Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –२८ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात; १६ मतदारसंघात १७ अर्ज दाखल
v राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आमदारकीचा
राजीनामा
v राज्य सहकारी बँक घोटाळा
प्रकरणी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा शरद पवार यांचा निर्णय रद्द
v औरंगाबाद
पदवीधर मतदार संघासाठी एक ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी
आणि
v कुस्तीपटू दीपक पुनिया जागतिक क्रमवारीत अव्वल
****
विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल
करण्यास काल सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी राज्यात १६ मतदारसंघात १६ उमेदवारांनी १७ नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची
माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. उस्मानाबाद
जिल्ह्यात परंडा इथं आर्यन राजे शिंदे यांनी अपक्ष तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात विशाल
नांदरकर यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीनं आणि कन्नड मतदारसंघातून एकानं उमेदवारी अर्ज
भरला. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन विधानसभा मतदार संघातून प्रत्येक एक असे
एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
जालना, हिंगोली, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात
अर्जांचं वितरण झालं, मात्र एकही अर्ज दाखल झाला नसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं
आहे.
****
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन - एमआयएम
पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी काल आणखी तीन उमेदवार घोषित केले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघासतून
डॉ. गफार कादरी, औरंगाबाद मध्यमधून नासेर सिद्दीकी आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून
अरुण बोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
शिवसेना भाजप युतीतल्या जागा वाटपास विलंब होत असल्याच्या
पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या
तयारीवर चर्चा करण्यासाठी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीस शिवसेनेते प्रमुख नेते,
पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार असल्याचं पक्षानं जारी केलेल्या पत्रकात
म्हटलं आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी आणि उमेदवारी देण्यासाठी मुलाखत
दिलेल्या कार्यकर्त्यांना या बैठकीस निमंत्रित करण्यात आलं आहे.
****
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी
एकत्रित यावं आणि मित्रपक्षांशी जागा वाटपाची लवकर चर्चा करावी, असं आवाहन रिपब्लिकन
पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. काल जारी केलेल्या
एका पत्रात, आठवले यांनी, रिपाईला किमान दहा ते नऊ जागा मिळायला हव्यात, तसंच आगामी
महायुतीच्या सरकारमधे एक कॅबिनेट तसंच एक राज्यमंत्री पद, तीन महामंडळाची अध्यक्षपदं,
एक विधान परिषद सदस्यत्व मिळायला हवीत, अशी मागणी
केली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा
राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो मंजूरही केला आहे. विधानसभा
निवडणुकीला महिनाभरापेक्षा कमी काळ बाकी असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा
दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, मात्र त्यांच्या राजीनाम्याचं कारण अद्याप स्पष्ट
झालेलं नाही.
अजित पवार यांनी राजीनामा देण्याचं कारण माहिती नसून,
त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल
पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आपल्यावर गुन्हा
दाखल झाल्यानं अजित पवार अस्वस्थ झाल्याचं त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी आपल्याला
सांगितलं, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक
आपण लढवणार नसल्याचं, शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण,
श्रीनिवास पाटील, सुनील माने यांची नावं चर्चेत असून, अद्याप कोणाचंही नाव निश्चित
झालं नसल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांनी सक्तवसुली संचालनालयात जाण्याचा निर्णय काल ऐनवेळी रद्द केला.
तत्पूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी पवार यांची भेट घेऊन, ईडीच्या कार्यालयात
आपण जाऊ नये अशी विनंती केली. आयुक्तांच्या विनंतीनुसार, कायदा आणि सुव्यस्था कायम
राहण्यासाठी, आणि जनतेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा
निर्णय रद्द केल्याचं ते म्हणाले. कार्यालयात येण्याची गरज नाही, असं पत्रही ईडीनं
पाठवलं असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेनेनं
पाठिंबा दर्शवल्याबद्दल पवार यांनी त्यांचे आभार मानले.
****
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार, शरद पवार
यांच्याविरुद्ध सूडभावनेनं कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी
केला आहे. हे सरकार संधीसाधू राजकारण करत असून, ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथल्या
विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदवले जात असल्याची टीका त्यांनी केली.
****
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपा अन्य मार्गांचा
वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. राजकीय सूडबुद्धीच्या
या मानसिकतेचा काँग्रेसनं नेहमीच निषेध केला आहे, स्वतःहून ईडीसमोर जाण्याची शरद पवार
यांची भूमिका स्वागतार्ह असल्याचं, चव्हाण यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.
