Wednesday, 25 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25  September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****

 भारतीय सुरक्षा दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज असल्याचं, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. ते आज चेन्नई इथं, आईसीजीएस वराह या तटरक्षक दलाच्या जहाजाचं जलावतरण केल्यानंतर बोलत होते. सैन्यदलप्रमुख बिपीन रावत यांनी, पाचशे दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचं विधान केलं होतं, त्या अनुषंगाने संरक्षणमंत्री बोलत होते.

दरम्यान, राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत आज जलावतरण झालेलं वराह हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं जहाज आहे. समुद्रात तेल पसरणाऱ्या घटनांपासून बचाव करण्यासाठी या जहाजावर प्रदूषण नियंत्रण उपकरणंही लावण्यात आली आहेत.
****

 वायूसेनेचं मिग २१ श्रेणीतलं एक विमान आज मध्यप्रदेशात ग्वाल्हेरजवळ कोसळलं. विमानाचे दोन्ही वैमानिक सुदैवानं या अपघातातून बचावले असल्याचं, सैन्यदलाकडून सांगण्यात आलं आहे. वायूसेनेनं या अपघाताच्या न्यायिक चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतिनिमित्त आज त्यांना आदरांजली अर्पण केली. पंडित उपाध्याय हे देशातल्या महान व्यक्तींपैकी एक होते असं पंतप्रधानांनी ट्विटवर दिलेल्या संदेशात म्हटल आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उपाध्याय यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****

 अमेरिकेत न्यूयॉर्क इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात उभारलेल्या गांधी सोलर पार्कचं उद्घाटन केलं. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्तानं संयुक्त राष्ट्र संघानं जारी केलेल्या तिकिटाचं प्रकाशनही मोदी यांनी केलं. महात्मा गांधी हे जन्माने भारतीय असले तरी ते फक्त भारताचे नव्हते याचा प्रत्यक्ष दाखला हे व्यासपीठ देत आहे, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं.

दरम्यान,स्वच्छ भारत अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फौंडेशनतर्फे ग्लोबल गोलकीपर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अभियानाला नागरी चळवळ म्हणून चालवणाऱ्या सर्व भारतवासीयांना मोदी यांनी हा पुरस्कार समर्पित केला. मोदी यांनी न्यूयॉर्कमधे संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली.
****

 कांद्याच्या दरात झालेली वाढ तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचं, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात झालेला पाऊस आणि पुरामुळे कांद्याची तात्पुरती कमतरता आहे, असं ते म्हणाले. 50 हजार टन कांद्याचा पुरेसा बफर साठा उपलब्ध आहे. त्यातला  १५ हजार टन कांदा वितरित करण्यात आला आहे. उरलेल्या 35 हजार टन साठ्याच्या वितरणासाठी राज्यसरकारं केंद्र सरकारकडे विचारणा करु शकतात, असं पासवान यांनी स्पष्टं केलं.
****

 राज्याच्या अनेक भागात आज जोरदार पाऊस सुरू आहे. सांगली जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातल्या अनेक मार्गांवरचे पूल पाण्याखाली गेले असून, वाहतुक विस्कळीत झाली आहे. पुणे शहर परिसरातही पाऊस सुरू असल्याचं वृत्त आहे.

 नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला असून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्यात नोंदवला गेला. जिल्ह्यात सरासरीच्या १५३ टक्के पावसाची नोंद झाली, गेल्या दोन दशकातला हा विक्रमी पाऊस असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातल्या गाव, वाडी, तांडा, वस्ती इथं संपर्क अभियान सुरू केलं आहे. मतदार संघातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं मुंडे यांनी या अभियाना दरम्यान वार्ताहरांना सांगितलं. पोहनेर गणातल्या डिग्रस, कासारवाडी, जळगव्हाण तांडा, रामनगर तांडा या ठिकाणी काल त्यांनी मतदारांशी संवाद साधल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 सरकार माथाडी कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भरलेल्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षण लागू करून, अण्णासाहेब पाटील यांना राज्यसरकारनं मानवंदना दिली असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****

 विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेली सुमारे साडे पाच हजार मतदान केंद्र, तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानासाठी सहभाग घेणं सुलभ होणार आहे, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
*****
***

No comments: