Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 21 September
2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ सप्टेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबर रोजी होणार असून मतमोजणी
२४ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनिल अरोरा यांनी
म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत दोन्ही राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना
बोलत होते. या कार्यक्रमानुसार २७ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख चार ऑक्टोबर आहे. पाच ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी
होणार असून सात ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आयोगानं उमेदवारांना २८ लाख रुपये
एवढी खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. या दोन्ही राज्यांसाठी आदर्श आचारसंहिता आजपासून
लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत नऊ नोव्हेंबर रोजी तर हरियाणा विधानसभेची
मुदत २ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे दोन नोव्हेंबरपूर्वी दोन्ही राज्यातील निवडणुका
आटोपल्या जातील, असं अरोरा यावेळी म्हणाले. राज्यात विधानसभेच्या २८८ तर हरियाणात ९०
जागांसाठी या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यापैकी राज्यात अनुसूचित जातींसाठी २९ तर
अनुसूचित जमातींसाठी २५ जागा आरक्षित आहेत; तर हरियाणात अनुसूचित जातींसाठी १७ आणि
अनुसूचित जमातींसाठी एकही जागा आरक्षित नाही. महाराष्ट्रात आठ कोटी ९४ लाख तर हरियाणात
एक कोटी ८२ लाख एवढे मतदार आहेत. महाराष्ट्रात एक लाख ८० हजार तर हरियाणात एक लाख ३०
हजार ईव्हीएम यंत्रांच्या सहाय्याने हे मतदान घेण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम,
औरंगाबाद पूर्व, पैठण, गंगापूर, वैजापूर या नऊ मतदार संघासाठी २१ ऑक्टोबर रोजी निवडणूक
होणार आहे. यासाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती
औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातले २८ लाख
४९ हजार ७५५ मतदार ३ हजार २४ केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी
वोटर हेल्प लाईन अॅप आणि १९५० हा मदत क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मतदान चिठ्ठ्या
मतदान दिवसाच्या एक आठवड्यापूर्वीच देण्याचा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी
सांगितलं.
****
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी फिनलॅंडचे पंतप्रधान ॲन्टी रिन आणि परराष्ट्र
मंत्री पेक्का हाविस्तो यांच्याशी सीमेवरील दहशतवादाबाबत हेलसिंकी इथं चर्चा केली.
भारतानं जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान
काश्मीरबाबत जे उलटसुलट वृत्त पसरवत आहे त्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. जयशंकर
हे तीन दिवसांच्या फिनलँडच्या दौऱ्यावर आहेत.
****
केंद्र सरकारचा कॉर्पोरेट कर कमी करण्याचा निर्णय हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं
मुडी या जागतीक आर्थिक विश्लेषण संस्थेनं म्हटलं आहे. मुडी ही अमेरिकास्थित आर्थिक
पत मुल्यांकन करणारी आघाडीची संस्था आहे. भारतीय उद्योग जगतानं त्यांच्या कडील शिलकी
नफा उद्योगात पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी, कर्ज कमी करण्यासाठी आणि अधिक परतावे मिळवूण
देणाऱ्या समभागांवर खर्च केल्यास त्यांना कर कपातीचा अधिक फायदा होईल, असं मुडीनं म्हटलं
आहे.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पं.भीमसेन
जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर झाला आहे. पाच लाख
रुपये, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. शास्त्रीय गायन आणि
वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला हा पुरस्कार दिला
जातो.
****
जागतीक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा दीपक पुनिया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र
ठरला आहे. ८६ किलो वजनी गटात खेळताना दीपकनं कोलंबियाच्या कुस्तीपटूवर ७-६ अशा फरकानं
मात केली. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला दीपक हा चौथा भारतीय खेळाडू आहे. येत्या
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी विनेश फोगट, बजरंग पुनिया, रवीकुमार दहिया हे अगोदरच पात्र ठरले
आहेत.
****
नांदेड इथले प्रतिष्ठीत नागरिक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील वरिष्ठ अधिकारी
प्रकाश सेनगावकर यांचं आज सकाळी निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. साहित्य, संगीत, नाट्य,
धार्मिक, राजकीय, शासकीय कार्यक्रमांचं ते उत्कृष्ट सूत्रसंचालन करायचे.
****
No comments:
Post a Comment