Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –28
September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०१९ सायंकाळी
६.००
****
सैन्यदलानं जम्मू - किश्तवार राष्ट्रीय महामार्गावर बाटोटे भागातील चकमकीमध्ये
तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. लष्कराचा एक जवान यात शहीद झाला आहे. सुमारे नऊ तास
चाललेल्या या चकमकीनंतर आता या भागातील शोध मोहीम अद्याप सुरू असल्याची माहिती लष्कराच्या
जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. शोध मोहीम हाती घेतलेल्या लष्कराच्या धडक कृती दलावर
दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर ही चकमक सुरू झाली होती.
****
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचे
काका शरद पवार यांचा संबंध नसताना त्यांचं नाव घेतलं गेल्यामुळे अस्वस्थ झाल्यानं आमदारकीचा
राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. त्यांनी
काल संध्याकाळी आमदारकीचा राजिनामा दिला होता. पवार कुटुंबीयांमध्ये मतभेद असल्याचा
त्यांनी यावेळी इऩ्कार केला. या पत्रकार परिषदेवेळी भावनाविवश झालेल्या अजित पवार यांनी
राज्य सहकारी बँकेमधील कथित पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्धच्या
आरोपांबद्दल प्रश्र्न उपस्थित केले.
****
दरम्यान, सरकार सुडबुध्दीचं राजकारण करीत असल्याचं शऱद पवार यांचं म्हणणं चुकीचं
आणि न्याय व्यवस्थेवर संशय घेणारं आहे अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी
केली आहे. ते आज नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. शिखर बॅँकेतील घोटाळ्या संदर्भात
उच्च न्यायलयात २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल झाली होती आणि त्यात शरद पवार यांचं नाव
असून उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अन्वयेच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहितीही
भंडारी यांनी दिली.
****
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते घोटाळ्यातील कारवाई चुकवण्यासाठी
भाजपत आल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांनी शनिवारी
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना खोडून काढला आहे. त्यांच्या मतदार संघातील मतदार भाजपला
अनुकूल झाले आणि त्यांच्या रेट्यामुळेच ते भाजपत दाखल झाले असं सहस्रबुद्धे यांनी यावेळी
म्हटलं.
****
युतीची घोषणा येत्या दोन दिवसांत होईल अशी माहिती, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे
यांनी आज दिली. ते मुंबईत जिल्हाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. युतीबाबत भाजप नेते
अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणी सुरु आहे, काही जागांवर कोण जिंकू शकेल याबाबत
चाचपणी सुरु असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला
बसवायचं आहे, असंही ठाकरे यांनी नमूद केलं.
****
भाजपच्या भंडारा जिल्ह्यातील एका आमदाराला महिला पोलिस अधिकाऱ्याचा अवमान केल्याप्रकरणी
आज अटक करण्यात आली आहे. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी गेल्या १६ तारखेला कार्यकर्त्यांना
बांधकाम साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात महिला पोलिस अधिकाऱ्याचा अपमान केला होता, अशी
माहिती पोलिसांनी दिली आहे. कार्यक्रमादरम्यान तिथं बंदोबस्तासाठी असलेली महिला अधिकारी
आणि आमदारांदरम्यान शिवराळ भाषा वापरल्यामुळं शाब्दिक चकमक उडाली होती.
****
पत्रकारिता हा सध्या व्यवसाय झाला असून समाज माध्यमांवर खोट्या बातम्यांचं प्रमाण
वाढल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. ते आज औरंगाबाद
इथल्या महात्मा गांधी मिशन संस्थेत अरूण साधू व्याख्यानमालेत ‘आजची माध्यमं आणि राजकारण’
या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. समाजाला जोडण्याचं आणि समाजातील विविध प्रश्नांना
वाचा फोडण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी
म्हटलं. यावेळी खासदार तसंच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी भारतीय जनता पक्षावर
तीव्र टीका केली. चुकीचा इतिहास लिहला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
****
परभणी जिल्ह्यात आचारसंहितेच्या भंगाचा गुन्हा आज नोंदवण्यात आला आहे. जिंतूर तालुक्यातील
मौजे कोरवाडी इथं आमदार विजय माणिकराव भांबळे यांच्या स्थानिक विकास निधीतून सांस्कृतिक
सभागृह सभामंडप बांधकाम उद्घाटनाचा फलक कायम राहिला होता. आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख
टी. व्ही. ढोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी पाहणी केली होती. ग्रामसेवक संदीप
बारवे यांनी यात दोषी आढळल्यानं त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियमनुसार गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा बाविसावा दीक्षान्त समारंभ
आज झाला.
मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांसदर्भात युवकांनी बदल घडवण्याचं आवाहन मुंबईच्या
भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटीचे संचालक शुभाशिस चौधरी यांनी यावेळी केलं.
****
No comments:
Post a Comment