क्यूसेक्स म्हणजेच चार घनफूट प्रतीसेकंद धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी
निळवंडे धरणात दाखल होणार असून निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात
येणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
****
हिंगोली
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी
झालं आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे. कळमनुरी तालुक्यातल्या
नांदापूरजवळ रेल्वे पुलाखाली पाणी आल्यामुळे रहदारी बंद झाली आहे, तर वसमत तालुक्यात
लोण शिवारातल्या रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यामुळे चार गावांचा रस्ता बंद झाला आहे.
कळमनुरी तालुक्यातल्या सांडस इथला पूल वाहून गेल्यामुळे रहदारी बंद झाली असून काही
गावांचा संपर्क तुटला आहे. पूर परिस्थिती कमी होईपर्यंत नागरिकांनी पुलावरून रहदारी
करू नये असंही प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
धनगर
समाजाला केवळ सवलती देण्यापेक्षा राज्यघटनेच्या आधारे मंजूर असलेलं आरक्षण मिळालं पाहिजे,
त्यासाठी या समाजातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, असं धनगर समाज महासंघ नेते आणि माजी
आमदार अण्णासाहेब डांगे यांनी म्हटलं आहे.
सांगली
इथं प्रसारमाध्यमांशी काल ते बोलत होते. धनगर समाज ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असल्याने
या समाजालाही अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणीही अण्णासाहेब डांगे
यांनी केली.
****
शेतकऱ्यांच्या
प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या
वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात
आलं आहे.
****
No comments:
Post a Comment