Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२१ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v खुल्या प्रवर्गातल्या अर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकांच्या शैक्षणिक तसंच आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण अकादमी स्थापन करण्यास राज्य
मंत्रिमंडळाची मान्यता
v मराठवाडा वॉटर ग्रीड
अंतर्गत बीड जिल्ह्यात जलवाहिन्या आणि जलशुद्धीकरण यंत्रणासह चार हजार आठशे दोन कोटी रुपयांच्या कामांना राज्य सरकारची
मंजुरी
v राज्य शासनाच्या हिंदी साहित्य
अकादमीचा अखिल भारतीय स्तरावरचा जीवनगौरव
पुरस्कार डॉ. बलभीमराज गोरे आणि हस्तीमल हस्ती यांना घोषित
आणि
v कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दिव्यांग ॲथलिट ऑलिंपिकपटू
दीपा मलिक यांना राजीव गांधी खेल रत्न क्रीडा पुरस्कार जाहीर
****
खुल्या प्रवर्गातल्या अर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकांच्या शैक्षणिक तसंच आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण अकादमी - अमृत ही
संस्था स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. खुल्या
प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण
संस्थांमध्ये प्रवेश आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू केलं आहे. मात्र,
त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
मिळणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमृत संस्था स्थापन
करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आवश्यक शिक्षण,
रोजगार तसंच नोकरीसाठी आवश्यक उच्चशिक्षण, व्यक्तिमत्त्व
विकासासह कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा आणि एमफील-पीएचडी
अभ्यासक्रमांसाठीही या संस्थेतून प्रशिक्षण मिळेल. महिला सक्षमीकरण तसंच
समुपदेशनातही ही संस्था काम करेल.
मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत बीड जिल्ह्यासाठी
प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य तसंच दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा यासह विविध ठिकाणी अनुषंगिक कामांसाठी
चार हजार आठशे दोन कोटी रुपयांच्या पहिल्या प्रस्तावालाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यासाठी
हायब्रिड ॲन्युटी मॉडेलवर निविदा मागवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या
पद्धतीच्या निविदेमध्ये संभाव्य निविदाकारांनी भांडवली गुंतवणूक करणं अपेक्षित
असून काही प्रमाणात निधी शासनाकडे देणं प्रस्तावित आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये
खातेधारक शेतकऱ्यासह आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्याच्या
निर्णयालाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे ही योजना आता व्यापक आणि सर्वसमावेशक बनली
आहे. विमा कालावधीत खातेदार
शेतकरी आणि खातेदार म्हणून नोंद नसलेला कुटुंबातला कोणताही एक सदस्य यापैकी
कोणालाही केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले, तरीही ते या योजनेंतर्गत
लाभासाठी पात्र राहणार आहेत. विमा योजनेच्या हप्त्याची संपूर्ण रक्कम शासन विमा
कंपनीकडे भरणार आहे. दुर्दैवाने अपघात झाल्यास, योजनेच्या निकषानुसार
शासनानं नियुक्त केलेली विमा कंपनी दोन लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यास नुकसान
भरपाई देईल.
****
मुद्रांक शुल्क अभय योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
देण्याचा निर्णयही काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य मुद्रांक अधिनियमाच्या
तरतुदीनुसार न भरलेल्या मुद्रांक शुल्कावर दंडाची रक्कम १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासंदर्भात ही
योजना
राबवण्यात येत आहे.
****
अपारंपरिक ऊर्जा निर्मितीस प्रोत्साहन
देण्यासाठी सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस खरेदी करात १०
वर्षांसाठी सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या प्रकल्पांची ऊर्जानिर्मिती क्षमता वाढवल्यास त्यांच्या भांडवली
गुंतवणुकीएवढी अथवा १० वर्षांच्या कालावधीसाठी ऊस खरेदी करामध्ये सूट देण्यास कालच्या बैठकीत मान्यता
देण्यात आली.
सर्वांसाठी घरं २०२२ या धोरणाची शीघ्रतेनं अंमलबजावणी करण्यासाठी, खासगी
जमिनीवरच्या अतिक्रमणधारकांना पट्टेवाटप करण्यासाठी कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत
कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली.
****
राज्य शासनाच्या हिंदी साहित्य
अकादमीच्या २०१८-१९ या वर्षाच्या पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. अखिल भारतीय
स्तरावरचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. बलभीमराज गोरे आणि हस्तीमल हस्ती यांना घोषित झाला
असून राज्य स्तरावरचा जीवनगौरव पुरस्कार ८
जणांना जाहीर झाला आहे. यासोबतच २१ विधा पुरस्कारांची घोषणाही अकादमीनं केली आहे. येत्या
३१ ऑगस्टला मुंबईत या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीच्या काँग्रेस पक्षाच्या
आमदार निर्मला गावीत यांनी काल विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडं आमदार पदाचा राजीनामा दिला. त्या आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या
उपस्थीतीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना काल त्यांच्या
पंचाहत्तराव्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी,
माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, यांच्यासह काँग्रेस
पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी, दिल्लीत वीरभूमी या राजीव गांधी यांच्या
समाधीवर फुलं अर्पण करून अभिवादन केलं. सद्भावना दिवस काल पाळण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात राजीव गांधी यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी
उपस्थितांना ‘सद्भावना दिना’ ची शपथ
दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****
यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा
काल करण्यात आली. राजीव गांधी खेल रत्न हा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, कुस्तीपटू
बजरंग पुनिया आणि दिव्यांग ॲथलिट ऑलिंपिकपटू दीपा मलिक यांना जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य
हा प्रशिक्षकांसाठीचा पुरस्कार, बॅडमिंटन प्रशिक्षक विमल कुमार, टेबल टेनिस प्रशिक्षक
संदीप गुप्ता आणि अॅथलेटिक्स प्रशिक्षक मोहिंदर सिंग ढिल्लन यांना जाहीर झाला आहे.
अर्जुन पुरस्कार १९ जणांना जाहीर झाला असून यात क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याचा समावेश
आहे. पाच जणांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये पुण्याचे टेनिसपटू नितीन
किर्तने यांचा समावेश आहे. येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली इथं
हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
****
लोककवी वामनदादा कर्डक यांची गाणी नव्या स्वरूपात
आणण्याचं मोठं आव्हान नव्या पिढीच्या गायकांसमोर असल्याचं मत कवी डॉ. रविचंद्र हडसनकर
यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या
लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रात एका व्याख्यानात बोलत होते. वामनदादांनी समाजातल्या
हाल, अपेष्टा आपल्या कवितांमधून मांडल्याचं त्यांनी सांगितलं. श्रम आणि प्रतिष्ठा ही
मूल्यं नव्या पिढीला द्यायला समाज कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा
दुसरा टप्पा नंदुरबार जिल्ह्यातून सुरु होणार आहे. या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात
होणार होती मात्र आता ही यात्रा उद्यापासून सुरु होईल. या दुसऱ्या टप्प्यात नंदुरबार,
शहादा, दोंडाईचा, शिंदखेडा आणि धुळ्यात सभा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाची
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय
पोषण अभियानात २०१८ -१९ या वर्षात विभागानं उल्लेखनीय कार्य केलं आहे. याविषयी अधिक
माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…
या अभियानांतर्गत उस्मानाबद या निती आयोगाच्या या आगांशी जिल्ह्यात महिला,
किशोरवयीन मुली, शुन्य ते चार वर्ष वयोगटातील बालकं यांच्यामधलं कूपोषण , रक्तक्षय
यासाठी नियमित पोषण आहाराचं महत्त्व सांगितलं गेलं. गावागावात ग्रॉमसभा मधून, शाळा-अंगणवाड्या
मधून कुपोषण कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले गेले. आंगणवाड्या मधून
बालकांची नियमित वजनं, उंची तपासण्या केल्या गेल्या. गरोदर मातांना लोहयुक्त गोळ्याचं
वाटप, चौरस आहार वाटप या उपक्रमामुळं उस्मानाबाद जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण कमी होण्यास
मदत झाली.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहार, उस्मानाबाद.
****
लातूर जिल्ह्यात भविष्यात पाणी पुरवठा सुरळित होण्यासाठी
रेल्वेद्वारे पाणी पुरवठ्यासह सर्व पर्यांयी योजनांचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा
धरणात पाणी साठा कमी असल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून पंधरा दिवसातून फक्त एकदा पाणी
पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्व नगरपालिकांच्या पाणी पुरवठ्यातही सप्टेंबरपासून
१५ टक्के पाणी कपातीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
अधिकारी आणि कर्मचारी यांचं आरोग्य सदृढ
राहिल्यास जनतेला अधिक प्रभावीपणे सेवा देता येईल असं, नांदेड जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य
विभागानं सर्व पदाधिकारी, अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या आरोग्य तपासणी तसंच समुपदेशन शिबिरात ते बोलत
होते. ज्या कर्मचाऱ्यांच्या रक्तात हिमाग्लोबन कमी आहे, अशा
कर्मचाऱ्यांना गुळ शेंगदाण्याचे लाडू देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं
****
जालना जिल्ह्याच्या मंठा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस
निरिक्षक मुशीरखान करीबखान पठाण याला पाच हजार रूपयांची लाच घेतांना काल रंगेहाथ अटक
करण्यात आली. पत्नीनं पतीविरूद्ध दिलेल्या तक्रारीत पतीला अटक न होण्यासाठी पठाण यानं
दहा हजार रूपये लाचेची मागणी केली होती, त्यातले पाच हजार रूपये स्वीकारतांना त्याला
पकडण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment