Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø
विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत किरकोळ चुकादेखील
टाळण्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं
आवाहन
Ø भारतीय
जनता पक्ष आणि शिवसेनेत जागा वाटपाबाबतची चर्चा अद्याप चालूच; युतीची घोषणा आज होणार नाही- शिवसेना नेते अनिल परब यांचं स्पष्टीकरण
Ø मुख्यमंत्र्यांचे सर्व आर्थिक व्यवहार अॅक्सीस बँकेमार्फत
होत असल्याचा काँग्रेसचा आरोप
Ø
विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची आठ
उमेदवारांची पहिली यादी जाहीर
आणि
Ø बीड शहरात मुसळधार पाऊस;
सखल भागात साचलं पाणी
****
महाराष्ट्र आणि हरयाणा
विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत किरकोळ चुकादेखील टाळण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त
सुनिल अरोरा यांनी केलं आहे. या दोन्ही राज्यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ५०० निवडणूक
निरिक्षकांना मार्गदर्शन करताना काल ते बोलत होते. मानक कार्य पद्धतीचा काटेकोरपणे
अवलंब करावा तसंच संबंधित मतदारसंघामध्ये अतिशय जागरूक, तटस्थ आणि प्रतिसादक्षम राहण्यासही
त्यांनी सांगितलं आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जागा वाटपाबाबतची चर्चा अद्याप चालू असून,
युतीची औपचारिक घोषणा आज होणार नसल्याचं शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी सांगितलं. युतीची
औपचारिक घोषणा आज होण्याची शक्यता भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं व्यक्त केली होती,
मात्र दोन्ही पक्षामध्ये चर्चा झाल्यानंतरच युतीची घोषणा होईल, असं परब यांनी सांगितल्याचं
पीटीआयचं वृत्त आहे.
दरम्यान, काल मुंबईत
वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत युतीचा निर्णय योग्य
वेळी जाहीर केला जाईल, असं सांगितलं. उद्योग
करात कपात केल्याबद्दल फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार
मानले. या धाडसी निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळाला असून, उद्योग क्षेत्रात नवीन
गुंतवणूक येण्यासही या निर्णयामुळे चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
या निर्णयामुळे राज्यातही नवनवे उद्योग
येण्यास मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा संयुक्त
जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते
नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध होणार होता, मात्र घटक पक्षांनी आग्रह केल्यामुळे
एकत्रितपणेच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं. आर्थिक
मंदी, बेरोजगारी, काश्मीर आणि कलम ३७० आदी मुद्यांवरून मलिक यांनी सरकारच्या धोरणांवर
टीका केली.
दरम्यान, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याच्या
पार्श्वभूमीवर, राज्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र
असलेले फलक काढण्याची मागणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली आहे.
****
भ्रष्टाचाराच्या आरोपांचा एकही डाग नसलेले स्वच्छ
मुख्यमंत्री असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा असला तरी, त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार अॅक्सीस या खाजगी बँकेमार्फत होतात,
असा आरोप काँग्रेस पक्षाचे राज्य विधानसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले
यांनी केला आहे. काल मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता
फडणवीस यांची गेल्या पाच वर्षात ॲक्सिस बँकेच्या उपाध्यक्षपदी झालेली पदोन्नती आक्षेपार्ह
असल्याचा दावाही त्यांनी केला.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपली कोंडी झाली होती,
त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला असं स्पष्टीकरण रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर
यांनी दिलं आहे. बीड दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
यांनी केलेल्या टीकेला त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं. कुटुंबात फूट पाडून घरफोडी
करणाऱ्यांचा पक्ष आता बुडणार असल्याचा त्यांनी यावेळी सांगितलं. दिवंगत नेते गोपीनाथ
मुंडे यांचं घर पवार यांनीच फोडल्याचा आरोपही
त्यांनी यावेळी केला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या भारतीय
जनता पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. जिल्हा
परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, सुनीता भांगरे, आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्यासह अनेकांचा
यात समावेश आहे. भारतीत जनता पक्षाचे जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती
राजश्री मोरे आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत मोरे यांनीही पवार यांच्या उपस्थितीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
****
राज्यातल्या टाटा समूहाच्या सहा धरणांमधलं पाणी उजनीमार्फत
मराठवाड्याला द्यावं, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर
यांनी केली आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. या पाण्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी
न करता हे पाणी मराठवाड्याला द्यावं यासाठी
सरकारनं टाटा समूहाशी वाटाघाटी कराव्यात, असं आंबेडकर यावेळी म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं आठ उमेदवारांची
पहिली यादी काल जाहीर केली. मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व मतदासंघातून मानवाधिकार कार्यकर्ते
विठ्ठल लाड, चांदीवली - सिराज खान, दिंडोशी - दिलिप तावडे, चंद्रपूर जिल्ह्यातल्या
ब्रम्हपूरी मतदारसंघातून परोमिता गोस्वामी, कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर इथून डॉ.
आनंद दादू गुरव, नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधून विशाल वादघुले, पुण्यातल्या पर्वती
इथून संदीप सोनवणे, आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित मोरे यांना उमेदवारी
देण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. बिंदुसरा
आणि करपरा नदीचं पात्र पूर्ण भरलं असून, शहरात सखल भागात पाणी साचलं आहे. शहरातल्या
लाकडी पुलावरुन पाणी वाहत होतं, तर पेठ -बीडला जोडणाऱ्या मोठ्या पुलाला पाणी लागल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीडचे उपविभागीय अधिकारी राजेश टिळेकर आणि तहसिलदार
किरण अंबेकर यांनी मध्यरात्री दगडी पुलावर पाण्याच्या पातळीची पाहणी केली.
औरंगाबाद, नांदेड, परभणी
आणि हिंगोली जिल्ह्यातही काल पाऊस पडला. सांगली
जिल्ह्यातही पहाटेपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात शिरुर अनंतपाळच्या पोलीस ठाण्याचे
तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांना राज्य मानवी हक्क आयोगानं पन्नास हजार
रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासंदर्भात २०१२मध्ये एका घटनेत उमरदरा गावच्या सरपंचावर
देशमुख यांनी रिव्हॉलवर रोखली होती. याबाबत विचारणा करणाऱ्या शिवसेना महिला आघाडीच्या
जिल्हा संघटक डॉक्टर शोभा बेंजरगे यांना देशमुख यांनी शिवीगाळ केली तसंच त्यांच्या विरूद्ध शासकीय कामात अडथळा
निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी निलंग्याच्या न्यायालयानं बेंजरगे
यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र बेंजरगे यांनी याबाबतची राज्य मानवी हक्क आयोगाकडे
तक्रार दाखल केली. आयोगानं देशमुख यांना याआधी
पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता, यावर त्यांनी पुर्नविलोकन याचिका दाखल केली, त्यांनंतर
आयोगानं दंडाची रक्कम पन्नास हजार रुपयांवर आणली.
****
बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातल्या माळेगाव
इथं चार मुलींसह महिलेनं आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली. उज्ज्वला ढोके असं
या महिलेचं नाव असून, या महिलेनं विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचं वृत्त आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदार संघात मिळून
एकूण १५ लाख ५४ हजार ११० मतदार असून, एक हजार ६५३ मतदान केंद्रांवर तीन हजार ५७ मतदान
यंत्र उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली.
*****
***
No comments:
Post a Comment