Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø कंपनी करात दहा टक्के कपातीची केंद्रीय अर्थमंत्र्यांची
घोषणा
Ø
विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेससोबत
आघाडी; इतर पक्षांसोबत चर्चा सुरू
Ø भाजप शिवसेना युतीचं जागावाटप एक दोन दिवसांत जाहीर होणार
Ø
मराठवाड्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस
आणि
Ø जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंग पुनिया आणि रवीकुमार दहिया
यांना कांस्य पदक
****
केंद्र सरकारनं कंपनी
करात दहा टक्के कपात केली आहे. आता देशांतर्गत कंपन्यांना पूर्वीच्या ३५ टक्के कराऐवजी
२५ पूर्णांक १७ शतांश टक्के कमाल कर भरावा लागेल. सर्व कर आणि अधिभार यामध्ये समाविष्ट
असतील, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या काल गोव्यात पणजी इथं
वार्ताहरांशी बोलत होत्या. एक एप्रिलपासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षापासूनच हे
नवीन दर लागू होत असल्याचं, त्यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या
कंपन्यांसाठी हा कर २२ टक्के तर एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन कंपन्यांसाठी कराचा
दर १५ टक्के असेल, अशी माहिती त्यांनी दिली. या निर्णयामुळे सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा
महसूल बुडणार आहे, मात्र उद्योग क्षेत्रातली वाढ तसंच गुंतवणुकीला चालना देण्यासाठी
हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे
गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. अर्थव्यवस्थेसाठी हे एक सकारात्मक
पाऊल असल्याचं ते म्हणाले.
****
वस्तू आणि सेवा
कर - जीएसटी परिषदेनं हॉटेल खोल्या, तसंच मध्यम वाहनांसह २० वस्तू आणि १२ सेवांच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल
पणजी इथं झालेल्या परिषदेच्या ३७ व्या बैठकीत, जीएसटी दरात बदल, तसंच कर सुधारणा करण्यात
आली. हॉटेलच्या ज्या खोल्यांचे भाडे एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्यावर यापुढे कर
आकारला जाणार नाही, साडे सात हजार रुपयांपेक्षा कमी भाडं असलेल्या खोल्यांवर १२ टक्के
तर त्यापेक्षा अधिक भाडे असलेल्या खोल्यांवर १८ टक्के दराने कर आकारला जाईल.
वस्तू आणि सेवा
करदाता व्यावसायिकांसाठी आधार क्रमांक संलंग्नीकरण करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं
काल घेतला. कर परताव्याचा दावा करताना, आधार क्रमांक बंधनकारक करण्याचा परिषदेचा विचार
आहे.
****
अयोध्येतल्या राम जन्मभूमी
बाबरी मशीद वाद प्रकरणाची सुनावणी निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी येत्या सोमवारपासून
सुनावणीची वेळ एक तास वाढवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. पाच सदस्यांच्या
घटनापीठानं या प्रकरणाची सुनावणी अठरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आता दररोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणाची सुनावणी चालणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, शेतकरी
कामगार पक्ष, यांच्यात आघाडी झाली असून सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि स्वाभिमानी
शेतकरी संघटनेसोबत चर्चा चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेस यांच्यात पाच ते दहा जागांच्या अदलाबदलीचा निर्णय आज मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या
नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्याचा आपला
दौरा पूर्ण झाला असून सर्वत्र राज्य सरकारच्या विरोधात वातावरण असल्याचं दिसून आलं.
शेतकरी आणि तरूण यांच्यात मोठा असंतोष असल्याचं पवार म्हणाले.
तत्पूर्वी, पवार यांनी
औरंगाबाद तसंच जालना इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं.
जालना इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना त्यांनी हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील
असल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना जनता येत्या
निवडणुकीत धडा शिकवेल, असंही ते म्हणाले.
****
विधानसभा निवडणुकीसाठी
भारतीय जनता पक्षासोबत युतीच्या जागा वाटपाचं समीकरण लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ठरलं
असून, एक-दोन दिवसांत ते जाहीर करु असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं
आहे. काल मुंबईत पक्षनेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी
नेते किशोर तिवारी यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना युतीचं कोणतंही सूत्र अद्याप
ठरलेलं नाही, असं सांगितलं. मात्र युती होणार हे नक्की आहे, असं ते म्हणाले.
****
महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेनं विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी
काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यातून
निवडणूक संदर्भात अहवाल प्राप्त झाला असून, अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतील,
असं नांदगावकर म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
मराठवाड्यात कालही अनेक
भागात पाऊस झाला. औरंगाबाद शहरात काल दुपारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
दिवसभर ढगाळ वातावरण राहीलं. परभणी शहर आणि परिसरातही काल संध्याकाळनंतर मुसळधार पाऊस
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र
विजांचा कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यात काल
रात्री दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड तसंच बीड जिल्ह्यातल्या
एकूण अकरा मंडळांमध्ये काल अतिवृष्टीची नोंद झाल्याचं वृत्त आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या
मेहकर इथं मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.
दरम्यान, येत्या दोन
दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा बजरंग
पुनिया आणि रवीकुमार दहिया यांनी काल कांस्य पदक पटकावलं. ६५ किलोच्या वजनी गटात खेळताना
पुनियानं मंगोलियाच्या कुस्तीपटूवर ८-७ अशी मात केली तर ५७ किलो वजन गटात रवीकुमार
दहियानं ईराणच्या रेजा अत्री वागारहचीचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. या विजयाबरोबरच बजरंग पुनिया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता
ठरला आहे.
****
रशियात इटकॅरिनबर्ग इथं
सुरू असलेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पांघलने अंतिम फेरीत धडक मारली
आहे. अमितने उपांत्य फेरीत कझागिस्तानच्या साकेन बिबॉसिनोव्हला तीन दोन अशा फरकानं
हरवत अंतिम फेरी गाठली. जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा अमित
हा पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे.
****
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष
एकेरीतलं बी. साईं प्रणीतचं आव्हान काल
संपुष्टात आलं. काल झालेल्या उपांत्यपूर्व
फेरीत इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुकाने साई प्रणीतला १६-२१, २१-६, २१-१६ असं पराभूत केलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या
पहिल्या यादीत नांदेड जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. भोकर मतदारसंघातून
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नायगांव मतदारसंघातून वसंत चव्हाण आणि नांदेड उतर मतदारसंघातून
डी पी सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पर्यावरण जन - जागृतीसाठी लातूर शहरात काल एक मानवी
साखळी करण्यात आली होती. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना महापौर सुरेश पवार यांनी
प्लास्टिक वापरणार नाही, वापरू देणार नाही अशी शपथ दिली. शहरातल्या श्रीकिशन सोमाणी
विद्यालय आणि ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रानं या मानवी साखळीचं आयोजन केलं होतं.
****
पंजाब मधल्या सुलतानपूर लोधी इथं श्री गुरुनानक देवजी
यांच्या पाचशे पन्नासाव्या जन्मदिननिमित्त साजऱ्या होणाऱ्या प्रकाशपर्व या कार्यक्रमासाठी
नांदेड - फिरोजपूर - नांदेड अशा १४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. ५, १२,
१९, २६ ऑक्टोबर आणि २, ९, १६ नोव्हेंबरला ही गाडी सकाळी नऊ वाजता नांदेड इथून सुटेल
आणि फिरोझपूर इथं दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.
*****
***
No comments:
Post a Comment