Monday, 23 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****  

Ø  दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना धडा शिकवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Ø  उस्मानाबादच्या नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड
Ø  तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्रीआधीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ
आणि
Ø  िसऱ्या टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव; मालिका बरोबरीत
****

 दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली असून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना धडा शिकवावा लागेल, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथं काल हाऊडी मोदी कार्यक्रमात अनिवासी भारतीयांना संबोधित करताना ते बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावेळी उपस्थित होते. दहशतवाद समूळ नष्ट करण्याची वेळी आली आहे. कोणत्याही देशाचे नाव न घेता त्यांनी दहशतवाद कोण पोसतोय हे सगळ्या जगाला माहित आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे या दहशत वादाविरूद्धच्या लढाईत खंबीरपणे उभे असल्याचं ते म्हणाले. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे सर्वात मोठे आणि सच्चे मित्र असल्याच सांगितलं. मोदींच्या नेतृत्वात मजबूत आणि संपन्न भारत घडताना जग पाहत असल्याचंही ते म्हणाले.
*****

 उस्मानाबाद इथं होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद इथं काल पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. हे साहित्य संमेलन १०, ते १२ जानेवारी २०२० दरम्यान होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्ह्यातले ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्राध्यापक भास्कर चंदनशिव, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे आणि हिंदी साहित्य विश्वात नावलौकिक प्राप्त केलेले अमरावती इथले लक्ष्मण नथुजी शिरभाते यांचा जाहीर सत्कार साहित्य संमेलनात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचंही ठाले-पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****

 जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचा निर्णय देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी खूप महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ केला, यावेळी त्यांचं कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर भाषण झालं. कलम ३७० हा काँग्रेस पक्षासाठी राजकीय मुद्दा होता, मात्र सध्याच्या सरकारसाठी हा देशभक्ती आणि राष्ट्रीय अखंडतेचा मुद्दा असल्याचं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. 
****

 ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन- एआयएमआयएम पक्षानं विधानसभा निवडणुकीची दुसरी यादी काल जाहीर केली. यात सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदार संघात शंकर सरगर, सोलापूर मध्य मध्ये फारुक शाब्दी, सोलापूर दक्षिणमध्ये सुफीया शेख आणि पुण्यातील पुणे कॉन्टोनमेंट मतदारसंघातून हिना मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ही यादी जाहीर केली. पहिल्या यादीत पक्षानं तीन उमेदवार जाहीर केले होते.
****

 येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात मला गुलाल उधळायला बोलवा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल सातारा शहरात घेतलेल्या जाहीर सभेत केलं. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर साताऱ्यात रॅली काढून शक्तीप्रदर्शनं केलं. खासदारकीचा राजीनामा देऊन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत गेलेले उदयनराजे भोसले आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टिका केली.

 पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी पवार यांनी युतीच्या सरकारवर टीका केली.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्रीआधीच्या मंचकी निद्रेला काल रात्री प्रारंभ झाला. देवीची सिंहासनारुढ मूर्ती येत्या सात दिवस २९ सप्टेंबरपर्यंत विश्रांतीसाठी मंदीराच्या शेजघरात असणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी ही निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान होईल. यानिमित्त मंदीरात काल विधीवत कापसाची गादी तयार करुन आणि देवीला भंडारा अर्पण करण्यात आला.
****

 दिवंगत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना राज्यात विधानसभेच्या तीस जागा लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष  अनिल घनवट यांनी काल सांगितलं. जालना इथं पक्षाच्या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांसाठी इच्छूक अशा पंधरा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात  आल्या. उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करु असं ते म्हणाले.
****

 भारताविरूद्धचा तिसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना ९ गड्यांनी जिंकत दक्षिण अफ्रिकेनं टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका बरोबरीत सोडली. काल बंगरुळू इथं झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत नऊ बाद १३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेनं सतराव्या षटकांत एक गडी बाद १४० धावा करत हा सामना जिंकला.
****

 कझाकिस्तानच्या नूर-सुलतान इथं सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचा कुस्तीवीर दिपक पुनियानं अंतिम फेरीतून माघार घेतली. इराणच्या हसन याझदानी बरोबरच्या अंतिम लढतीत घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. मात्र २०२० च्या ऑलंम्पिक स्पर्धेसाठी तो यापूर्वीच पात्र ठरला आहे. तर महाराष्ट्राच्या राहुल आवारेनं या स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. त्यानं अमेरिकेच्या टेलर ग्राफ याचा ११ - चार असा पराभव केला. हे या स्पर्धेतलं भारताचं पाचवं पदक आहे. कांस्य पदक जिंकूनही राहुल आवारे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरु शकला नाही.
****

 औरंगाबाद शहरातले प्रसिद्ध ऊर्दू कवी-कादंबरीकार निवृत्त मुख्याध्यापक  आरिफ खुर्शीद यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते एकोणसत्तर वर्षांचे होते. ‘आलमगीर अदब’ या संस्थेची स्थापना करुन खुर्शीद यांनी साहित्यिक चळवळीला चालना दिली होती. त्यांच्या पार्थिवावर आज पंचकुंआ कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर भाग्यश्री परांजपे-गोडबोले यांचंही काल निधन झालं.
****

 अकरावी प्रवेशासाठीच्या अंतिम फेरीला आजपासून सुरवात होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ३० सप्टेंबरपर्यंत ही फेरी चालणार आहे. आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले, प्रवेश रद्द केलेले, आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेले, प्रवेश नाकारलेले, तसंच दहावीच्या फेरपरीक्षेत एटीकेटी सवलत घेऊन उत्तीर्ण झालेले आणि नव्याने अर्ज भरलेले विद्यार्थीही या फेरीत सहभागी होऊ शकतील, असं प्रभारी शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी सांगितलं आहे.
****

 आचारसंहिता सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत राज्यात प्रतिबंधित असणारं विदेशी मद्य जप्त करण्यात आलं. मद्याची चोरुन वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली, यात तीन लाख ८६ हजार ८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments: