Tuesday, 20 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
खुल्या प्रवर्गातल्या अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक तसंच आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण अकादमी - अमृत ही संस्था स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू केलं आहे. मात्र, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणं गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमृत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत बीड जिल्ह्यासाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य तसंच दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा यासह विविध ठिकाणी अनुषंगिक कामांसाठी चार हजार ८०२ कोटी रुपयांच्या पहिल्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी हायब्रिड ॲन्युटी मॉडेलवर निविदा मागवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पद्धतीच्या निविदेमध्ये संभाव्य निविदाकारांनी भांडवली गुंतवणूक करणं अपेक्षित असून काही प्रमाणात निधी शासनाकडे देणं प्रस्तावित आहे.

अपारंपरिक ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस खरेदी करात १० वर्षांसाठी सूट देण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळानं आज घेतला. या प्रकल्पांची क्षमता वाढवल्यास त्यांच्या भांडवली गुंतवणुकीएवढी अथवा १० वर्षांच्या कालावधीसाठी ऊस खरेदी करामध्ये सूट देण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सर्वांसाठी घरं २०२२ या धोरणाची शीघ्रतेने अंमलबजावणी करण्यासाठी, खासगी जमिनीवरच्या अतिक्रमणधारकांना पट्टेवाटप करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्यप्रणाली निश्च‍ित करण्यात आली.
****
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने सुरु केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्यामुळे २२ ऑगस्टला ईडी कार्यालयावर शांततापूर्ण आंदोलनाचा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले आहेत. ठाकरे यांना ईडीनं २२ तारखेला ईडीसमोर हजर होण्याची नोटीस बजावली आहे, या पार्श्वभूमीवर आज मनसे नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना नांदगावकर यांनी, या आंदोलनात कार्यकर्ते आक्रमक होणार नाहीत आणि पक्षाच्या आदेशाच्या बाहेर जाणार नाहीत, पोलिसांनीही या आंदोलनासाठी सहकार्य करावं, असं आवाहन केलं.
****
कुख्यात गुंड छोटा राजन आणि त्याच्या पाच साथीदारांना हत्येच्या एका प्रयत्नासाठी आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. मुंबईतल्या एका विशेष न्यायालयानं आज या सहा जणांना तुरुंगवासासोबतच प्रत्येकी पाच लाख रुपये दंडही ठोठावला आहे. या सर्वांनी मिळून दोन हजार बारा साली, अंधेरी इथं बी आर शेट्टी नावाच्या हॉटेल व्यावसायिकावर गोळ्या झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल ही शिक्षा सुनावली आहे. 
****
लातूर जिल्ह्यात भविष्यातील पाणी पुरवठा सुरळित होण्यासाठी रेल्वेद्वारे पाणी पुरवठ्यासह सर्व पर्यांयी योजनांचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले आहेत. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाणी साठा कमी असल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून पंधरा दिवसातून फक्त एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्व नगरपालिकांच्या पाणी पुरवठयांतही सप्टेंबर महिन्यापासून १५ टक्के पाणी कपातीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
लोककवी वामनदादा कर्डक यांची गाणी नव्या स्वरूपात आणण्याचं मोठं आव्हान नव्या पिढीच्या गायकांसमोर असल्याचं मत कवी डॉ. रविचंद्र हडसनकर यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रात एका व्याख्यानात बोलत होते. वामनदादांनी समाजातल्या हाल, अपेष्टा आपल्या कवितांमधून मांडल्याचं त्यांनी सांगितलं. श्रम आणि प्रतिष्ठा ही मूल्यं नव्या पिढीला द्यायला समाज कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
****
औरंगाबाद इथल्या चौका लोकुत्तरा महाबुध्दविहाराच्या वतीनं आयोजित कार्यक्रमासाठी तिबेटचे बौध्द धर्मगुरू दलाई लामा २९ आणि ३० नोव्हेंबरला औरंगाबादला येत आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणावर त्यांचा गौरव सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध देशातून बौद्ध धर्मगुरू उपस्थित राहणार असल्याचं संयोजक समितीचे सदस्य विश्वदीप करंजीकर यांनी सांगितलं.
****
ऑगस्ट महिना संपत आला तरी परभणी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने         
उष्णतेत वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिक मोठ्या पावसाची प्रतिक्षा करत आहेत.
****

No comments: