Wednesday, 7 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०७ ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****

v भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्‍वराज यांचं निधन
v जम्मू - काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द; राज्यसभेपाठोपाठ लोकसभेचीही विभाजन विधेयकाला मंजुरी
v राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्याकरता तज्ज्ञ समिती जाहीर
 आणि
v राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि पुराचा जोर कायम
****

 अमोघ वक्तृत्वाची देणं असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्‍वराज यांचं काल रात्री हृदय विकाराच्या झटक्यानं नवी दिल्लीत निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. काल रात्री साडे नऊ ते दहा वाजेदरम्यान, त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्‍था-एम्‍स रूग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथं उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. २०१६ मध्ये त्यांच्यावर मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर प्रकृतीच्या कारणामुळे २०१९ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्‍ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शाह आणि अन्य नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

 अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या सुषमा या १९७७ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी हरीयाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनल्या. दिल्लीच्याही पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला होता. दक्षिण दिल्ली तसंच मध्यप्रदेशातल्या विदीशा लोकसभा मतदार संघातून त्या लोकसभेवर प्रत्येकी दोन वेळा निवडून आल्या होत्या. २००९ ते २०१४ या काळात लोकसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. जवळपास नऊ वर्ष त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण, दूरसंचार, आरोग्य आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांची कारर्किद स्मरणीय राहिली.  

 श्रीमती सुषमा स्वराज यांचा पार्थिव देह जनतेच्या दर्शनासाठी आज सकाळी ११ वाजता भाजपच्या मुख्यालयात आणण्यात येईल, त्यानंतर सायंकाळी तीन वाजता लोधी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर संपूर्ण राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
****

 जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेलं  'कलम ३७०’ रद्द करण्याची तरतूद असलेलं विधेयक राज्यसभेनंतर लोकसभेतही मंजूर झालं आहे. ३५१ विरुद्ध ७२ मतांनी हे विधेयक मंजूर झालं. यावेळी जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं विधेयकही ३६६ विरुद्ध ६६ मतांनी मंजूर झालं. संसदेच्या दोन्ही सभागृहांची या विधेयकांना मंजुरी मिळाल्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन होऊन, आता जम्मू काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश तर लडाख हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश नव्यान निर्माण होईल. विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्यात आल्यामुळे आता देशभरात लागू असलेले सर्व कायदे, जम्मू काश्मीरमध्येही लागू असतील.

 त्यापूर्वी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना, गृहमंत्री अमित शहा यांनी, जम्मू काश्मीर हे भारताचं अविभाज्य अंग असून यात पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश असल्याचं सांगितलं. परिस्थिती सामान्य होताच, या प्रदेशाला पुन्हा राज्याचा दर्जा देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 लोकसभेत बहुजन समाज पक्ष, तेलगु देसम पक्ष, अण्णाद्रमुक, बिजू जनता दल, आम आदमी पक्षासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांनी या विधेयकाच्या बाजूने मत मांडली, तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, एमआयएम, आणि इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाच्या विरोधात मतं मांडली.

 या चर्चेदरम्यान काही सदस्यांनी, सदनाचे सदस्य असलेले जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या सदनातल्या गैरहजेरीमुळे त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली, मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी ही शक्यता फेटाळून लावत, फारुख अब्दुल्ला हे आपल्या घरी असून, त्यांच्या मर्जीने ते लोकसभेत गैरहजर राहिल्याचं स्पष्ट केलं.
****

 लोकसभेचं कामकाज काल अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. सतराव्या लोकसभेच्या या पहिल्या अधिवेशनात ३७ बैठका झाल्या, यामध्ये जवळपास २८० तास काम झालं. लोकसभेच्या इतिहासातलं हे सर्वाधिक यशस्वी अधिवेशन ठरल्याबद्दल, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांचं अभिनंदन केलं. संसदेच्या आगामी अधिवेशनातही सर्व सदस्यांकडून अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा लोकसभाध्यक्षांनी व्यक्त केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे.
****

 राज्यातल्या सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचं करण्याबाबतच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एक तज्ज्ञ समिती जाहीर केली आहे. या समितीत मराठी भाषा मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण आणि मराठी भाषा विभागांचे प्रधान सचिव यांच्यासह मधु मंगेश कर्णिक, कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, चंद्रकांत पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले याशिवाय मान्यवर साहित्यिकांचा आणि शिक्षण तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा आणि विचार विनियम करून कायद्याचा प्राथमिक मसुदा तयार करेल. त्यानंतर हा मसुद्याव नागरिकांच्या, हरकती, प्रतिक्रीया सूचना मागवण्यात येतील असं तावडे यांनी सांगितलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि पुराचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातलं महाड शहर पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. काल सायंकाळी महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल- एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आलं. या पथकानं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं असून भारतीय सैन्य दलाची तुकडी आणि तटरक्षक दलही महाडमध्ये पोहोचलं आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चार तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर केली आहे.
****

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्यानं गावा गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेल्यानं अनेकांचा संपर्क तुटला आहे, तर महामार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. जिल्ह्यात एकाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाण्यानं कराड तालुका तसंच पाटण तालुक्यातल्या बहुतांशी गावांना वेढा घातला असून पुरात अडकलेल्या नागरिकांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं २२ जवानांचं पथक कार्यरत आहे. पावसानं निर्माण झालेली परिस्थीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं कराड शहरात संचारबंदी लागू केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक गावांतला वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
****

 पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणारं पाणी यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थीती  नियंत्रित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्याशी संवाद साधून अलमट्टी धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याचं प्रमाण वाढवण्याबाबत काल चर्चा केली. त्यानुसार अलमट्टी धरणातून जास्तीचं पाणी सोडण्यात आलं आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी प्रशासन कार्यरत असून एनडीआरएफची २ पथके, सेनादलाचे ८० जणांचे पथक आणि नौदलाचे पथक विमानानं कोल्हापूरात येत असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची कार्यवाही या पथकांमार्फत करण्यात येईल.
****

 उजनी धरणातून दिड लाख दसलक्ष घनफूट प्रतिसेकंद आणि वीर धरणातून एक लाख दसलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यामुळं चंद्रभागा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून नदी काठावरची अनेक मंदीरं पाण्याखाली गेली आहेत.

 दरम्यान, बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातल्या  बहुतांश भागात आज आणि उद्या मध्यम ते जोरदार पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****

 नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून येत असलेल्या पाण्यामुळं जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून धरणाची पाणी पातळी आज पहाटे ५२ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच एवढी विक्रमी आवक जायकवाडीत होत आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्यामधल्या विविध गावातल्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. औरंगाबाद तालुक्यात विविध गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गावांचे सर्वेक्षण करून टँकर सुरू करण्याची मागणी औरंगाबाद तालुका काँग्रेस समितीनं केली आहे.
****

भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान काल झालेल्या तिसऱ्या टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडीज वर सात गडी राखून विजय मिळवला. पावसामुळं ओल्या झालेल्या मैदानावर खेळतांना वेस्ट इंडिजनं भारताला जिंकण्यासाठी १४७ धावाचं  लक्ष्य दिलं. भारतानं सात गडी राखून ते पुर्ण केलं.
*****
***

No comments: