Tuesday, 6 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०६ ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****

v जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आणणारं आणि राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करणारं ऐतिहासिक विधेयक राज्यसभेत मंजूर
v केंद्र सरकारच्या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत; काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा विरोध
v राज्यातला पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरपरिस्थिती कायम
 आणि
v औरंगाबाद -जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिरंगी लढत
****

 जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याची तरतूद असलेलं आणि जम्मू-काश्मीर राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करणारं ऐतिहासिक जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक काल राज्यसभेत मंजूर झालं. १२५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर ६१ जणांनी विरोधात मतदान केलं. सर्व राज्यसभा सदस्यांनी चिठ्ठीद्वारे मतदानाचा हक्क बजावला. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवण्यात येणार आहेत. काश्मीर कायमस्वरुपी केंद्रशासित प्रदेश राहणार नाही. काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाली. योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु असं गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं.  देशभरात लागू असलेले सर्व कायदे, जम्मू काश्मीरमध्येही लागू असतील. या राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दहा टक्के आरक्षणही लागू असेल, असं शाह यांनी सांगितलं.

 या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान, अनेक पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं तसंच विरोधात आपापली मत मांडली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या विधेयकाला पूर्ण विरोध करत असल्याचं सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी, जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेत केंद्रशासित प्रदेश करण्याला विरोध दर्शवला. कलम ३७० हटवण्याच्या या निर्णयातून उद्भवणाऱ्या भयंकर परिणामांना भाजपप्रणीत केंद्र सरकार जबाबदार असेल, असं नमूद केलं. तृणमूल काँग्रेस पक्षानंही या विधेयकाला विरोध दर्शवला. संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी या विधेयकाचा विरोध करत, सभात्याग केला.

 पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाच्या दोन खासदारांनी, या विधेयकाचा विरोध करत, भारतीय संविधानाची प्रत फाडण्याचा प्रयत्न केला. सभापतींनी सदनात मार्शल बोलावून या दोन्ही खासदारांना सदनातून बाहेर काढलं.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या विधेयकावरच्या मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमध्ये राज्य सरकार अस्तित्वात असताना, स्थानिक नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घ्यायला हवा होता, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान व्यक्त केलं.

 बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष, अण्णद्रमुक, तेलगु देशम पक्ष, बिजू जनता दल, आसाम गण परिषद, शिरोमणी अकाली दल, भारतीय रिपब्लीकन पक्ष, तसंच शिवसेनेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

 हे विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होईल. गृहमंत्री शाह यांनी, याबाबतचा प्रस्ताव काल लोकसभेत मांडला, सदनानं तो स्वीकृत केला. काँग्रेसच्या सदस्यांनी याचा विरोध करत सभात्याग केला.

 केंद्र सरकारच्या या निर्णयाचं, महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, या निर्णयाचं स्वागत केलं. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
****

 देशाच्या राज्यघटनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून सुरू आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. काल जालना इथं झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. पक्षावर निष्ठा नसलेले लोक बाहेर पडत असल्यामुळे पक्षाचं शुध्दीकरणच होत असल्याचं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं. मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येवून संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असं आवाहन चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 राज्यात काल पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरपरिस्थिती कायम होती. मुंबई-ठाणे, कोकण, कोल्हापूर, सांगली, पुणे, पिंपरी चिंचवड तसंच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात नद्या नाल्यांना आलेला पूर कायम होता. खान्देशला पूराचा सर्वाधिक फटका बसला असून या ठिकाणची अनेक गाव पाण्याखाली आहेत. कोकणात सिंधुदुर्ग मधल्या राजापूर इथं काल एकाचा बुडून मृत्यु झाला, नाशिक जिल्ह्यातही दोन जण पुरात वाहून गेले. कोल्हापूर जिल्ह्यात पाचहजार पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. सांगली आणि साताऱ्यातही पूरपरिस्थिती असून, जिल्ह्यातल्या १०७ गावांचा संपर्क तुटला आहे.  पुणे जिल्ह्यातल्या मुळा आणि मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं पुणे शहर, पिंपरी चिंचवड, बारामती आणि दौंड तालुक्यातल्या नदीकाठच्या कुटुंबातल्या सुमारे १३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यातलं कोपरगाव पुराच्या वेढ्यात आहे. नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातल्या  उंबरमाळ गावालगत असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात काल सायंकाळी तडे पडलेले आहेत.

 नाशिक शहरातले पाच वाडे काल रात्री साडे ११ वाजेच्या सुमारास कोसळले. नाशिक जिल्ह्यात पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली असून, सर्व धरणं ६७ टक्क्यांपेक्षा जास्त भरली त्यामुळे जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता २७ टक्के इतकी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर मधली बाबतारा, भालगाव, डोणगाव आणि लाखगंगा इथल्या अनेक घरात पाणी शिरलं. गंगापूर तालुक्यात हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.

 गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळं वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यात सुरक्षेच्या कारणास्तव  महावितरण कंपनीनं बंद केलेला २३ गावातला वीजपुरवठा अजुनही बंदच आहे. कंपनीनं या दोन्ही गावांसह एकूण ५२ गावांचा वीज पुरवठा बंद केला होता, त्यापैकी २९ गावांचा वीज पुरवठा काल सुरू करण्यात आला.

दरम्यान संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी गोदावरी नदीकाठावरचे वीज संच, रोहित्र आणि विद्युत वाहिनी हाताळू नये, असं आवाहन कंपनीनं केलं आहे.
****

 पोलिसांनी माओवाद्यांविरुद्ध प्रभावी पावलं उचलली असून, माओवादाला बऱ्याच अंशी आळा बसला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गडचिरोली इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. भरकटलेल्या माओवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं लागेल, नाहीतर त्यांना कायद्याला सामोरं जावं लागेल, असं ते म्हणाले.
****

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल याबाबतची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
****

 श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार आणि त्यासोबतच आलेला नागपंचमीचा सण काल सर्वत्र मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला. श्रावणी सोमवारनिमित आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ, औरंगाबाद जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर तसंच परळीच्या वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
****

 औरंगाबाद -जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळं आता शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचे अंबादास दानवे, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीचे बाबूराव कुलकर्णी आणि अपक्ष उमेदवार शहानवाज अब्दुल रहेमान खान असे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. १९ ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे.

 दरम्यान, या मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ कमी असलं तरी अनेक अदृष्य हात आम्हाला मदत करतील अशी आशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातले उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातल्या मतदारांची बैठक काल औरंगाबाद शहरात झाली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा सुरु असून या आठवड्यात निर्णयाचे अंतिम स्वरूप ठरेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. 
****

 औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी प्र कुलगुरुपदी रसायन तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रविण वक्ते यांची नियुक्ती कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी केली आहे. याशिवाय डॉ. सतिश दांडगे, डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. भालचंद वायकर, डॉ. संजिवनी मुळे यांची वेगवेगळ्या विभागाचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****

 यंदाचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सेवा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार, येत्या १४ ऑगस्टला प्रवरानगर इथं समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब  कसबे यांनी पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले.

 इतर पुरस्कारांमध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किरण गुरव यांना, गो.तु.पाटील विशेष साहित्य पुरस्कार नीलिमा क्षत्रिय यांना, समाज प्रबोधन पुरस्कार शमसुद्दीन तांबोळी यांना, तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार राजकुमार तांगडे यांना जाहीर झाला आहे.
*****
***

No comments: