आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ सप्टेंबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या
पहिल्या टप्प्यात आज ह्यूस्टन इथं पोहोचले. अमेरिकेचे व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार
सचिव ख्रिस्तोफर ओल्सन आणि इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात
पंतप्रधानांनी आज ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर
चर्चा केली. अमेरिकेतल्या टेलुरियन कंपनीबरोबर दरवर्षी ५० लाख टन इंधनवायू खरेदी करण्याच्या
करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे भारत-अमेरिका संबंध वृद्धींगत होत असल्याचं
निदर्शक असल्याचं उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव गुरुप्रसाद महापात्र यांनी
बैठकीत सहभागी झाल्यानंतर आकाशवाणीला सांगितलं. अमेरिकेचे भारतातले राजदूत केनेथ जस्टर
आणि भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यावेळी उपस्थित होते.
****
ह्यूस्टनच्या एन.आर्.जी. मैदानावर भारतीय समुदायानं
हौडी मोदी हा कार्यक्रम आयोजित केला असून, पंतप्रधान या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
राहणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार
आहेत.
****
औरंगाबादच्या ऑरिक औद्योगिक
वसाहतीजवळ बांधण्यात येत असलेल्या
रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाकरता औरंगाबाद-जालना रस्त्यावर करमाड आणि चिकलठाण्या दरम्यान रेल्वे
वाहतूक सहा दिवस काही वेळ बंद ठेवण्यात
येणार आहे. २५, २६, २७ आणि २८ सप्टेंबर आणि २ आणि ३ ऑक्टोबर रोजी ही बाहतूक बंद राहील. यामुळे या काळात अमृतसर ते नांदेड सचखंड
एक्सप्रेस १७ मिनिटे आणि औरंगाबाद ते नांदेड विशेष गाडी २६ मिनिटे उशिरा धावेल.
****
बीड शहरातल्या संवेदनशील
भागात महावितरणच्या वतीनं काल वीज चोरांविरुध्द कारवाई करण्यात आली. वीज चोरीविरोधी
पथकानं ९० वीज चोरांवर कारवाई केली, तर सुमारे साठ थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा
खंडित करुन त्यांचे मीटर काढण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी दिली.
****
परभणी शहरात प्लास्टिक
जप्तीची मोहीम काल दुसऱ्या दिवशीही सुरु होती. यामध्ये शहरातल्या ६८ दुकानांची तपासणी
करुन ३५ किलो कॅरीबॅग जप्त करत, २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****
भारत विरुद्ध दक्षिण
आफ्रीका टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज बेंगळुरुमधे होणार
आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला एक सामना पावसामुळे वाया
गेला, तर एक सामना भारतानं जिंकला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment