Monday, 5 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक तसंच कलम ३७० हटवण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कलम ३७० हटवणं, ही भारतीय संविधानाची हत्या असल्याचं मत, डाव्या पक्षांनी व्यक्त केलं आहे, केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर आणि भारतीय संविधानाला जोडणारा एकमेव सेतू नष्ट केला, असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं म्हटलं आहे. नॅशनल कौन्फ्रन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी, केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे विश्वासघात असल्याचं म्हटलं तर भारताच्या संवैधानिक इतिहासातला हा काळा दिवस असल्याचं काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे.

राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा सध्या या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत आहेत. त्याआधी अनेक पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने तसंच विरोधात आपापली मत मांडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी, विधेयकाचा विरोध करत, या निर्णयातून उद्भवणाऱ्या भयंकर परिणामांना भाजपप्रणीत केंद्र सरकार जबाबदार असेल, असं नमूद केलं. तृणमूल काँग्रेस पक्षानेही या विधेयकाला विरोध दर्शवला. संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी या विधेयकाचा विरोध करत, सभात्याग केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या विधेयकावरच्या मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमध्ये राज्य सरकार अस्तित्वात असताना, स्थानिक नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घ्यायला हवा होता, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
नामनिर्देशित सदस्य सुब्रह्मण्यम स्वामी यांनी, या विधेयकाचं स्वागत करत, केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी केली.

बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष, अण्णद्रमुक, तेलगु देशम पक्ष, बिजू जनता दल, आसाम गण परिषद, शिरोमणी अकाली दल, भारतीय रिपब्लीकन पक्ष, तसंच शिवसेनेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
हे विधेयक उद्या लोकसभेत चर्चेसाठी मांडल जाणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी, याबाबतचा प्रस्ताव आज लोकसभेत मांडला, सदनानं तो स्वीकृत केला. काँग्रेसच्या सदस्यांनी याचा विरोध करत सभात्याग केला.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचं, महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, हा ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे.
नवी मुंबईत काश्मिरी डोग्रा तरुणांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. सांगली, अमरावती, नाशिक आदी शहरातही नागरिकांनी या निर्णयाबद्दल जल्लोष केला.
नांदेड तसंच परभणी इथं फटाके फोडून तसंच पेढे वाटून या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
****
देशाच्या राज्यघटनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून सुरू आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. जालना इथं आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. पक्षावर निष्ठा नसलेले लोक बाहेर पडत असल्यामुळे पक्षाचे शुध्दीकरणच होत असल्याचं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं. मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येवून संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असं आवाहन चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं, जिल्ह्यातल्या धरणांमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सायंकाळी चार वाजता एक लाख चाळीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात होतं.
जायकवाडी धरणात सुमारे नव्वद हजार ५३६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. धरणाचा पाणी साठा २५ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.
दरम्यान, गोदावरी नदीकाठच्या १७ गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यात गोदावरी नदीकाठालगतच्या ४६३ पेक्षा अधिक नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भीमा नदी काठच्या आठ गावांना पुराने वेढा दिला आहे. पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी पूरग्रस्त गावांची पाहणी करून, पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नांदेड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातही तुरळक पाऊस झाला.
*****
सिकंदराबाद-नांदेड-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस आज आपल्या नियमित वेळेनुसार मुंबईकडे धावत आहे, ही गाडी रद्द झाल्याची सूचना या पूर्वी देण्यात आली होती, मात्र दक्षिण मध्य रेल्वेनं हा निर्णय मागे घेतला. नागपूर नांदेड मुंबई - नंदिग्राम एक्सप्रेस मात्र आज रद्द करण्यात आली आहे.
****
आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ इथं, घृष्णेश्वर ज्योर्तिलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं, मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...