Friday, 20 September 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.09.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युतीच्या जागावाटपाचं समीकरण लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ठरलं असून एक दोन दिवसांत ते जाहीर करु अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आज मुंबईत शिवेसना भवनात पक्षनेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. अयोध्येतल्या राम मंदिरासंबंधी बोलताना ठाकरे यांनी, न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे. न्यायालयाकडून मिळालेला न्याय हा न्याय असतो. तो नि:पक्ष असतो, असं सांगितलं. शिवसेनेने गेल्या पाच वर्षात कधीही सरकारला दगा दिला नसून पाच वर्षांत झालेल्या विकासात शिवसेनेचा मोलाचा सहभाग असल्याचं, ठाकरे यावेळी म्हणाले.
****
केंद्र आणि राज्य सरकार उद्योग धार्जिणे असून शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज जालना इथं पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. कर्जाचा बोजा सहन होत नसल्यानं राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं पवार यांनी सांगितलं. कोल्हापूर, सांगली, गडचिरोली भागात पुराने थैमान घातलं. पिके वाहून गेली, घरे पडली, मात्र आपदग्रस्तांचे अश्रू पुसण्याऐवजी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न होते, अशी टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल, असंही ते म्हणाले. सर्व आघाड्यांवर अपयशी असलेलं हे सरकार फक्त फसव्या घोषणा करुन लोकांची दिशाभूल करत असल्याचं पवार म्हणाले.
दरम्यान, औरंगाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सध्या सुरू आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार सध्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यातून निवडणूक संदर्भात अहवाल प्राप्त झाला असून, अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं.
****
स्वतंत्र भारत पक्षाकडून मराठवाड्यातून विधानसभा लढवण्यास इच्छुक उमेदवारांच्या उद्या जालना इथं मंठा रस्त्यावरच्या मधुबन हॉटेलमध्ये मुलाखती होणार आहेत. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाच्या समन्वयक समितीचे सदस्य वामनराव चटप यावेळी उपस्थित असतील. पक्षाच्या ध्येय धोरणाशी कुठलीही तडजोड न करता ही निवडणूक लढवण्याचा आणि समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्धार, औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीत करण्यात आला होता. मराठवाड्यातल्या इच्छूक उमेदवारांनी रविवारी सकाळी अकरा वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन पक्षाचे मराठवाडा समन्वयक कैलास तवार यांनी केलं आहे.
****
पर्यावरण जन - जागृतीसाठी लातूर शहरात आज एक मानवी साखळी करण्यात आली होती. तहसील कार्यालय ते टाऊन हॉल मैदानापर्यंत मानवी साखळी करून पर्यावरण रक्षणाचा प्रचार करण्यात आला. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना महापौर सुरेश पवार यांनी प्लास्टिक वापरणार नाहीत वापरू देणार नाहीत अशी शपथ दिली. शहरातल्या श्रीकिशन सोमाणी विद्यालय आणि ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रानं या मानवी साखळीचं आयोजन केलं होतं.
****
दसरा-दिवाळी सणानिमित्तानं प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता नांदेड -औरंगाबाद-नांदेड या  विशेष गाडीच्या फेऱ्या ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात या गाडीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे या गाडीला चार डब्बे वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे.
****
भारतीय हॉकी संघानं आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी हॉकी संघाची घोषणा केली आहे. कर्णधार मनप्रीत सिंह यांच्या नेतृत्वात २० हॉकीपटूंचा हा संघ या दौऱ्यात बेल्जियम सोबत तीन तर स्पेनसोबत दोन सामने खेळेल. २६ सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान हे सामने होणार आहेत.
****
रशियात इटकॅरिनबर्ग इथं सुरू असलेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पांघलने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत अमितने कझागिस्तानच्या साकेन बिबॉसिनोव्हला तीन दोन अशा फरकानं हरवत अंतिम फेरी गाठली. जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा अमित हा पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे.
****
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीतलं बी. साईं प्रणीतचं आव्हान आज संपुष्टात आलं. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुकाने साईप्रणीतला १६-२१, २१-६, २१-१६ अस पराभूत केलं.
****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...