****
सक्तवसुली संचालनालयाची कारवाई या मुद्यावर राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकीय सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.
कायदेशीर मुद्यावर विरोध असेल, तर त्यांनी न्यायालयात जावं, ईडीच्या कार्यालयात जाऊन
काय साध्य होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्य सहकारी बँकेतल्या घोटाळ्याची
चौकशी, पहिल्यांदा काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळातच सुरु झाली होती. तेव्हा भारतीय
रिजर्व्ह बँकेनं या बँकेवर प्रशासक नेमला होता, असं पाटील यांनी सांगितलं. शंभर कोटी
रुपयांपेक्षा मोठा घोटाळा असल्यानं सक्तवसुली संचालनालयानं स्वतः या प्रकरणी गुन्हा
दाखल केला आहे, याकडे लक्ष वेधताना, राज्य सरकार सूड भावनेनं काम करत नाही, असं त्यांनी
नमूद केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
कॉंग्रेस
आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका वंचित बहुजन विकास
आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजा मणियार यांनी केली आहे. वंचित
बहुजन विकास आघाडीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष सुर्यवंशी तसंच डॉ. अरविंद भातांब्रे
यांनी काल लातूर इथं आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, त्यावेळी ते बोलत
होते.
****
सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभऱ्याला भाव मिळत नसतांना
सरकार मात्र गप्प बसलं असल्याची टीका लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. लातूर
इथं काल कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात लोककल्याणकारी कार्य केलेल्या
पूर्वीच्या महाआघाडी सरकारला पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत आणण्याचा
निर्धार मतदारांनी व्यक्त केला असल्याचं देशमुख यावेळी म्हणाले.
****
सत्तेचाळीसाव्या केंद्रीय स्वीकृती आणि निरीक्षण
समितीनं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ लाख ३३ हजार घरांच्या बांधकामांना मंजुरी दिली
आहे. राज्य सरकारांतर्फे आलेल्या ६३० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यासाठी ४ हजार
९८८ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी केंद्र सरकार १ हजार ८०५ कोटींची मदत राज्यांना
देणार आहे. एकूण १ कोटी १२ लाख घरांची मागणी असुन त्यापैकी शहरी भागात आतापर्यंत ९०
लाख घरांच्या बांधणीला मंजुरी देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी एक ऑक्टोबरपासून
मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. पूर्वी नोंदणी केली असली तरी ती यादी न्यायालयाच्या
आदेशान्वये रद्द करण्यात आल्यामुळे सर्व पदवीधरांनी पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असल्याचं
परभणीचे निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांनी सांगितलं. ते काल परभणी इथं
वार्ताहरांशी बोलत होते.
****
विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातून अद्याप
अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसताना नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत सहा ठिकाणी राजकीय
पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोणतीही
पूर्वपरवानगी न घेता गर्दी जमवणं आणि राजकीय सभा घेण्याच्या कारणावरून बागलाण, कळवण,
निफाड, नाशिक आणि मालेगाव याठिकाणी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
****
धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या वाघाडी इथं
३१ ऑगस्ट रोजी झालेल्या रासायनिक कारखान्यातल्या भीषण स्फोट प्रकरणी काल पोलिसांनी
कारखाना मालकासह तिघांना अटक केली. या स्फोटात १४ जण ठार तर ६५ जण जखमी झाले होते.
या स्फोट प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नेपाळमधल्या काठमांडू इथं सुरु असलेल्या १८ वर्षांखालील
सैफ फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य
फेरीच्या सामन्यात भारतीय संघानं मालदीवचा चार - शून्य असा पराभव केला. उद्या रविवारी
होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर बांग्लादेशचं आव्हान असेल.
****
जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक विजेता दीपक पुनिया,
जागतिक क्रमवारीत ८६ किलो फ्री स्टाईल वजनी गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर बजरंग
पुनियानं ६५ किलो फ्री स्टाईल वजनी गटात दुसरं स्थान पटकावलं आहे. पुरुषांच्या ५७ किलो
फ्री स्टाईल वजनी गटात महाराष्ट्राचा राहुल आवारे दुसऱ्या क्रमांकावर, तर रवि दहिया
पाचव्या क्रमांकावर आहे. महिलांमध्ये कुस्तीच्या जागतिक क्रमवारीत विनेश फोगाट दुसऱ्या,
सीमा बिस्ला तिसऱ्या, तर पुजा ढांडा पाचव्या क्रमांकावर आहे.
*****
***
No comments:
Post a Comment