Friday, 20 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.09.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२०  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकानं चिन्मयानंद यांना उत्तरप्रदेशात शहाजहांपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवतील, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. जागा-वाटपाची चर्चा सुरु असून, नाणार प्रकल्पाचा मुद्दा युतीच्या आड येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागावाटपात शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर भाजपाशी युती अशक्य आहे, या शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या विधानावर राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी अकरा वाजता ते पक्षाच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील ऊस शेतीला यावर्षी महापुराचा फटका बसल्याने साखरेच्या उत्पादनात अडीच लाख मेट्रिक टन घट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात ९० हजार हेक्‍टर ऊसाचं क्षेत्र असून साधारणतः ८५ लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप होते. त्यातून १० लाख टन साखरेचे उत्पादन होते. पण यावर्षी महापुराचा फटका ऊस शेतीला सहन करावा लागणार आहे.
***
परभणी महानगरपालिकेनं शहरात कॅरीबॅग जप्तीची मोहीम सुरू केली आहे. काल शहरात शिवाजी चौक, गांधीपार्क, नवा मोंढा परिसरात ११७ दुकांनाची तपासणी करुन, एक क्विंटल २० किलो प्लॅस्टीक जप्त करण्यात आले.
****
कोल्हापूर जिल्हा परिषदेने केंद्र शासनाचा 'पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार' मिळवून राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रमाणपत्र आणि ३० लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.
****


No comments: