आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ सप्टेंबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. गणरायाच्या
आगमनाची जोरदार तयारी झाली आहे. पावसाचं वातावरण असतानाही गणपतीच्या स्वागतासाठी विविध
वस्तूंची खरेदी करण्याकरता काल बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या होत्या. सकाळी घरगुती
गणपतींच्या स्थापनेनंतर दुपारनंतर मंडळांच्या गणपतींची स्थापना होत आहे. बारा सप्टेंबर
म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव चालणार आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी गणशोत्सवाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासीयांना
या पावन मोहत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
***
भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या
टप्प्याचा काल सोलापूर इथं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत
समारोप झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपनं स्थिर सरकार दिलं,
स्थिर सरकारमुळे विकास होत असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. या जाहीर सभेत राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, उस्मानाबादचे आमदार राणा जगजीतसिंह
पाटील, आणि सातारा जिल्ह्यातल्या माण खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भारतीय
जनता पक्षात प्रवेश केला.
***
नांदेड जिल्ह्यात मुदखेड, अर्धापूर तालुक्यात काल
रात्री पासून जोरदार पाऊस होत आहे. नांदेड शहरात मात्र आज पावसानं विश्रांती घेतल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यातही काल संध्याकाळनंतर चांगला पाऊस झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कार्याची उंची
हिमालया एवढी होती, त्यामुळं आबांचा पुतळा नव्या पिढीला प्रेरणा देत राहील, असा विश्वास
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. काल सांगली
जिल्ह्यातल्या तासगाव इथं आर. आर. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शरद पवार
यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
***
सांगली जिल्ह्यातल्या कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा
प्रकरणी महारयत ॲग्रोचा संचालक हनुमंत जगदाळे याला पोलिसांनी अटक केलं आहे.
दरम्यान, आडीचशे जणांच्या तक्रारी असलेल्या या प्रकरणात
अटक करण्यात आलेल्या संदिप मोहीते याला न्यायालयानं चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
आहे, कंपनीचा अध्यक्ष सुधीर मोहिते हा अद्याप
फरारी आहे.
*****
***
No comments:
Post a Comment