Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –25 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ सप्टेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्य
सहकारी बँक कर्जवाटप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय - ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात
तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पुढचा महिनाभर आपण मुंबईबाहेर राहणार असल्यामुळे,
येत्या शुक्रवारी २७ तारखेला ईडीच्या मुंबई कार्यालयात जाऊन आपल्या दौऱ्याबाबत माहिती
देणार असल्याचं पवार म्हणाले. या बँकेत आपण कधीही कोणत्याही पदावर नव्हतो, असं सांगतानाच,
राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारा पाठिंबा पाहता, सूडबुद्धीतून ही कारवाईची
केली जात असल्याची शंका, यावेळी वर्तवण्यात आली.
****
दरम्यान,
पवार यांच्यावर कारवाईचे पडसाद आज राज्यात अनेक भागात उमटले. बारामती इथं आज बंद पाळण्यात
आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात परळी शहरात आज या कारवाईच्या
निषेधार्थ जोरदार निदर्शनं करण्यात आली, उद्या गुरूवारी परळी बंदची हाक देण्यात आली
आहे. सातारा जिल्ह्यात फलटण आणि रहिमतपूर इथं आज बंद पुकारण्यात आला. सांगलीत राष्ट्रवादी
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. महिला कार्यकर्त्या या आंदोलनात मोठ्या
संख्येने सहभागी झाल्या, सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिक
मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
राज्य
सहकारी बँक घोटाळा प्रकरणातली कारवाई राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत, विरोधकांनी
या कारवाईचा निषेध केला. मात्र अंमलबजावणी संचालनालयाच्या या कारवाईत राज्य सरकारचा
काहीही हस्तक्षेप नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
****
देशाची
एकता आणि अख़ंडतेत मोलाचं योगदान देणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं केंद्र
सरकार सर्वोच्च नागरी पुरस्कार देणार आहे. राष्ट्रीय एकता आणि अख़ंडतेसाठी उल्लेखनीय
आणि प्रेरक योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाईल. ३१ ऑक्टोबरला पटेल यांच्या जयंतीदिनी
या पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे.
****
रेल्वेच्या
सर्व डब्यांमध्ये येत्या २ ऑक्टोबरपर्यंत जैव शौचालय असतीलं, असं रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक
अशोककुमार यांनी सांगितलं आहे. ते आज बंगळुरू इथं आकाशवाणीशी बोलत होते. २०२२ पर्यंत
रेल्वेतल्या दोन लाखापेक्षाही अधिक सामान्य शौचालयांना जैव शौचालयामध्ये बदलण्याचं
उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, मात्र ते गांधी जयंतीदिनीच पूर्ण करण्यात येत असल्याचं
सांगितलं.
****
पंजाब
अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या अडचणीत आलेल्या ग्राहकांसाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी
मदत करेल, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत
वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणा बाबत अनेकांशी बोलणं झालं आहे, त्यांना दिलासा
देण्यासाठी सरकार याप्रश्नी लक्ष घालत असून, आवश्यक सर्व पावलं उचलणार असल्याची ग्वाही
त्यांनी यावेळी दिली.
****
जनाधार
नसल्यामुळे विरोधकांचा पराभव निश्चित असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचं,
लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. आज लातूर इथं, भाजपा सोशल
मीडिया सेल सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. निवडणुकी दरम्यान संभ्रम निर्माण करण्याचं
काम विरोधक करत असल्याचं निलंगेकर म्हणाले.
दरम्यान,
आमदार अमित देशमुख यांनी आज लातूर इथं काँग्रेसचे बूथ प्रमुख, तसंच कार्यकर्त्यांचा
मेळावा घेतला. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात मुलभूत प्रश्नांवर काहीही काम झालं नाही.
सत्ताधाऱ्या कडून फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला गेला, अशी टीका देशमुख यांनी केली.
****
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हा माहिती
कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘मतदार जनजागृती’ चित्ररथाचं, आज जिल्हाधिकारी उदय
चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलं. लोकशाही बळकट
करण्यासाठी मतदान आवश्यक असून, २१ ऑक्टोबर रोजी सर्वांनी न चुकता मतदानाचा हक्क बजवावा
असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.
****
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी नजिक टाके देवगाव इथं, निवडणूक आचारसंहिता
सुरू झाल्यानंतर उपसा योजनेचे भूमिपूजन करण्यात आलं. या प्रकरणी ग्राम पंचायतीचे काही
सदस्य आणि ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मराठवाड्यात आजही अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद
शहर आणि परिसरात दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात
परभणीसह पाथरी भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली,
दुपारी तीन वाजेनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment