Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –22 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ केला.
मुंबईतल्या गोरेगाव इथल्या मैदानावर शाह यांचं जम्मू-काश्मीरसाठीचं संविधानातलं कलम
३७० रद्द करण्याच्या केंद्रांच्या निर्णयावर भाषण झालं. यावेळी बोलतांना शाह यांनी
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, असा विश्वास व्यक्त केला.
राज्यात भाजपाचंच सरकार यावं, अशी मतदारांची इच्छा आहे, असं ते म्हणाले.
****
अयोध्येतल्या बाबरी मशीद प्रकरणात केंद्रीय गुन्हे
अन्वेषण विभाग - सीबीआय न्यायालयानं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, कल्याण सिंग
यांना २७ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे. राजस्थानचे राज्यपाल
म्हणून त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांनी सीबीआयतर्फे
९ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या प्रलंबित अर्जावर हा आदेश दिला आहे. सिंग यांच्यावर १९९३
मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं, तथापि राज्यपाल म्हणून राज्यघटनेनं दिलेल्या
संरक्षणामुळे त्यांच्यावर कारवाई करणं शक्य नसल्याचं एप्रिल २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं
सांगितलं होतं. राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश
सीबीआयला दिले होते. या प्रकरणातले सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. सध्या या
प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरू आहे.
****
उस्मानाबाद इथं जानेवारीत होणाऱ्या ९३ व्या अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो
यांची आज एकमताने निवड करण्यात आली. उस्मानाबाद
इथं आज पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात
आली. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला
महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य
संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई, पुणे आणि नाशिक
या तीन ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वच्या
सर्व म्हणजे पंधरा मतदार संघांत पक्षाचे उमेदवार उभे राहतील, अशी माहिती मनसेचे नेते
अभिजित पानसे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काल नाशिक इथं झालेल्या मेळाव्यात
दिली.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी
कॉँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा झाला.
यावेळी पवार यांनी युतीच्या सरकारवर टीका केली, तर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या
उपस्थितीत सातारा इथं आज एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीत राष्ट्रवादी पक्षानं
जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या
उपस्थितीत अहमदनगर इथं झालेल्या मेळाव्यात दोन गटांनी एकमेकांना दमदाटी आणि धक्काबुक्की
केल्याची घटना घडली. या संदर्भात पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली असून, संग्राम
जगताप गटाचे माजी महापौर अभिषेक कळमकर आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते
किरण काळे यांच्यासह ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
पश्चिम रेल्वेनं स्वच्छ रेल, स्वच्छ भारत या अभियानात
गेल्या २ तारखेपासून सुरू झालेल्या दंडात्मक कारवाईत आतापर्यंत ५ लाख ५२ हजार रुपये
दंड वसूल केला आहे. थुंकणं, कचरा टाकणं अशा २ हजार ६३१ प्रकरणांत हा दंड वसूल करण्यात
आला.
****
केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देशभरात २० राष्ट्रीय
उत्कृष्ट क्रीडा केंद्रं स्थापन करण्यात येणार आहेत. २०२४ आणि २०२८ च्या ऑलिंम्पिकसाठी
खेळाडू तयार करणं, हा यामागचा उद्देश असल्याचं क्रीडा मंत्री केरेन रिजिजू यांनी सांगितलं.
राज्यांनी या क्रीडा केंद्रांच्या विकासासाठी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
****
धुळे इथं आज झालेल्या ३६ व्या राज्यस्तरीय खो-खो
च्या अंतिम सामन्यात किशोर गटात उस्मानाबाद आणि किशोरी गटात पुण्याचा संघ विजयी झाला.
किशोर गटाचा अंतिम सामना हा पुणे विरुद्ध उस्मानाबाद यांच्यात, तर किशोरी गटाचा अंतिम
सामना नाशिक विरुद्ध पुणे यांच्यात झाला.
****
कझाकस्तानच्या नूर-सुलतान इथं सुरु असलेल्या जागतिक
स्पर्धेत भारताचा कुस्तीवीर दिपक पुनियानं अंतिम फेरीत माघार घेतली. इराणच्या हसन याझदानी
बरोबरच्या अंतिम लढतीत घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं
लागलं. मात्र २०२० च्या ऑलंम्पिक स्पर्धेसाठी तो यापूर्वीच पात्र ठरला आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यातल्या टी-ट्वेंटी
क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज बेंगळुरुमधे होणार आहे. संध्याकाळी सात
वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला एक सामना पावसामुळे वाया गेला, तर एक सामना
भारतानं जिंकला आहे.
****
No comments:
Post a Comment