Thursday, 26 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
**** 

Ø  राज्य सहकारी बँक कर्जवाटप प्रकरणी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका; उद्या सक्त वसुली संचालनालयासमोर स्वतः होऊन जाणार; राजकीय हेतुने प्रेरित ही कारवाई नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण
Ø  मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कंत्राट वाटपात भ्रष्टाचार झाला नसल्याचा स्मारक समितीचा खुलासा
Ø  राज्यात काल अनेक भागात जोरदार पाऊस; जायकवाडी धरणाचे १६ दरवाज पुन्हा उघडले
आणि
Ø  औरंगाबाद शहरात जुन्या वादावरून एकाच कुटुंबातल्या तिन जणांची हत्या
****

 राज्य सहकारी बँक कर्जवाटप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पुढचा महिनाभर आपण मुंबई बाहेर राहणार असल्यामुळे, उद्या शुक्रवारी २७ तारखेला ईडीच्या मुंबई कार्यालयात जाऊन माहिती देणार असल्याचं पवार म्हणाले. राज्य सहकारी बँकेत आपण कधीही कोणत्याही पदावर नव्हतो, असं सांगतानाच, राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारा पाठिंबा पाहता, सूडबुद्धीतून ही कारवाईची केली जात असल्याची शंका, यावेळी वर्तवण्यात आली.

 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत, विरोधी पक्षांनी या कारवाईचा निषेध केला.

 दरम्यान, पवार यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्याच्या घटनेचे पडसाद काल राज्यात अनेक भागात उमटले. बारामती इथं  बंद पाळण्यात आला. बीड जिल्ह्यात परळी शहरात या कारवाईच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं करण्यात आली, आज परळी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. परभणी शहरातही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनंही क्रांती चौक इथं काल निदर्शनं केली. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथं काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. सातारा जिल्ह्यात फलटण आणि रहिमतपूर इथं काल बंद पाळला. सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. महिला कार्यकर्त्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या, सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा, शेवगाव इथं निषेध करण्यात आला. कोल्हापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीनं शिवाजी चौकात जोरदार निदर्शनं करून, या कृतीचा निषेध नोंदवण्यात आला.

 राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणातली कारवाई राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र अंमलबजावणी संचालनालयाच्या या कारवाईत राज्य सरकारचा काहीही हस्तक्षेप नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
****

 मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या कंत्राट वाटपात कोणाताही भ्रष्टाचार झाला नसल्याचं स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेले आरोप हे त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आणि निराशा दर्शवत असल्याचं मेटे यांनी म्हंटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.
****

 अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन - एआयएमनं विधानसभा निवडणुकीसाठी आणखी तीन उमेदवार काल जाहीर केले. जालना विधानसभा मतदारसंघातून इकबाल अहमद खान, जळगाव जिल्ह्यातल्या रावेर इथून विवेक ठाकरे आणि धुळे विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद युसुफ अब्दुल हमिद मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल यांनी पत्रकाद्वारे सांगितलं.
****

 मराठवाड्यासह राज्यात काल अनेक भागात कालही जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहरात दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. उस्मानाबाद, तसंच परभणी जिल्ह्यात परभणीसह पाथरी भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातही दुपारी तीन वाजेनंतर मुसळधार पाऊस झाला. जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून, १८ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे शहरातही काल रात्री अतिवृष्टी झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या पावसात शहरातल्या सहकार नगर भागात घराची भिंत कोसळून एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं. बुलडाणा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आला आहे. यामुळे बुलडाणा - अजिंठा, बुलडाणा - धाड आणि  बुलडाणा - रायपूर हे तीन मुख्य मार्ग बंद झाले आहेत.

 या पावसामुळे इगतपुरी - मुंबई मार्गाव पाणी साचल्यामुळे काल नांदेडहून मुंबईकडे जाणारी तपोवन एक्सप्रेस नाशिक जिल्ह्यात देवळालीपर्यंतच गेली तर आज मुंबईहून सुटणारी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 जनाधार नसल्यामुळे विरोधकांचा पराभव निश्चित असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचं, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं, भाजपा सोशल मीडिया सेल सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. निवडणुकी दरम्यान संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधक करत असल्याचं निलंगेकर म्हणाले.

 दरम्यान, आमदार अमित देशमुख यांनी काल लातूर इथं काँग्रेसचे बूथ प्रमुख, तसंच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात मुलभूत प्रश्नांवर काहीही काम झालं नाही. सत्ताधाऱ्या कडून फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला गेला, अशी टीका देशमुख यांनी केली.
****

 विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्यामतदार जनजागृतीचित्ररथाचं, काल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलं. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक असून, २१ ऑक्टोबर रोजी सर्वांनी न चुकता मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.
****

 औरंगाबाद शहरात चिकलठाणा परिसरातल्या चौधरी कॉलनीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातल्या तिन जणांची हत्या केल्याची घटना काल रात्री घडली. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. हत्या करणारा तरूण त्याच कॉलनीतला रहिवाशी असून अमोल बोर्डे असं त्याचं नाव आहे. ठार झालेल्या कुटुंबातल्या मुलाचा तो वर्गमित्र असल्याचं पोलिसांनी सांगितलं.  
****

 नगर-दौड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीच वाजेच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चौघे जण जागीच ठार झाले. श्रीगोंद्याहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला.
****

 औरंगाबाद इथं काल शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांचा माऊली संवाद हा कार्यक्रम झाला. यावेळी बांदेकर यांनी महिलांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महिलांनी रस्ते, पाणी, कचरा, वीज याबाबतीतल्या शहरातल्या समस्यांची त्यांना माहिती दिली.
****

 परभणी तालुक्यातल्या मोहपुरी आणि गव्हा या दोन गावांना स्वतंत्र मतदान केंद्र देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं केली आहे. या दोन्ही गावाचं मतदान केंद्र सात किलोमीटर दूर पान्हेरा या गावी आहे. याबाबतचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. 
****

 परभणी महानगरपालिकेत डेंग्यू, मलेरिया आणि कुष्ठरोग सर्वेक्षण संदर्भात काल आढावा बैठक घेण्यात आली. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी यावेळी केलं. 
*****
***

No comments: