Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 20 September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
केंद्र
सरकारनं कंपनी करात मोठी कपात केली आहे. आता देशांतर्गत कंपन्यांना २५ पूर्णांक १७
शतांश टक्के कमाल कर भरावा लागेल. सर्व कर आणि अधिभार यामध्ये समाविष्ट असतील, असं
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या आज गोव्यात पणजी इथं वार्ताहर परिषदेत
बोलत होत्या. एक एप्रिलपासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षापासूनच हे नवीन दर लागू
होत असल्याचं, त्यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांसाठी
हा कर २२ टक्के असेल, अशी माहिती त्यांनी दिली. या निर्णयामुळे सरकारचा सुमारे दीड
लाख कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे, मात्र उद्योग क्षेत्रातली वाढ तसंच गुंतवणुकीला
चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
रिजर्व्ह
बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. अर्थव्यवस्थेसाठी हे
एक सकारात्मक पाऊल असल्याचं ते म्हणाले. अर्थमंत्र्यांनी ही निर्णय जाहीर करताच, शेअरबाजाराच्या
निर्देशांकानेही एक हजार तीनशे अंकांची उसळी घेऊन तो ३७ हजार ४२० अंकांवर पोहोचला.
****
देशभरातल्या
उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठातून जातीभेदाचं उच्चाटन करावं, अशा मागणीची याचिका
रोहित वेमुला तसंच पायल तडवी यांच्या मातांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. हैदराबाद
विद्यापीठाचा पीएच डी संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याने १७ जानेवारी २०१६ रोजी तर
मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पायल तडवी या आदिवासी तरुणीने या वर्षी मे महिन्यात
आत्महत्या केली होती. या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस
बजावली असून, चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. हे रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान
आयोगाचे नियम आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं, याचिकाकर्त्या मातांच्या
वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाला सांगितलं.
****
अयोध्येतल्या
राम जन्मभूमी बाबरी मशीद वाद प्रकरणाची सुनावणी निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी
येत्या सोमवारपासून सुनावणीची वेळ एक तास वाढवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला
आहे. पाच सदस्यांच्या घटनापीठानं या प्रकरणाची सुनावणी अठरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा
निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दररोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणाची सुनावणी
चालणार आहे.
****
पंतप्रधान
मातृवंदना योजनेने एक कोटी लाभार्थींची संख्या ओलांडली आहे. गर्भवतींच्या पोषण गरजा
भागवण्यासाठी तसंच या काळात रोजगार बुडाल्यानं होणाऱ्या आर्थिक हानीची अंशतः भरपाई
करण्यासाठी एक जानेवारी २०१७ पासून सरकारनं ही योजना सुरु केली. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना
तीन हप्त्यात पाच हजार रुपयांची मदत दिली जाते. आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांपेक्षा
जास्त मदत लाभार्थ्यांना दिली असल्याचं महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं सांगितलं
आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं काल रात्रीपासून पडणाऱ्या
मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून तीन जण जागीच ठार झाले. आज पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान
ही घटना घडली. मृतांमध्ये एक बालक तसंच एका गर्भवतीचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
दक्षिण मुंबईत एका चार मजली इमारतीचा काही भाग आज कोसळला.
धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचं नाव होतं, त्यामुळे काही दिवसांपूर्वी इमारतीतल्या
रहिवाशांना तिथून हलवण्यात आलं होतं, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली
नाही. मात्र इमारतीच्या खाली असणाऱ्या काही दुकांनांचं मोठ नुकसान झाल्याचं वृत्त आहे
****
शीख पंथाचे गुरू नानकदेव यांच्या साडे पाचशेव्या जयंती
निमित्त पाकिस्तानातून आलेली यात्रा नांदेड इथल्या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आज
औरंगाबादकडे रवाना झाली. सचखंड गुरूव्दारा परिसरात या यात्रेदरम्यान आज सकाळी शबद कीर्तन
झालं. त्यानंर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास या नानकयात्रेनं औरंगाबाद शहराकडे प्रस्थान
केलं.
****
दसरा-दिवाळी सणानिमित्ताने प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता नांदेड -औरंगाबाद-नांदेड या विशेष गाडीच्या फेऱ्या ऑक्टोबर अखेरपर्यंत
सुरु ठेवण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात या गाडीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे या गाडीला
चार डब्बे वाढवण्याचा निर्णयही घेण्यात
आल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे.
****
बुलडाणा जिल्हात सातत्यानं
पडणारा कमी पाऊस तसेच मोताळा तालुक्यातील सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा यावर मात करण्यासाठी,
पलढग धरणातलं पाणी हे या भागातल्या शेतीच्या सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याकरता, शेतकऱ्यांकडून
होत असलेल्या मागणीनुसार पलढग कालवा दुरुस्तीसाठी शासनाकडून ४ कोटी ८४ लाख रुपयाच्या
कामास तत्वत: मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतकरी
वर्गात आनंद व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment