Wednesday, 25 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.09.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 राज्याच्या अनेक भागात आज जोरदार पाऊस सुरू आहे. सांगली जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातल्या अनेक मार्गांवरचे पूल पाण्याखाली गेले असून, वाहतुक विस्कळीत झाली आहे. पुणे शहर परिसरातही पाऊस सुरू असल्याचं वृत्त आहे.

 नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला असून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्यात नोंदवला गेला. जिल्ह्यात सरासरीच्या १५३ टक्के पावसाची नोंद झाली, गेल्या दोन दशकातला हा विक्रमी पाऊस असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी आभार मानले आहेत. ट्वीटरवर दिलेल्या संदेशात बच्चन यांनी, आभार व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल ट्विटरद्वारे ही घोषणा केली. पुरस्कारासाठी त्यांची एकमतानं निवड झाली. पाच दशकांच्या कारकिर्दीत बच्चन यांच्या आठवणीत राहणाऱ्या अनेक भूमिका आहेत. त्यांना चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.
****

 विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या लातूर शहर मतदारसंघातून मणियार राजासाब, तर औसा मतदारसंघातून सुधीर शंकरराव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या यादीत पश्चिम महाराष्ट्रातल्या १३, विदर्भातल्या सहा, आणि उत्तर महाराष्ट्रातल्या एका उमेदवाराचा समावेश आहे. एमआयएम पक्षानंही काल मुंबईतल्या पाच मतदासंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. यात विद्यमान आमदार वारिस पठाण यांचा समावेश आहे. 
****

 विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातल्या गाव, वाडी, तांडा, वस्ती इथं संपर्क अभियान सुरू केलं आहे. मतदार संघातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असल्याचं मुंडे यांनी या अभियाना दरम्यान वार्ताहरांना सांगितलं. पोहनेर गणातल्या डिग्रस, कासारवाडी, जळगव्हाण तांडा, रामनगर तांडा या ठिकाणी काल त्यांनी मतदारांशी संवाद साधल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments: